मावळ म्हणजे काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करण्यापासून त्याचा विस्तार करण्यापर्यंत पुण्याच्या आसपास असणाऱ्या मावळातल्या देशमुख-देशपांडेंची अत्यंत मोलाची साथ लाभली. शास्ताखान प्रकरण असो किंवा पन्हाळगड ते विशाळगड असो, काटक असणाऱ्या मावळ्यांची साथ त्यांना कायमच लाभली. अफजलखान प्रकरणात मावळातल्याच कान्होजी जेध्यांनी वतनावर पाणी सोडल्याचं तर सर्वश्रूतच आहे. अत्यंत काटक, शुर, कर्तबगार आणि विश्वासू मावळे ज्या भागातील असत ते मावळ म्हणजे काय ? तेथील कर पध्दती, असणारे किल्ले त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.
डोंगररांगा –
सह्याद्रीची मुख्य रांग जी ‘दक्षिणोत्तर’ पसरलेली आहे तिला ‘पुर्व-पश्चिम’ काही उपरांगा जोडलेल्या आहेत. अशा या बहूतांशी रांगांना नावे आहेत. जसं भुलेश्वर रांग (ज्यावर आपला सिंहगड आहे), सर्वात मोठी उपरांग असणारी महादेव, बाळेश्वर, शैलबारी-डौलबारी, अजिंठा-सातमाळ इत्यादी. यात फक्त दोन अपवाद इतकेच कि दातेगड रांग आणि भाडळी-कुंडल ही महादेव उपरांगेची उपउपरांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर म्हणजे दक्षिणोत्तर धावतात.
अजून सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या अभ्यासाच्या वहीचं पान असतं हे तद्वतच आहे. म्हणजे समासाची रेघ म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग, त्याच्या उजव्या बाजूच्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या उपरांगा आणि समासाच्या डाव्या बाजूच्या रेघा म्हणजे कोकणात उतरलेले दांड आहेत ज्या वरून अनेक घाटवाटा कोकणात उतरत जातात. झालं कि नाही सोप्प.
नद्यांची खोरी –
पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या उत्तरेकडील म्हणजे नाशिक भागातील सर्व नद्या गोदावरीला मिळतात तर दक्षिणेकडील महादेव रांगेपर्यंतच्या सर्व नद्या भीमेस मिळतात आणि महादेव रांगेच्या दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे कोल्हापूर जवळच्या सर्व नद्या कृष्णेला. महाराष्ट्रात गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन नद्यांची खोरी आहेत. परंतु भीमा नदी पुढे जाऊन कृष्णेलाच मिळत असल्याने मुख्य नद्या दोनच आहेत, एक त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी आणि दुसरी महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा. कारण या दोनच नद्या अशा आहेत कि त्या उगम ज्या नावाने पावतात त्याच नावाने समुद्राला मिळतात.
ऐन मावळात –
सर्वसाधारणपणे भीमेच्या खोऱ्यात असणारा म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या दक्षिणेकडील आणि महादेव रांगेच्या उत्तरेकडील भाग म्हणजे मावळ. मावळ हे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन पश्चिमेकडील काही भागात पसरलेलं आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणारा प्रदेश हा मावळात मोडतो. दोन उपरांगां दरम्यान असणाऱ्या नदीच्या क्षेत्रात नाचणी, वरई, भात इत्यादी पावसाळी पिकं पिकवली जातात. अशी परिस्थिती असणाऱ्या प्रदेशाला ‘मावळ’, ‘खोरं’ किंवा ‘नेरं’ अशा संज्ञा आहेत.
मावळांची नावं –
अशा मावळांना तिथून वाहणाऱ्या नदीच्या किंवा त्या भागात असणाऱ्या मुख्य गावाच्या नावाला साधर्म्य सांगणारी नावं आहेत. किंवा असं म्हणा हवंतर कि मावळांची नावं तिथं असलेल्या नदीच्या वा गावाच्या नावावरूनच आली आहेत. जसं पवनेचं ‘पवन मावळ’, पौड गाव असणारं ‘पौड खोरं’ तर भीमेचं भीमनेर, भामाचं भामनेर इत्यादी.
प्रशासकीय व्यवस्था –
जिल्ह्याचा मुख्य जसा जिल्हाधिकारी तसा मावळांचा मुख्याधिकारी असे ‘देशमुख’. जणु त्या मावळाचा राजाच. देशमुख त्याच्या मावळातला सरकारने ठरवून दिलेला शेतसारा गोळा करीत असे आणि त्यातील काही हिस्सा त्या भागाच्या संरक्षण व विकास यासाठी स्वतःकडे ठेवून, बाकी सरकारजमा करत असे. या कामासाठी देशमुखाकडे प्रशासकीय लोक असत. देशपांडे, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रशासकीय पदे त्या त्या कामासाठी नेमलेली असत.(कालांतराने हीच पदे आडनावं म्हणून रूढ झाली) चांगलं काम करणाऱ्या देशमुख घराण्याला राजाकडून किताब दिला जाई. जसं पासलकरांना ‘यशवंतराव’, जेधेंना ‘सर्जेराव’.
सैन्य आणि करवसुली –
मावळाच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगररांगांवर किल्ले असत आणि ते या देशमुखांच्या ताब्यात असत. त्याच्या संरक्षणासाठी ते स्वतःचे सैन्य वा पागा बाळगत असत. त्यामुळं त्यांचा तिथं राहण्याऱ्या लोकांवर दरारा असे. जे शेतकरी शेतसारा देत नसत त्यांच्याकडून तो वसुल करावा लागे आणि अशी कामे बहुतांशी ‘देशपांडे’ मंडळी करत असत. ‘देशपांडे’ लढवय्ये असल्याची दोन उदाहरणे आपल्या सर्वांना माहिती आहेतच. बांदलकडील बाजीप्रभू आणि मोऱ्यांकडचे मुरारबाजी.
एकुण मावळं –
पुणे हे मुख्य मावळ (कर्यात मावळ) असं समजलं तर त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे मावळतीकडचा भाग म्हणजे मावळ असं म्हणण्याचा प्रवाद आहे परंतु मावळांची ठिकाणं जाणून घेतल्यानंतर हा सिद्धांत चुकीचा ठरतो. पण पुण्याहून जुन्नरकडे जाताना फक्त ‘नेरं’च आहेत. भामनेर, भीमनेर, घोडनेर, मिन्नेर, कुकडनेर, जुन्नेर?, संगमनेर?, सिन्नेर?.
पुण्याखालची बारा मावळं आणि जुन्नर (जुने-नेर) खालील बारा, अशी चोवीस मावळं आहेत असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. पण माझ्या माहिती प्रमाणे ती बावीस आणि एक शिवतर अशी तेवीस आहेत ती पुढीलप्रमाणे दिलेली आहेत.
प्रथमतः खोऱ्याचे/मावळाचे/नेऱ्याचे नाव नंतर तिथे वाहणारी नदी, त्यात येणारे मुख्य गाव, असणारा किल्ला, देवस्थान, तेथील देशमुख आणि शेवटी त्याचा किताब या क्रमाने ती वाचावीत.
१) मढनेर – पुष्पावती नदी/ मांडवी नदी – मढ/ ओतुर – सिंदोळा – हटकेश्वर
२) कुकडनेर – कुकडी नदी – घाटघर/ जुन्नर – शिवनेरी/ चावंड – कुकडेश्वर
३) मिन्नेर – मिना नदी – नारायणगाव – नारायणगड
४) घोडनेर – घोड नदी – घोडेगाव/ मंचर – भीमाशंकर
५) भीमनेर – भीमा नदी – राजगुरूनगर – भोरगिरी – भीमाशंकर
६) भामनेर – भामा नदी – चाकण – संग्रामदुर्ग
७) अंदरमाळ(आंद्रा) – आंद्रा – सावळे – वडेश्वर – हांडे देशमुख
८) नाणे मावळ – इंद्रायणी – नाणे/ लोणावळे – लोहगड – कुंडेश्वर – गरूड देशमुख
९) पवन मावळ – पवना – पवनाळे/ चिंचवड – तुंग-तिकोना – वाघेश्वर
१०) कोरबारसे – आंबवडे
११) पौड खोरे – मुळा नदी – मुळशी – कैलासगड/ कोरीगड – बलकवडे देशमुख/ ढमाले देशमुख(राऊतराव)
१२) मुठे खोरे – मुठा नदी – मुठे – म्हसोबा(खारवडे) – मारणे(गंभीरराव)
१३) मोसे खोरे – मोसी नदी – मोसे – कुर्डुगड – पासलकर(यशवंतराव)
१४) आंबी खोरे – आंबी नदी – पानशेत
१५) कानंद मावळ – कानंदी नदी – वेल्हे – तोरणा – मरळ देशमुख(झुंजारराव)
१६) गुंजन मावळ – गुंजवणी नदी – गुंजवणे – राजगड – अमृतेश्वर – शिळीमकर देशमुख(हैबतराव)
१७) खेडेबारे खोरे – शिवगंगा नदी – खेड शिवापुर – बनेश्वर – कोंडे देशमुख(नाईक)
१८) वेळवंड खोरे – वेळवंडी नदी – भाटगर – ढोर देशमुख(अढळराव)
१९) हिरडस मावळ – नीरा नदी – हिरडोशी – कासलोटगड/ रोहीडा – बांदल देशमुख(नाईक)
२०) भोर खोरे – नीरा नदी – भोर – रायरेश्वर – जेधे देशमुख(सर्जेराव)
२१) कर्यात मावळ – मुठा नदी – पुणे – सिंहगड – पायगुडे देशमुख(रवीराव)/ शितोळे देशमुख
२२) घोटण खोरे – घारे देशमुख
२३) शिवतर खोरे – कोयना नदी – जावळी – प्रतापगड – मोरे देशमुख (चंद्रराव)
माझ्या मावळ म्हणजे काय ? या लेखात दिलेली माहिती परिपूर्ण नक्कीच नाही. खरंतर वर नमुद केलेल्या प्रत्येक मुद्यावर एकएक पुस्तक लिहिता येईल. केवळ विस्तारभयावह येथे देण्याचे टाळले आहे. याशिवाय हे देखील सांगू इच्छितो कि या प्रस्तुत लेखात असणारी माहिती शंभर टक्के खरी आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या जुजबी ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा राहून गेल्या असण्याची नक्कीच शक्यता आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून, जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकून, माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.
शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.
सावधचित्ते शोधावे, शोधोनी अचूक वेचावे, वेचोनी उपयोगावे, ज्ञान काही ||
दिलीप वाटवे