संजीवनी कुपीसह मारुती –
सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंदिरामागे एका आगळ्या वेगळ्या पण फारश्या प्रसिद्ध नसलेल्या मारुतीचे मंदिर आहे. हत्ती गणपती मंदिर आणि शेजारी असलेले झेरॉक्सचे दुकान यामध्ये एक छोटासा बोळ आहे. त्या बोळातून आत गेल्यावर आतमध्ये एक छोटेसे मारुती मंदिर आहे. आतमध्ये सुंदर नक्षीदार लाकडी देव्हाऱ्यामध्ये मारुतीची एक आगळी वेगळी मूर्ती आहे.
सुमारे ४ फूट उंच, प्रसन्न उभा चेहरा, डोक्यावर मुकुट, कानात डोलणारे कानातले, उजव्या दंडावर बाजूबंद, कंबरेला कट्यार आणि पायाखाली राक्षस आणि डाव्या हातात संजीवनी कुपी धरलेली असे या मारुतीचे रूप आहे. साधारणतः हातात द्रोणागिरी पर्वत उचललेला मारुती अशी मूर्ती सर्वत्र असते, इथे मात्र मारुतीने डाव्या हातात संजीवनी कुपी धरलेली आहे. मारुतीच्या पायाखालच्या राक्षसाबद्दलची अधिक माहिती विसावा मारुती मंदिर या पोस्ट मध्ये दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी या मूर्तीवरील शेंदूरलेपन काढण्यात आलं. त्यामुळे आज आपल्याला ही मूर्ती मूळ स्वरूपात बघायला मिळते. मुख्य मूर्तीच्या समोर काळ्या पाषाणातल्या नवग्रहांच्या सुंदर आणि कोरीव छोट्या मुर्त्या आहेत.
संदर्भ: मंदार लवाटे
पत्ता : https://maps.app.goo.gl/aM3tjhRCeZGNB9xE7
आठवणी इतिहासाच्या