कवि भूषण आणि औरंगजेब भेट भाग १
भूषण कवीच्या वीर्यशाली कवितेचा प्रभाव इतका गाजला आणि त्याच्या बाणेदार स्वभावाची इतकी लोकचर्चा झाली की भूषणजींचे ज्येष्ठ बंधू चिंतामणि जे औरंगजेबाच्या दरबारी होते. त्यांच्या मार्फत त्यांचा औरंगजेबाच्या दरबारी प्रवेश झाला. औरंगजेब हा इस्लाम धर्माचा कट्टर अभिमानी खरा, परंतु पूर्वपरंपरेस धरून अकबरापासून मोगल दरबारी हिंदी कवि असण्याचा परिपाठ त्याच्या कारकीर्दीत सुटलेला नव्हता. चिंतामणी कवी शहाजहानच्या वेळेपासून त्याच्या दरबारी होते.
एके दिवशी औरंगजेबाने दरबारी कविंस प्रश्न केला की, तुम्ही जेव्हा तेव्हा प्रशंसा करिता परंतु माझ्या ठिकाणी काही दोष नाहीत का? माझ्यासाठी दोषांचे निवेदन करणारा तुमच्यात कोणी नाही का? त्याच्या प्रश्नाने दरबारी कवि चपापून गेले, कारण औरंगजेबाच्या मनात असे विचारण्यात काय कपट असेल? म्हणून ते साशंक होणे सहाजिक होते. स्तब्धतेचा एक क्षण असा ओसरताच; औरंगजेबाच्या इच्छेवरून औरंगजेबाच्या दरबारात त्याला भेटायला आलेला ‘कवी भूषण’ उठून उभा राहिला आणि औरंगजेबास म्हणाला कि, ” आलमगीर बादशहा स्तुती ही तर त्या देवालाही प्रिय असते. मग ती मनुष्याला प्रिय असावी यात नवल ते काय? तथापि दैवाच्या चमत्कारिक गोष्टी देवही ललाटात झाकून ठेवतो. म्हणून आम्ही कवी देखील फक्त ‘मोठ्यांचे मोठेपणच’ जगासमोर मांडीत असतो. पण आपण आता विचारलेच म्हणून मला सांगावे वाटते कि दोष सांगणारे पुष्कळ सापडतील पण ते दोष ऐकून घेणारा एकही ‘मर्द’ सापडणार नाही. आपण आपले दोष ऐकण्यास तयार असाल तर मीही आपले दोष सांगण्यास तयार आहे.”
औरंगजेबासारख्या बादशहासमोर त्याचे दोष सांगावयास कुटत असलेला हा निस्पृह कवी म्हणजे भूषणच. कवी भूषणच्या ह्या ‘शाब्दिक धाडसाचे’ औरंगजेबाला मोठे कौतुक वाटले; आणि औरंगजेबाने त्याला दोष दर्शविण्याची आज्ञा दिली. परंतु तरीही कवी भूषण ह्याने औरंगजेबास अभय-पत्र मागितले आणि त्यावर दरबारांतील ठाकूर, राव, वगैरे राजपुतांची ग्वाही घालून देण्यास सांगितले. औरंगजेबाने कवी भूषणची ही विनंती मान्य केली.आता कवी भूषण औरंगजेबाचे दोष सांगण्यास उभा राहिला, तसे सगळा दरबार त्याच्याकडे उत्साहित होऊन मोठ्या कुतूहलाने पाहू लागला. तर कवी भूषणाने म्हटलेली पहिली कविता अशी –
किबले कि ठौर बाप बादशहा शहाजहान, ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है |
बडो भाई दारा वाको पकरी कै कैद कियो मेहरहू नाहि मॉंको जायो सगो भाई है ||
बंधु तो मुरादबक्श बात चूक करिबेको, बीचले कुरान खुदाकी कसम खाई है |
भूषण सुकवि कहै सुनो नवरंगजेब एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ||
मराठी अर्थ :- तुझा पिता जो शहाजहान बादशहा त्याला तू कैद केलेस जणो मक्केला आग लावण्यसारखे हे तुझे कृत्य! वडील भाऊ दारा, त्याला तू धरून कैद केले परंतू तुझ्या हृदयात एवढीही दया उपजली नाही की हा माझा सख्खा भाऊ आहे. तुझा धाकटा भाऊ मुराद याला फसवण्याकरितां तू त्यांच्यांत आणि आपल्यात कुराण ग्रंथ ठेऊन ईश्वराजी शपथ वाहीली. भूषण कवि म्हणतात औरंगजेबा! ऐक इतकी पापे केली तेंव्हा तुला ही बादशाही मिळाली आहे.
(औरंगजेबाने मुराद जवळ वाहीलेली शपथ अशी की, ” तुला गादीवर बसवायचे व मला मात्र फकिर होऊन मक्केस जावयाचे!)
क्रमश:
संदर्भ – शिवराजभुषण (दु. आ. तिवारी)
संकलन – मयुर खोपेकर