महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,556

मार्कंडा | विदर्भाची काशी

By Discover Maharashtra Views: 1888 2 Min Read

मार्कंडा | विदर्भाची काशी –

मार्कंडा हे  नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात.मार्कंडा – विदर्भाची काशी.

मार्कंडा ही जागा दुर्लक्षित आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत.

यांत मार्कंडऋषी,(ज्यांचेवरून या गावास ‘मार्कंडा’ हे नाव पडले)मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे चंद्रपूर येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत.

या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.

अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. मार्कंडा मंदिरांना ‘विदर्भाची काशी’ म्हणतात ते उगाच नाही.

मार्कंडा गाव चंद्रपूरपासून 65 कि.मी. तर नागपूरपासून 184 कि.मी. अंतरावर आहे. गडचिरोली पासून 40 किलोमीटर अंतरावर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या शहरातून येथे येण्याकरिता वर्षभर बस सेवा उपलब्ध आहे.

अनुजा अढाऊ

Leave a Comment