एक दुर्लक्षित सरसेनापती | म्हाळोजी घोरपडे…
म्हाळोजी घोरपडे – हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणं हे काही खायचं काम नाही, त्यासाठी अफाट शौर्य, निस्सीम त्याग, स्वामिनिष्ठा अन अथांग असा पराक्रम गाजवावा लागतो, त्यावेळी सरसेनापती ही जबाबदारी म्हणजे एक काटेरी माळ गळ्यात पडते.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ती सातारा जिल्ह्यातील वाई जवळ. या युद्धात सर्जाखान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता, परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातिर्थी पडले. १६ डिसेंबर १६८७ साली हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. आणि स्वराज्याने एक महापराक्रमी स्वामिनिष्ठ सेवक गमावला. स्वराज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजीराजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला.
यापुढे
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक साधनांत घोरपडे घराण्याच्या विषयी पूढील माहिती आढळते. वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीरराव मोहित्यांचा काळ झाला अन स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले. यानंतर संभाजी राजांनी म्हाळोजी घोरपडे यांस सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यानं सरनोबतीची वस्त्रे दिली. आणि म्हाळोजी बाबा स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून रुजू झाले.
तत्पूर्वी आपण घोरपडे घराण्याचा इतिहास पाहुयात.
मूळचे सिसोदिया वंशीय असणाऱ्या घोरपडेंना घोरपडे आडनाव मिळण्यामागे एक इतिहास आहे. पंधराव्या शतकात बहामनी सत्तेत चाकरी करत असताना कर्णसिंगने कोकणातील एका गडावर स्वारी करताना घोरपडीचा वापर करून किल्ला सर केला. तेव्हा बहामनी राजाने कर्णसिंगला ८४ गावांसह मुधोळ, रायबाग अन वाई प्रांत हे प्रांत व राजा घोरपडे बहाद्दर हा खिताब दिला. तसेच युद्धप्रसंगी घोरपड्यांना घोरपडीच्या कातड्याच्या रंगाचे निशाण दिले. अन तेव्हापासूनच घोरपडे हे उपनाम प्रचलित झाले.
म्हाळोजी घोरपडे शहाजीराजेंसोबत आदिलशाहीत सरदार होते. त्यांना वतन वगैरे मान आदिलशाहकडून मिळाला होता. पण जेव्हा शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं ठरवलं, तेव्हा एक विचार होऊन म्हाळोजी अन शिवरायांच्यात तह झाला अन त्या अन असा तह हा बेलभंडारा हाती घेऊन झाला. अन ,पाचशे मावळ्यांसह ते किल्ले पन्हाळ्यावर स्वराज्यसेवेत रुजू झाले.
शिवरायांच्या अनेक युद्ध मोहिमांमध्ये म्हाळोजी बाबांनी महत्वाची भूमिका बजावली, पण दुर्दैवाने इतिहासकारांकडून त्याचे योग्य ते मूल्यमापन नक्कीच होऊ शकले नाही ही खूपच खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.
म्हाळोजी जेव्हा आदिलशहाच्या पदरी होते तेव्हा त्यांच्याकडे वाई परगण्यातील विटे, भांगी, भाळवणी या गावांची देशमुखी होती. ही वतने त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेली होती. म्हाळोजी घोरपडे यांचे वास्तव्य भाळवणी येथे होते विटा-इस्लामपूर मार्गावर भाळवणी हे गाव वसलेले आहे. गावच्या पश्चिमेला एक नदी वाहते. या गावात आजही घोरपड्यांचा वाडा म्हणून एक भग्न वास्तू दाखवली जाते. तेथील येरळा नदीच्या तीरावर वांगी अन पश्चिमेला न्हावी ही गावे आहेत. या दोन्ही गावात घोरपड्यांचा एक एक वाडा आहे. त्यामानाने भाळवणी येथील वाडा विस्ताराने बराच मोठा होता.पूर्वी रीतच होती की त्याकाळातील मातब्बर सरदार जहागिरीच्या प्रत्येक गावात किमान एक वाडा बांधत असत.
शिवकाळात म्हाळोजी बाबा हे पन्हाळ्यावर तटसरनोबत म्हणून काम पाहत होते.१६८० साली जेव्हा शिवरायांच्या युद्धनीतीनुसार संभाजी राजांना जेव्हा दिलेरखानाकडे गेले अन नंतर परत जेव्हा पन्हाळगडावर आले तेव्हा महाराजांनी त्यांची पूर्ण जबाबदारी म्हाळोजी बाबांवर सोपवली होती. म्हाळोजी बाबा हे शिवरायांच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी होते.
आता १६८८ पर्यंत संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा वारू हा चौफेर उधळत होता, सर्वच शत्रूंना मराठा फौजेने पाणी पाजले होते. औरंगजेबाने सर्व प्रयत्न करून पाहिले पण तो सपशेल फेल ठरला. मैदानी लढाईत आपण संभाजीराजांना पराभूत करूच शकत नाही हे जणू औरंगजेबाला समजले. अन त्याने कपटाने शंभुराजांना कैद करण्याचा डाव आखला. त्यासाठी त्याला काही मराठा सरदारांची साथ हवीच होती, त्यामुळे त्याने काही नाराज सरदारांना सत्तेचे आमिष दाखवून आपल्या सोबत करून घेतले.
आता हे शंभुराजांना पकडून देणारे सरदार कोण होते, ते नातेवाईक होते का, त्यांनी असे का केले याबद्दल इतिहासात अनेक मतांतरे आहेत. किंवा हा इतिहास चुकीचा लिहला गेला अन त्या व्यक्तिमत्वाची बदनामी केली गेली असा सुद्धा आरोप होतो. यात तथ्य असेलही किंवा नसेलही. तूर्तास या विषयाकडे आपण नंतर पाहू.
तर स्वराज्यात खूपशा घडामोडी घडत होत्या. काही केल्या औरंगजेबला स्वराज्यातील एक खण सुद्धा घेता आला नव्हता त्यामुळे त्याने काव्याने चाल खेळली. त्याने आपला सरदार मुकर्रबखान म्हणजेच शेख निजाम व त्याचा मुलगा इखलासखान याला २५००० एवढी खडी जंगी फौज देऊन पन्हाळा भागात पाठवलेले.
तिन्हीसांजेचा वारा वाहत होता अन खानाचा तळ होता केरल्याच्या माळावर. त्यावेळी त्याच उद्दिष्ट होत की समोर असलेला पन्हाळा काबीज करायचा. कारण फौजी हालचालीच्या हा किल्ला एकदम मोक्याचा होता. एकदा पन्हाळा ताब्यात आला की मागे मसाईच पठार, दूरची घोडखिंड अन अन विशाळगड ते आंबाघाट हा सारा मुलुख सहज मुघली अधिपत्याखाली आला असता. त्यावेळी सुद्धा मुकर्रबखानाने काही मराठा सरदारांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते आणि पन्हाळ्याभोवती अजगराने वेटोळे घालायला सुरुवात केली.
संभाजीराजांना ही खबर समजली की संभाजीराजे अन कविकलश हे पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले गडाखाली असणाऱ्या मोगली फौजा त्यांनी कापून काढल्या. अन गडावर येताच त्यांनी फितुराना गिरफतार केले. प्रल्हादपंतांना अटक केली अन राजद्रोही येसाजी अन शिदोजी फर्जंद यांचा कडेलोट केला व पन्हाळा वाचवला.
पन्हाळा हातचा गेल्याचे दुःख काही निजामाच्या चेहऱ्यावरून जात नव्हते. औरंगजेबाने देखील पत्र लिहून त्याची कानउघडणी केली.त्यानंतर काही दिवस शांततेत गेले. अन इकडे हेरांकडून खानाला खबर मिळाली की “रायरीचा जहागीरदार संभा हा रायगड सोडून खेळण्याच्या मुलखात एकटाच वावरत आहे अन आपल्या किल्ल्यांची डागडुजी करण्यात मशगुल आहे. सोबत फौज पण खूप कमी आहे, सही मोका आहे, संभा ला गिरफतार करावे.“
संभाजी राजे त्यावेळी पन्हाळ्यावरून किल्ल्यांच्या पडलेल्या बुरुजांचे बांधकाम करवून घेत होते.अन तेवढ्यात राजांना एक वाईट खबर समजली की एतिकाद खानाने रायगडाला वेढा दिलाय. अन राजांच्या काळजाचा ठोका चुकला, राजधानी धोक्यात आहे, महाराणी गडावर आहेत, बाळराजे गडावर आहेत, आपण निघायला पाहिजे.
त्यावेळी पन्हाळ्यावर म्हाळोजी बाबा आणि राजांनी अनेक विषयांवर चर्चा केल्या. म्हाळोजी बाबांसोबत त्यांचे दोन पुत्र संताजी व बहिर्जी होते. ते सुद्धा खूप पराक्रमी होते.आणि सरनोबत म्हाळोजी घोरपडे यांचा निरोप घेऊन राजे पन्हाळ्यावरून विशाळगडावर गेले व तिथून रायगडाकडे निघाले. जाताना राजांनी सेनापतींना पुढील चाली काय खेळायच्या या सूचना दिल्या व राजे गडउतार झाले.
राजे निघाले ते संगमेश्वराच्या वाटेवरून. जंगली वाट, अनेक कडेकपाऱ्या असा बिकट मार्ग राजांनी निवडला. वाटेतच संगमेश्वर येथे राजांनी मुक्काम करायचे ठरवले अन राजे थांबले.
आता संभाजीराजे हे संगमेश्वराच्या वाटेवरून रायगडी निघालेत ही खबर मुकर्रबखान याला मिळाली अन तो पाच हजारांची फौज घेऊन संगमेश्वराच्या वाटेकडे निघाला. रात्रीचाच, घाटवाटा ओलांडत, घनदाट जंगल, कडेकपाऱ्या तोडत फौज निघाली. तीन रात्रीचा रस्ता तोडत खान सुद्धा संगमेश्वराकडे निघाला.
त्याने रात्रीचाच पन्हाळा ओलांडला. पन्हाळा अंधारात अदृश्य झालेला. पन्हाळ्यावरील पहारेकर्यांना गनीम फौजेच्या पलीत्यांचा उजेड दिसला अन पहारेकरी धावत म्हाळोजी बाबांकडे गेले. त्यावेळी म्हाळोजी बाबा गाढ झोपेत होते. अन बेंबीच्या देठापासून पहारेकरी ओरडला, म्हाळोजी बाबा, काळोख उजळत पलीत चालल्याती, संगमेश्वराच्या रोखाने. अन सेनापतींच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी आपल्या सैन्याला आवाज दिला, आर गनिमान डाव साधला, राज हायत तिकडं आर राजांचा जीव धोक्यात हाय, आपल्याला निघायला हवं. शिबंदी उठवा, राजांची जान वाचली पायजे. गपक्यास संगमेश्वर जवळ करायला पायजेल गडयांनो घाई करा. अन पाचशे मावळ्यांचे माणूसबळ घेऊन सेनापती संगमेश्वराकडे निघाले.
राजांसोबत सुमारे दोन हजारांचे सैन्य आजूबाजूला तळ ठोकून होते. अन राजे सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामी थांबले होते. राजांना एक खबर मिळाली की “राजे घाट झाला, गनीम चालून येतोय, स्वारांचा लोंढा संगमेश्वराकडे येतोय.” तेवढ्यात म्हाळोजी बाबा देखील संगमेश्वरला येऊन पोचले अन बोलले, “राज तुम्ही निघा, नावडी जवळ करा. गणिमानी गाव येरबाडलय राज, आम्ही नडतो गनीमाशी, तुम्ही रायगड जवळ करा. लाख मेलं तरी चालत्याल पण लाखांचा पोशिंदा वाचला पायजेल राजे, निघा तुम्ही, भांगा करा.” पण राजांनी सेनापतींना स्पष्ट नकार दिला. आम्ही लढाईपासून पळणार नाही. आम्ही इथेच झुंजू, इथंच मरु पण रण सोडून कधीही पळणार नाही.
त्याच वेळी मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला येऊन भिडली. इकडे विखुरलेले घोडेस्वार पटापट आपल्या घोड्यांवर बसले. राजेही चंद्रावत या घोड्यावर बसले व लढाईसाठी मावळे सज्ज झाले. सोबत होते वृद्ध म्हाळोजी बाबा, त्यांची दोन मुले, कविकलश, खंडो बल्लाळ, धनाजी,रंगनाथ स्वामी इत्यादी मातब्बर.
म्हाळोजी बाबांच्या डोळ्यात तर जणू आग पेटली होती. तितक्यात समोरच्या झाडीतून आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. दीन दीन, अल्ला हु अकबर, आणि मोगलांची घोडी दिसू लागली.
याचबरोबर म्हाळोजी घोरपडे बेंबीच्या देठापासून ओरडले “हर हर महादेव.” अन त्याचबरोबर संताजी व धनाजीसारख्या पोरांनी गर्जना केली, “छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.”
घोडी घोड्याना भिडली, तलवारी खनानू लागल्या. त्या आवाजाने झाडांवरील पाखरे फडफडू लागली. घोडी खिंकाळू लागली, काळोख थरारला, रात्र थरारली.
रुंद पाठीच्या एका घोड्यावर मुकर्रबखान बसलेला. तीनचार दिवसाच्या प्रवासाने तो पुरता वैतागला होता. आता त्याच्या डोक्यात एकच होत की संभाजी राजांना कैद करून बादशहाकडे घेऊन जायचा.
बघता बघता मुघल सैन्याने वाड्याला वेढा दिला तसेच नदीकडे जाणारी वाट सुद्धा अडवली. लढाईत सुरुवातीपासूनच मुघल सैन्य वरचढ होते. त्यामुळे त्यांना खूपच चेव चढलेला. एवढा बलाढ्य राजा आता आपल्या तावडीत सापडणार या कल्पनेनेच मुघल सैन्य हरखून गेले होते. सपासप तलवारी चालत होत्या. इकडे शंभुराजांची तलवार सुद्धा गनिमाच्या नरडीचा घोट घेत होती.
अनपेक्षित झालेल्या हमल्यामुळे मराठे सुरुवातीला गडबडले, पण मराठ्यांना जाणीव झाली की आपल्या प्राणाहून प्रिय अशा राजाचा जीव धोक्यात आहे. अन मराठे पेटून उठले. संताजी, बहिर्जी, धनाजी अन खंडो बल्लाळ याना तर भयंकर चेव चढला. सपासप भाले फेकत होते. धरा, हणा, ठेचा, कापा, मारा , फोडा असे शब्द कानी पडत होते अन मराठे त्वेषाने लढू लागले.
आपल्या राजाला वाचवायचा उद्देश धरून मराठे एवढ्या त्वेषाने लढू लागले की मराठ्यांचा दंगा, मोठ्या आवाजात आरोळ्या चालू झाल्या. खानाला मराठ्यांचे सैन्य आपल्या सैन्याचा दुप्पट असल्याचा भास झाला. मुकर्रबखान स्तब्ध झाला.
इकडे ६०-६५ वर्षांचे वृद्ध म्हाळोजी बाबा दोन्ही हातात समशेर घेऊन लढत होते, जो मध्ये येईल त्याला सपासप कापत होते. संभाजीराजे सुद्धा त्वेषाने लढत होते. इतक्यात मुकर्रबखान राजांच्या रोखाने येऊ लागला. राजांच्या मदतीला संताजी, धनाजी अन खंडोजी बल्लाळ हे एकाच वेळी धावले अन शत्रू सैन्याला अविरत तलवारबाजी करत कापायला चालू केले.
म्हाळोजी बाबा अत्यंत शौर्याने अन त्वेषाने लढत होते. राजांनी त्यांच्याकडे पाहिले अन राजांना जणू कोंढाण्यावर लढणाऱ्या शेलारमामांची आठवण आली. “ऐसा म्हाळोजी लढत होता, जणू भासे शेलारमामा समयाला.” आणि सरसेनापती संभाजी राजांना संरक्षण देत लढत होते, झुंजत होते, गनिमाला कापत होते. मुकर्रबखानाने ते पाहिलं अन त्याला कळलं ह्या म्हाताऱ्याला अडवल्याशिवाय आपण संभाजीला पकडू शकत नाही. आणि त्याने आरोळी ठोकली “घेर डालो बुढे को.” अन सगळ यवनी सैन्य म्हाळोजी बाबांच्या भोवती गोळा झालं. सर्व मुघलांचे वार पेलत म्हाळोजी लढत होते. साठ वर्षाच रटाळ शरीर पण आपल्या राजासाठी जीव टाकून लढत होत. अरे तो जोशच वेगळा, आवेश वेगळा. अन म्हाळोजी बाबांचं हे शौर्य पाहून खान हैराण झाला. त्याला जणू समजलं की वाघ कसा असतो.
तेवढ्यात मागून नदीच्या बाजूने काही पठाण राजांवर चालून आले. अन त्यांचा आवाज ऐकताच राजे घोड्यावर पाठमोरे झाले. हीच संधी पाहून खानाने आपला घोडा राजांकडे फेकला. अन एकाच घावात राजांचा हात तोडायचा असा विचार करून त्याने तलवार उचलली.
अन तेवढ्यात जणू चमत्कार घडला.
ती तलवार शंभूराजांच्या दंडात शिरण्याआधीच कोणीतरी मध्येच मुसंडी मारली. आपल्या घोड्यावरून राजांच्या घोड्यावर उडी घेत राजांना आड केले. तसे खानाची समशेर त्या व्यक्तीच्या खांद्यात घुसली. हाड तोडत तिथेच रुतली. आजूबाजूला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मात्र शंभुराजेंना वाचवण्यासाठी मध्ये आलेली जाड व्यक्ती आपल्या घोड्यावरून खाली कोसळली. अन यवनी सैन्याने कोसळलेल्या व्यक्तीवर हमला चढवला. त्यांच्या शरीराचे असंख्य घाव घेतले. शरीरावर एक जागा देखील शिल्लक नव्हती की जिथं वार झाला नव्हता.
शंभूराजांनी गर्रकन घोडा पाठीमागे फिरवला अन त्या वीराकडे पाहिले.
ती व्यक्ती होती “सरसेनापती म्हाळोजी घोरपडे.”
म्हाळोजी बाबा पडले, अखेरचा श्वास फुलला, डोळे लवले, ओठ हलले. त्या दीर्घ श्वासाने माती उंच उडाली अन त्या उंच उडाल्या मातीला जणू म्हाळोजी सांगते झाले. “सांगा माझ्या राजाला, हा म्हाळोजी गेला, मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला, तर मातीसाठी मेला.”
अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात.
आणि युद्धात मराठ्यांचा सेनापती पुन्हा एकदा पडला. मराठ्यांचा सेनापती फक्त रणातच पडू शकतो ही गोष्ट तेव्हा समजली. नेसरी असो, वाई असो वा संगमेश्वर सगळे लढाईतच कामी आले.
अन म्हाळोजी नावाचा बुरुज ढासळला. राजांच्या डोळ्यात पाणी आले, आपला बाप पडला हे कळताच संताजी अन बहिर्जी ह्यांना देखील खुप दुःख झाले पण सगळे त्याच त्वेषानेलढत राहिले.
आणि त्याच दिवशी १ फेब्रुवारी १६८९ ला स्वराज्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी सगळ्यात दुर्दैवी घटना घडली.
अशा या महापराक्रमी अशा शिलेदाराला माझा एक मानाचा मुजरा. म्हाळोजी बाबा तुमचा पराक्रम, शौर्य अन बलिदान आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील.
संदर्भ
१.मराठा रियासत-सरदेसाई
२.दि. वि. आपटे-मुधोळच्या घोरपडे घराण्याचा इतिहास
३.शिवपूत्र संभाजी-कमल गोखले
४.संभाजी-विश्वास पाटील
५.वा. सी. बेंद्रे- महाराष्ट्र इतिहासाची साधने
माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील