महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,82,287

मी शिवतक्ताचा गड, मी रायगड…

By Discover Maharashtra Views: 3784 4 Min Read

मी शिवतक्ताचा गड, मी रायगड…

महाराज, सकाळपासून काही खाल्ले नाही. वैद्यबुवा आले होते त्यांनी दिलेल्या औषधांची मात्रा पण तशीच पडून आहे. महाराज डोळे उघडा, सूर्य बघा कधीचा डोक्यावर येऊन बसला आहे. सकाळची न्याहारी पण तशीच गेली मुदपाकखान्यात. महाराज काहीतरी बोला. बघा शंभूराजे आले आहेत भेटायला. आता तरी दोन घास खाऊन घ्या. पूतळाराणी महाराजांसोबत बोलत होत्या पण समोरून महाराजांची काहीही प्रतिक्रिया येत नव्हती. महाराज अजूनही भान हरपून होते. इतक्यात सोयराराणीसरकार महाराजांच्या वाड्यात आल्या. त्यांना पाहताच पुतळारानी साहेबांना रडू आवरेना. त्यांनी थोरल्या राणी साहेबांच्या गळ्यात गळा घालून आपल्या आसवांचा बांध फोडला आणि म्हणाल्या “बघा ना हे कोणाचं ऐकत नाहीत, आता तुम्हीच दम देऊन सांगा महाराजांना. काहीच खात-पीत नाहीत. बोलत नाहीत.” पुतळारानी साहेबांची हि अवस्था पाहून सोयराराणी सुद्धा गहिवरल्या. त्यांनीही महाराजांना शुद्धीत आणण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु महाराज काहीच बोलत नव्हते. अखेर वैद्यबुवा आले आणि महाराजांची पाहणी केल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितले “महाराज आता आपल्यात राहिले नाही. हा देह सोडून ते पंचतत्वात विलीन झाले”

महाराजssssss.. पुतळाराणीसरकारांची एकच आरोळी रायगडावरून निघाली. सगळीकडे धावपळ सुरु झाली. सरदार, प्रधान मंडळी धावत वाड्यात येऊ लागल्या. सर्वांच्या डोळ्यातून आसवे टिपू लागली. आज रयतेचा राजा रयतेला असा पोरका करून गेला, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. रायगडावर सर्वत्र दुःखाचे सावट पसरले. रायगडाचे दरवाजे बंद करण्यात आले. अखेर सौर्यमंडळाला भेदून महाराजांची प्राणज्योत गेली. दिनांक ३ एप्रिल १६८०, शालिवाहन शके १६०२ चैत्र शुद्ध १५ हनुमान जयंती रविवारी दोन प्रहरी रोजी महाराजांनी रायगडी देह ठेविला. स्वराज्याचा धनी, रयतेचा राजा हा महाराष्ट्राला पोरका करून गेला. रायगड स्तब्ध झाला. पंचमहाभूतांनी बनलेले ते शरीर हे अखेर पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले.

आजही मला तो दिवस आठवतोय जेव्हा जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त करून राजे रायरीवर आले आणि म्हणाले तक्तास जागा हाच गड करितो. रायरीचा डोंगर मी माझ्या या डोंगराला किल्लेपण देऊन राजांनी मला “रायदुर्ग” बनवले आज हेच स्वराज्याचे तक्त रायगडी विराजमान आहे. महाराजांनी माझ्यासमवेत घालवलेला तो प्रत्येक क्षण आज मी माझ्या मनात साठवून ठेवले आहेत. हिंदुस्तानात हिंदूंचे एकही सार्वभौम सिंहासन शिल्लक नव्हते. उत्तरेत असणारे राजपूत मुघलांकडे राहून त्यांच्या सेवेशी रुजू झाले तर दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य नष्ट होऊन कित्येक वर्षे उलटली होती. संपूर्ण हिंदुस्थानावर मुघलांचे राज्य व्हावे, आपला हुकूम मानला जावा अशी औरंगजेबाची जिद्द असताना याच बादशहाच्या उरावर महाराजांनी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन उभारले आणि रयतेचे छत्रपती म्हणून जगासमोर आले. किती संकटे आले आणि परकीय सत्तांनी माझा ताबा मिळवला तरीही हे स्वराज्यातक्त अबाधित आहे. अहो, फक्त ५० वर्षे आयुष्य लाभलेला माझा राजा त्याच्या कारकिर्दीत एवढी कामगिरी करून जातो कि शत्रू सुद्धा त्याची प्रशंसा करतो. सततची मेहनत, स्वतःच्या सुख दुःखाकडे बघायला सुद्धा अवधी नाही. रयतेच्या घरी सुखाने सणवार साजरे व्हावेत म्हणून कित्येक सण राजे स्वतः परिवारासोबत न राहता सतत शत्रूचा पाडाव करण्यासाठी मोहिमेस तत्पर. काय असेल हो त्यांचे आयुष्य. कधी सुखाचा एक घास नाही तर कधी आराम नाही. सतत नि सतत घोड्यांवर स्वार होऊन फक्त लढायचं, कशासाठी तर देश, धर्म रक्षणासाठी.

आज ३५० हुन अधिक वर्षे लोटून गेली तरीही महाराजांनी विस्तारित केलेलं स्वराज्य हे आजतागायत तसेच अबाधित आहे. महाराजांनी पेटवलेली सत्कार्याची ज्योत आजही रयतेच्या मनात प्रज्वलित आहे. रायगडी महाराजांच्या समाधी जवळ काही वेळ बसून त्यांचा इतिहास आठवला तर आपोआप डोळे पाणावले जातात. महाराजांच्या समाधीजवळ वाहणारा मंद वारा हा त्यांची चाहूल लावून देतो. आजही महाराज रायगड वरून त्यांचे स्वराज्य पाहत आहेत. समोर दिसणारा कडसारी लिंगाणा. त्याच्या मागे असणारा तोरणा, जिथे स्वराज्याचे तोरण बांधले गेले. आपल्या शक्तीचा धाक शत्रूला देणारा हा तोरणा किल्ला. अजून काहीसे पुढे पाहिल्यास दिसतो तो राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. परकीय सत्ता मोडून आणि रयतेला निर्भीडपणे जगायला शिकवून आज राजे सुखाच्या चिरनिद्रेत आहेत. असा एका थोर राजाच्या सहवासात आणि त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेलो मी शिवतक्ताचा गड, मी रायगड…

लेखनसीमा

मयुर खोपेकर

Leave a comment