माथेरान … माकडे, माणसे आणि मराठी !
माथेरान हे सुमारे २५०० फूट उंचीवर वसलेले खूप वैशिष्ठयपूर्ण असे थंड हवेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ असलेले, पूर्ण मातीचे रस्ते असणारे, घनदाट झाडीने व्यापलेले, १९०७ मध्ये बांधलेली आणि अजूनही चालणारी छोटी रेल्वे गाडी असलेले असे माथेरान ! गर्द झाडीतून पळणारी छोटीशी रेल्वे गाडी लहान मुलांना खूप आवडते. अन्य मार्गांनीही तिथे जायला तसे सोपे आहे. चहाच्या छोट्या टपरीपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्व सेवा येथे उपलब्ध आहेत.
इथले घनदाट अरण्य, फुलझाडे, फळझाडे यांना वसंत आल्याची चाहूल कधीच लागली आहे. त्यांना कालनिर्णयचे पान उलटण्याची वाट पाहावी लागत नाही. सुंदर नवी पालवी, सुवासिक फुलांनी बहरलेले वृक्ष, हिरवीगार झाडी आपल्याला खुणावते, सुखावते. पण माथेरानच्या या निसर्गाला शहरीकरणाचे चटके जाणवू लागलेले आहेत. येथील वन्यसृष्टीचा विचार केला तर माणसांच्या आधीपासून येथे वसलेली माकडे आणि विविध पक्षी हे इथले मुख्य मूळ वननिवासी ! त्यांच्या या राज्यात माणूस हा त्यांच्याच डोक्यावर जाऊन बसलाय. येथील माकडांचे नैसर्गिक खाद्य म्हणजे फळे .. ती तर आता खूप कमी झाली आहेत. तरीही येथे लहान मोठी मिळून सुमारे २५० ते ३०० हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडून रोज फेकून दिले जाणारे खाद्य पदार्थ हेच आजवर या माकडांचे मुख्य अन्न झाले होते. सगळं कसं सुरळीत चालू होतं. पण स्वच्छतेच्या आदर्श नियमांप्रमाणे, इथल्या नगरपरिषदेने आता असे खाद्य पदार्थ फेकण्यावर बंदी आणली असून प्रत्येक हॉटेलचा ओला व सुका कचरा वेगळा बांधून नेला जातो. खरेतर हे अगदी योग्य पाऊल आहे. पण परिणामी ही मर्कटप्रजा मात्र वैतागली आहे. त्यांची उपासमार होते आहे. त्यामुळे आता ही भुकेलेली माकडे, अन्नासाठी अधिक धारिष्ट्याने कुठेही घुसतात. पूर्वी एकदा काळोख पडला की समोर कितीही अन्नपदार्थ दिसले तरी ही माकडे झाडावर चिडीचूप बसून राहायची. पण आता अगदी उशिरा रात्रीसुद्धा हॉटेलचे भटारखान्यातील पदार्थ , पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ, दुकानांच्या कॉउंटर्सवरील माल यावर डल्ला मारतात. जे मिळेल ते खातात. मोठमोठ्या हॉटेल्सनी तरणतलाव बांधले आहेत. ही माकडे तेथील क्लोरीन मिश्रित पाणी पितात. ( कृपया सोबतची छायाचित्रे पाहावीत ). ….
माणूस आणि माकडे यांच्यामध्ये एक विचित्र खेळ सुरु आहे. कांही गावात , भटके कुत्रे येऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकच्या बाटल्यात लाल रंगाचे पाणी भरून ठेवलेले पाहायला मिळाले होते. माशा आणि कीटक यांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्यात पाणी भरून ( त्यात एखादे नाणे टाकून ) त्या टांगलेल्या पाहिलेल्या आहेत. तसे माथेरानमध्ये माकडांना घाबरवायला ठिकठिकाणी कापूस भरलेले मोठमोठे वाघ ठेवले आहेत. आता माकडांच्या बंदोबस्ताला वाघोबा म्हणजे जरा जास्तच होतंय, पण ही माणसांची आयडिया ! हॉटेलात भाज्यांच्या शेजारी वाघोबा, पावभाजीच्या तव्याशेजारी वाघोबा, डायनिंग टेबलवर वाघोबा …. या वाघोबाला शिमग्याचे सोंग बनवून टाकलंय ! पण माकडे म्हणजे याच माणसांचे पूर्वज ना ! ती कांही दिवस या नकली वाघोबाला घाबरली पण आता बिंग फुटल्याने तीच माकडे त्या वाघोबासमोरच धिंगाणा घालतात. वाघोबा बिचारे पहारा देऊन कंटाळलेत !
इथल्या माकडांनी साजरी केलेली मजेदार बर्थडे पार्टी आम्हाला पाहायला मिळाली. येथे एक तरुण मुलींचा ग्रुप, त्यातील एकीचा वाढदिवस साजरा करायला आला होता. खूप मोठ्ठा महागडा केक असलेला बॉक्स ( त्याची किंमत ३००० रुपये होती असे मला त्यांच्याकडून कळले ) घेऊन त्या रेल्वेच्या रुळांवरून चालल्या होत्या. माकडांच्या एका गटाने, डल्ला मारून तो केक ताब्यात घेतला. मुली खूप घाबरल्याने त्यांनी तो मुकाट्याने ताब्यात देऊन टाकला. ३००० रुपयांचा केक त्या माकडांनी ३ मिनिटात पूर्ण फस्त करून त्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. ( छायाचित्रे पाहावीत ).
माथेरानची चिक्की आणि चपला प्रसिद्ध आहेत. तसेच घोड्यावरून रपेट फार महत्वाची आहे. पर्यटकांसाठी शेकडो घोडे उपलब्ध असतात. वाहतूक पोलीस शहरातील टॅक्सी, रिक्षा यांचे जसे पासिंग करतात तसे येथे घोड्यांचे पासिंग केले जाते. घोड्याची प्रकृती, फिटनेस पाहून तो वापरण्याची मालकाला परवानगी दिली जाते. तसा परवाना क्रमांक त्या घोड्याच्या जीनवर लिहिला जातो.
येथे आता विविध कामांवर, मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यातील तरुण दिसू लागले आहेत. कित्येक हॉटेलमध्ये स्पा, आयुर्वेदिक मसाज अशा विविध सोयी उपलब्ध केल्या जात आहेत. यासाठी छत्तीसगढ सारख्या राज्यातून मुली आल्या आहेत. जवळपास सर्व मोठ्या हॉटेल्सचे मालक दुसऱ्या राज्यातील आहेत. त्यांनी नोकरीसाठी आपापल्या राज्यातून माणसे आणली आहेत. मराठी माणसे या नोकऱ्या का करू शकत नाहीत ? …. या सगळ्याचा परिणाम म्हणून माथेरानमधून मराठीची जोरदार हकालपट्टी सुरु आहे. मोठ्या हॉटेल्सनी त्यांच्याकडे गुजराथी, काठियावाडी, मारवाडी, पंजाबी, चायनीज, पारसी, गोवन भोजन मिळेल असे मोठमोठे फलक झळकावले आहेत. ते पाहिल्यावर असे वाटते की इतक्या प्रकारचे जेवण महाराष्ट्रातील माथेरानमध्ये मिळते हे सांगण्यापेक्षा, आमच्याकडे महाराष्ट्रीय जेवण मिळत नाही हे सांगण्यासाठी तर ही जाहिरात नसेल ना ?
माथेरानसारख्या माकडांच्या राज्यात माकडेच जशी केविलवाणी झाली आहेत तशी आपल्याच महाराष्ट्र राज्यात मराठी माणूस, भाषा, संस्कृती केविलवाणी होत आहे. पण याचा दोष परप्रांतीयांना तरी कसा देणार ? आमचे दोन भाऊ एकमेकांना टाळी द्यायला तयार नाहीत. कुठल्या पक्षात जाऊन ” आपली सीट ” कशी राखायची यात आमचे नेते बिझी आहेत. लाखो रोजगार उपलब्ध होऊनही आम्हाला फक्त नोकरी म्हणजेच रोजगार वाटतो. अत्यंत कष्टाळू असलेल्या मराठी तरुणांना, आपली अनेक नेते मंडळी ‘ बाऊन्सर्स ‘ बनवून त्यांची काम करण्याची वृत्तीच मोडून काढतायत.
माथेरान … माकडे, माणसे आणि मराठी, सगळंच कसं विस्कळीत होत चाललंय !
माहिती साभार – Makarand Karandikar