मेटगुताड, गावाचं नाव नक्की कसं पडलं?
समाजव्यवस्थेच्या प्राचीन पद्धती हा नेहमीच माझ्या अभ्यासाच्या आवडीचा विषय राहिलेला आहे.इतिहासकालीन गावं किंबहुना त्या गावांची नावं हादेखील एक औत्सुक्याचा विषय आहे. पुणे,वाई,सातारा,कोल्हापूर अशा काही इतिहास प्रसिद्ध गावांची नावं कशी पडली याविषयी थोड्याफार प्रमाणात का होईना पण लिखित संदर्भ सापडतात.पण अशा अनेक छोट्या छोट्या गावांचं आणि आपलं रोज हितगुज होत असतं. पण त्या गावाचं नाव नक्की कसं पडलं हे समजून घ्यायला अगदी बोटावर मोजण्याइतकेच संदर्भ असतात. वाईहून महाबळेश्वरला जाताना वेण्णा लेकच्या थोडंसं अलीकडे ‘ मेटगुताड ‘ (Metgutad) नावाचं छोटंसं गाव आहे. या गावाची इतिहासकालीन माहिती नुकतीच वाचनात आली.
पूर्वीच्या काळी डोंगर ओलांडण्यासाठी निर्माण केलेले घाट म्हणजे दळणवळणाचं प्रमुख साधन होतं.या घाटाच्या सुरुवातीला आणि घाट संपत आल्यावर व्यापाऱ्यांच्या किंवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही चौक्या उभारण्यात येत.या चौकीमध्ये तो प्रांत ज्या राजवटीच्या अधिपत्याखाली असे त्या राजवटीचे अधिकारी नेमलेले असत.हे अधिकारी पगारी असत त्यामुळे त्यांना वाटसरूकडून कुठल्याही प्रकारचा कर घेण्याची सवलत नव्हती.यातील काही अधिकाऱ्यांनाच हा कर घेण्याची सूट मिळत असे.परंतु,हा कर किती घ्यायचा यावर सरकारचं नियंत्रण होतं.अशा चौकीला ‘ मेट ‘ असं नाव होतं आणि इथे असलेल्या अधिकाऱ्याचा ‘ मेटकरी ‘ या नावाने उल्लेख केला जाई.
गुताड गावाच्या सुरूवातीला अशीच एक मेट होती.प्राचीन पारघाटाची ही सुरूवात असल्याने ही मेट इथे बसवण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.याच आशयाचा एक पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडतो.त्या कागदातील मजकूर पुढीलप्रमाणे :
‘ पारघाटी श्री वरदायिनीस दर बैलास यक रुका द्यावा.याखेरीज जकातीवर कोन्हाचा हक नाही.मेटकरी पारघाटी ठेविले ते दिवानचे चाकर त्यास हक नाही तेच तळ्याचे मेटकरी त्यासही हक नाही व गुथाडचे मेटकरी बहुळकर यांनी रखवाली करावी.यानिमित्त हर बैली रूका यक द्यावा.याखेरीज कोण्ही हकदार नाही. ‘
याचा अर्थ असा की, श्री रामवरदायिनी देवीसाठी बैलामागे एक रुका कर घ्यावा.याखेरीज कुठलाही हक्क पार घाटाचे मेटकरी,तळ्याचे चाकर यांना नाही. गुताड गावाचे मेटकरी बहुलकर यांनी मात्र बैलामागे एक रूका घ्यावा.इतरांना तो हक्क नाही.किंबहुना बहुळकरांनादेखील याव्यतिरिक्त कुठलाही कर घेण्याचा अधिकार नाही.हे पत्र जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या कारकिर्दीतील आहे.
तात्पर्य हेच की पारघाटाच्या सुरुवातीला असलेल्या गुताड गावापाशी असलेली चौकी अर्थात मेट म्हणून त्या गावाचं नाव मेटगुताड.महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच हे गाव आजही आहे.गावाच्या सुरुवातीलाच ‘ मेटगुताड ‘ असं लिहिलेली पाटीदेखील वाचायला मिळते.असा एखादा संदर्भ वाचनात आला की आपल्या नेहमीच्या वाटेत असणाऱ्या एखाद्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो हे मात्र निश्चित.
संदर्भ :
शिवचरित्र साहित्य : खंड ५.
मराठा कालखंडातील नगरविकास : डॉ.अविनाश सोवनी सर.
© आदित्य माधव चौंडे.