प्रतिके मराठ्यांच्या गर्भ श्रीमंतीची : वाईची लक्षाधीश मंदिरे
प्रतिके मराठ्यांच्या गर्भ श्रीमंतीची – छत्रपती शिवरायांनी शुन्यातून निर्माण केलेले मराठ्यांचे स्वराज्य शाहू छत्रपतींच्या काळात खंडप्राय देशाएवढे साम्राज्य झाले.याचकाळात अनेक मातब्बर बलाढ्य सरदार या देशाने पाहीले.त्यांच्या तलवारीने भल्या भल्या योद्धयांच्या तोंडाचे पाणी पळवले.आणि मराठ्यांच्या स्थापत्य-शिल्पकलेने एक नविन सांस्कृतिक इतिहास रचला.
त्यापैकीच एक म्हणजे वाई शहर.शिवछत्रपतींच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या प्रतापगडापासून जवळ असणारे हे ‘जगप्रसिद्ध’ गाव..वाई..!!खरेतर धार्मिक क्षेत्र म्हणून वाई सर्वांना माहीत आहे,पण मराठ्यांच्या स्थापत्य कलेने सर्वार्थाने हे गाव श्रीमंत आहे.मराठ्यांच्या ‘सांस्कृतिक’ इतिहासाच्या वैभवशाली खुणा आजही हे गाव आपल्या अंगा-खांद्यावर मिरवत आहे.
सरदार भिकाजीराव रास्ते हे नाव सर्वांनाच परिचित आहे.मोतीबाग येथील वाडा असो या वाई शहरात बांधलेली मंदिरे..मराठ्यांच्या श्रीमंतीचे दर्शनच या बांधकामातून दिसून येते.सरदार रास्ते म्हणजे मराठा साम्राज्याचे सावकार..शाहू छत्रपतींचे मातब्बर सरदार आणि पेशव्यांचे व्याही..
या भिकाजीराव रास्त्यांच्या चार पुत्रांनी वाई काठी काही मंदिरे बांधली तर काही जीर्णोद्धारित केली.त्या सर्वांचा जमाखर्च पाहिल्यास तो एका प्रतिष्ठित खाजगी कंपनीमधे उच्च पदावर काम करणाऱ्या माणसाच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे.आणि विशेष म्हणजे हे पुर्ण स्थापत्य मराठा शैलीतले आहे,त्याचमुळे हे बांधकाम महत्वाचे ठरते.
भिकाजीराव रास्ते यांना चार पुत्र : गणपतराव,गंगाधरराव,रामचंद्रराव आणि आनंदराव.या चारही पुत्रांनी मिळून एकूण दहा मंदिरे बांधली.
यातील सर्वात महागडी मंदिरे म्हणजे महालक्ष्मी मंदिर आणि महाविष्णु मंदिर..ह्या दोन्ही मंदिरांचा प्रत्येकी खर्च 2,75,630 आणि 2,16,215 इतका होता.काशी विश्वेश्वर आणि गणपती मंदिराचे बांधकाम प्रत्येकी 1,50,000 रूपयांत झाले तर
उमामहेश्वर पंचायतन मंदिर 60 हजारांत बांधून पुर्ण झाले.
बाकी गंगारामेश्वर,बहिरवदेव उर्फ़ भैरोबा,सटवाई देवी,रामचंद्र आणि भवानी मंदिर यांचाही खर्च जवळ जवळ 2 लाखांपर्यंतचा आहे.ही सर्व मंदिरे इसवी सन 1761 ते इसवी सन 1784 ह्या 24 वर्षांच्या दरम्यान बांधण्यात आली. आणि ही सर्व मंदिरे बांधन्यासाठी खर्च आला होता,तब्बल 9 लक्ष 4 हजार 347 रुपये..!! आणि ह्यावरूनच मराठ्यांच्या गर्भश्रीमंतीचे दर्शन आपल्याला होते.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची