महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,865

मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध

Views: 2524
10 Min Read

मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध –

थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यात आलेली मस्तानी ही त्यांची पत्नी की कंचीनी, तिचा जन्म , तिचे मातापिता तिचे पूर्वायुष्य याबाबत अनेक कपोकल्पित व संदिग्ध कथा आढळून येतात. मस्तानी बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यात कशी आली, त्यांचा विधीपूर्वक विवाह झाला का , बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे संबंध कसे होते, मस्तानीचे पुण्यातील राहणीमान व पेशवे घराण्यातून विरोध , मस्तानीच्या सौंदर्याच्या सुरसकथा , मस्तानीचा मृत्यू घातपात , आत्महत्या कि नैसर्गिक अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे काळाच्या इतिहासात दडलेली आहेत. मस्तानी म्हणून जे चित्र सादर केले जाते ते देखील तिचे नाही. मस्तानी बद्द्लेचे समकालीन व विश्वाहार्य कोणतेही संदर्भ आढळून येत नाहीत त्यामुळे मस्तानी ही एक रहस्यच.(मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध)

मस्तानीचा जन्म

इ.स १८४१ साली लिहिल्या गेलेल्या “ बाजीराव बल्लाळ पेशव्यांची बखर “ या बखरीत मस्तानी हि निजामाची मुलगी बेगमच्या सांगण्यावरून निजामाने पेशव्यांशी घरोबा करावा या इच्छेने मस्तानीचा विवाह खंजिरासोबत लावून पेशव्यांशी सोयरिक केली. इ.स १८५० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या “ पेशवे बखरीतील “ नोंदीनुसार मस्तानी मुगल सरदार शहाजतखान याची कलावंतीण . नागेश बापट यांनी १८७८ साली लिहिलेल्या “ पेशवे पहिले बाजीराव “ पुस्तकातील जुन्या बखरीच्या नोदिनुसार ती निजामाच्या नाटकशाळेतील मुलगी. परंतु नागेश बापट यांनी ती बखर कोणती हे मात्र सांगितले नाही व अशी नोंद असणारी बखर प्रकाशित झालेली नाही. बापूसाहेब कुरुंदवाडकर यांनी १८९३ साली पेशवे बखरीतील आधारावर लिहिलेल्या “ भट्टवंश “ काव्यात तिला वेश्या म्हटले गेले.

एका आख्यायिकेनुसार “ एका रात्री मस्तानी निजामाच्या छावणीतून पळून पुरुष सैनिकी वेश धारण करून बाजीरावांच्या छावणीत दाखल झाली, मस्तानीच्या वडिलांना मारून तिच्या आईस निजामाने जनानखान्यात ठेवले तेथेच मस्तानीचे बालपण गेले. बाजीरावांच्या सौंदर्यावर भाळून ती त्यांच्या आश्रयास आली.(मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध)

एका आख्यायिकेनुसार “ मस्तानी हि छत्रसालराजाच्या असलेल्या वेश्येची मुलगी ती बाजीरावांवर भाळली तेव्हा राजा छत्रसाल यांच्या विनंतीवरून बाजीरावांनी तिचा स्वीकार केला.

मस्तानी हि छत्रसाल बुंदेला यांची अनौरस संतती असल्याचे देखील संदर्भ आढळून येतात. मराठा साम्राज्याची छोटी बखरीतील नोंदीनुसार मस्तानी कलावंतीण छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना दिली. राजा छत्रसाल यांच्या यांच्या दरबारातील लाल कवी याने लिहिलेल्या छत्रप्रकाश या काव्यात. बाजीराव पेशवेयांनी बुंदेलखंडातून जाताना मस्तानी नावाच्या मुसलमान युवतीस आपल्या बरोबर नेले असा उल्लेख करतो.

बांदेवाल्या नवाबाच्या वंशावळीतील नोंदीनुसार “ बाजीराव पेशवे यांनी राजा छत्रसालाच्या विनंतीवरून मुहमदशाह बंगश याचा युद्धात पराभव करून छत्रसालाचे राज्य राखले तेव्हा छत्रसालानी आपल्या राज्याचे तीन भाग करून एक भाग पेशव्याना दिला व आपल्या महालातील मस्तानी सुंदर नावाची सुंदर स्त्री दिली. इ.स. १८२१ साली साताऱ्याचे रेसिडेंट ब्रिगेडियर जनरल जॉन ब्रिग्ज यांनी अस्सल कागदपत्रावरून पेशवे सरदारांची वंशवर्णन पत्रिका म्हणजे वंशावळ तयार केली त्यातील नोंदीनुसार “ छत्रसालाने आपल्या राज्याचा व हिऱ्यांचा खाणीचा तीसरा भाग बाजीराव पेशव्यांना दिला तसेच मुस्लीम स्त्री पासून झालेली अनौरस मस्तानी नावाची मुलगी बाजीराव पेशवे यांना दिली.

उत्तर पेशवाईतील शाहीर प्रभाकर आपल्या पोवाड्यात गातो

गढमंडळ बुंदेलखंडल डंघईत अखंड राहून थंड सही केले / प्रतापे करून या जगात नाव मिळविले / बुडवूनिया बहाद्दरास , आणली घरास माषुक मस्तानी, //

समकालीन लाल कवीचे छत्रप्रकाश काव्य, बांदेवाल्या नवाबाची वंशावळ , साताऱ्याचे रेसिडेंट ब्रिगेडियर जनरल जॉन ब्रिग्ज यांनी अस्सल कागदपत्रावरून पेशवे सरदारांची केलेली वंशवर्णन पत्रिका यातील नोंदीनुसार मस्तानी ही राजा छत्रसाल यांची अनौरस कन्या असावी असा खात्रीशीर अंदाज करता येतो.

मस्तानीचे सौंदर्य –

मस्तानीच्या सौंदर्याविषयी जनमानसात उत्सुकता आढळून येते . पेशवे बखरीतील नोंदीनुसार “ मस्तानी फार नाजूक होती, तिने विडा खावून पीक गिळली तर दिसावी! तिचे पिस्वादिचे गुंडीस लाख रुपये किमतीचा एक हिरा होता. बांदेवाल्या नवाबाच्या वंशावळीत मस्तानीचे वर्णन “ कुबलसुरत “ असे केले आहे. मराठा साम्राज्याची छोटी बखरीतील मस्तानी खुबसुरत होती असे म्हटले आहे.

मस्तानीच्या सौंदर्याविषयी अवास्तव अफवा लोकमानसात असल्या तरी मस्तानी सुंदर होती हे निसंशय सत्य

मस्तानीचे चित्र –

मस्तानीचे चित्र म्हणून राजा केळकर संग्रलयातील तर दुसरे चित्र नाना फडणवीस यांच्या मेणवली येथील वाड्यातील चित्र मस्तानीचे चित्र म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु सदर प्रकाशित होणारी चित्रे हि मस्तानी यांचे नसून कोणी अन्य स्त्रियांचे आहेत.

मस्तानीचे विश्वाहार्य चित्र उपलब्ध नाही.

मस्तानी व बाजीराव यांचा विवाह –

मस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या विवाह झाल्याच्या नोंदी उपलब्ध नाहीत. मस्तानीचा विवाह कट्यारीसोबत झाला असावा परंतु त्यास आधार नाही. पेशव्यांच्या देवघरात मस्तानीचा टाक तसेच चिमाजीअप्पा यांच्या पत्नी व माधवराव पेशवे यांच्या पत्नींचा टाक असल्याची नोंद आढळते ,त्याआधारे मस्तानी सती गेली असावी व ती धर्मपत्नी असावी असा निष्कर्ष काढता येतो

प्रमोद ओक लिहितात “ सती जाण्याचा अधिकार हा धर्मपत्नीशिवाय दासी, उपस्त्री , रखेल यांनादेखील होता. “ धर्मपत्नीचा टाक देवघरात असावा असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही. धर्मपत्नी नसलेल्या स्त्रियांचे देखील टाक ठेवले जात .

मस्तानीचा विवाहिक दर्जा हा मुद्दा अनिर्णीत आहे.

मस्तानी व पेशवे कुटुंब यांचे संबंध –

मस्तानी हि बाजीरावानबरोबर पुण्यास आली तेव्हा ती १५ वर्षाची असावी. मस्तानीस १७३६ साली शनिवारवाड्याच्या जवळ मस्तानिच्या निवासासाठी वास्तू बांधण्यात आली. मस्तानीला दोन मुले झाली परंतु ती राहिली नाहीत . एक पुत्र झाला त्याचे नाव समशेरबहादूर ठेवले. मस्तानीचे दोन मुले होती व ती राहिली नाहीत असा उल्लेख “ बाजीराव बल्लाळ पेशव्यांची बखर “ यात येतो परंतु त्यास अन्य कोणताही विश्वासू आधार नाही. मस्तानी बाजीरावासोबत मोहिमेवर जात असावी. मस्तानीस घोडेस्वारी व तलवारबाजी येत होती. मस्तानीस नृत्याची आवड होती कृष्णाष्टमीच्या उत्सवात मस्तानी नृत्य करीत असे.

बाजीरावांच्या गैरहजेरीत मस्तानीस सौ. काशीबाई पेशवे यांचा आधार वाटे. नानासाहेबांचा कारकून २७ नोहेंबर १७३७ च्या पत्रात लिहितो “ सौभाग्यवती काशीबाई व मस्तानी यांकडे न्यूनता होत नाही. दिवसेंदिवस अधिकताच आहे. “

मस्तनीच्या सहवासामुळे बाजीरावास मद्याची व मांस भक्षणाची सवय जडली असा आरोप मस्तानीवर करण्यात आला. अश्या आशयाचे पत्र चिमाजी आप्पा यांनी नानासहेब यांना लिहिले, परंतु मस्तानी हि प्रणामी पंथाची अनुयायी होती व या पंथात मद्य व मांसाहार निषिद्ध आहे. बाजीराव हे अठरा पगड जातीच्या सैनिकांसोबत वावरत असत त्यामुळे हि सवय त्यांना त्यांच्या सहकारी लोकांकडून लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध –

मस्तानीमुळे बाजीरावांचे स्वराज्यातील मोहिमेत व राजकारणात लक्ष नाही असे राधाबाई , चिमाजी अप्पा व नानासाहेब यांचा समज होता. पेशवे बखर व २६ जानेवारी १७४० च्या पत्रात शाहू महाराजांची मर्जी बाजीरावांवर मस्तानीमुळे फार अप्रसन्न झाली असा उल्लेख आहे. बाजीरावांच्या गैरहजेरीत नानासाहेब यांनी मस्तानीशी स्नेह व मैत्री वाढवावा जेणेकरून त्याचा बोभाटा होऊन बाजीरावाच्या मनात मस्तानिच्या निष्ठेविषयी शंका निर्माण होऊन मस्तानीस सोडून देतील असा कट करण्यात आला. १९ ऑगस्ट १७३९ च्या पत्रात मस्ताणी व नानासाहेब यांच्यात मित्रत्व जडल्याचे उल्लेख आहेत परंतु मस्ताणीस खरा हेतू समजताच त्यांचे मित्रत्व टीकले नाही व मस्तानीने नानासाहेबाना विरोध केला.

छत्रपती शाहू महाराज यांनी नानासाहेब यांना पत्र लिहून “ राऊची वस्तू त्यास द्यावी त्याचे समाधान करावे. दुर्वेसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही. त्याच्या चित्तात पश्चाताप होऊन टाकतील तेव्हाच जाईल.ऐसे असता या वस्तूस अटकाव करू नये सखा तोडू नये” असा महत्वाचा सल्ला दिला.

पुरंदरे रोजनिशीतील नोंदीनुसार मस्तानीस पहिली नजर कैद १७३९ साली झाली. परंतु रात्रीच्या वेळी मस्तानीने स्वतःची सुटका करून घेतली व पाटसला बाजीरावांकडे आली मस्तानीच्या सहवासामुळे बाजीराव विलासी बनले. अखेर आई राधाबाई हिच्या सल्याने बाजीरावांनी मस्तानीला पुण्यास पाठविले व नासीरजंगच्या मोहिमेवर रवाना झाले.

नानासाहेबांनी मस्ताणीस कैद करण्याची दुसरी योजना आखून ती अमलात आणली. २६ जानेवारी १७४० च्या पत्रात नानासाहेबांनी चिमाजीअप्पाना मस्तानीस कैदे केल्याची हकीकत वर्णन केली आहे. सदर पत्रात मस्तानीपायी नासरजंगचा मनसबा बुडाला. व राजाची मर्जी गेली व रायाभोवती चौकी केली पाहिजे असा आशय आहे.

मस्तानीस कैद करण्याचा निर्णय बाजीराव व मस्तानी यांना परस्परांपासून वेगळे ठेवण्यासाठी परीस्थीतीवश घ्यावा लागला.

मस्तानीच्या मृत्यू

बाजीरावानी नासीरजंगाचा पराभव करून पुढील मोहिमेस सुरवात केली एप्रिल १७४० च्या सुमारास बाजीरावांचा मुक्काम रावेरखेडी येथे असताना २८ एप्रिल १८४० रोजी त्यांचा मृत्यू झाला. मस्तानीच्या मृत्यू विषयीदेखील विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. रियासतकार लिहितात “ बाजीरावाच्या निधनाची बातमी आली. ती ऐकताच तिचा प्राण गेला. , पुणे ग्याझेटियरमध्ये विधान आहे कि मस्तानीचा मृत्यू शानिवारवाड्यात झाला. तेथून तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेवून पुरले. कित्येकांचे मते, ती पुण्यातून निघून बाजीरावांकडे जाता असता, पाबळ येथे तिला त्याच्या मृत्यूची बातमी कळली आणि तिने प्राण सोडला. याचाच अर्थ तिने सहगमन केले.

मस्तानीने हिरकणी खाऊन अथवा काळजात कट्यार खुपसून मृत्यू पत्करला असावा असे मत द.म.गोडसे “ मस्तानी “ या पुस्तकात लिहितात.

मस्तानीच्या मृत्यूबद्दल विश्वासाहार्य व स्पष्ट नोदी आढळून येत नाहीत. पाबळ येथे असणारी कबर हि मस्तानीची असावी परंतु त्यास देखील ठोस संदर्भ नाहीत.

मस्तानीच्या आयुष्यतील घडामोडी पाहता मस्तानी हे एक न उलगडलेले कोडेच.मस्तानी रहस्यमय व्यक्तिवेध

श्री नागेश सावंत

संदर्भ :- पेशव्यांची बखर
ऐतिहासिक बखरी खंड २ :- अविनाश सोहनी
पेशवे पहिले बाजीराव :- नागेश बापट
मस्तानी :- दत्तात्रय गणेश गोडसे
पेशवे घराण्याचा इतिहास :- प्रमोद ओक
मस्तानी एक शोध :- संजय घोडेकर
ऐतिहासिक चर्चा :- इतिहाससंग्रह
ऐतिहासिक पोवाडे :- न.ची. केळकर
पेशवे दफ्तर

Leave a Comment