महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,638

मोदी गणपती मंदिर, पुणे

By Discover Maharashtra Views: 1875 3 Min Read

मोदी गणपती मंदिर, पुणे –

पत्र्या मारुती चौकातून नदीपात्राकडे जाताना रस्त्याच्या मध्येच येते आहे, असे वाटणारे एक मंदिर लागते. हेच ते मोदी गणपती मंदिर. ह्याचे खरे नाव श्री सिद्धी विनायक गणपती मंदिर आहे. पण हे मंदिर मोदींच्या बागेत असल्यामुळे तेच नाव पुढे रूढ झाले. हे मंदिर शे – दोनशे वर्ष जुने असून अजूनही आपल्या त्या पूर्वीच्याच दिमाखात आहे.

दोन शतकांपूर्वी खुदशेठजी मोदी नावाचे एक पारशी दुभाषी गृहस्थ होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत संगमावरील इंग्लिश रेसिडेन्सी आणि पेशव्यांचा शनिवारवाडा यांच्यात जी काही बोलणी किंवा संपर्क होत असत,  त्यात ह्या खुदशेठजी मोदी यांना दुभाषाचे काम करावे लागे. ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पगारी नोकर होते. त्यांच्या नारायण पेठेतील बागेत (मोकळ्या जागेत) एका छोट्या पारावर गणेशाची एक मूर्ती होती. त्या उजव्या सोंडेच्या गणेशाची सेवा रत्नागिरीजवळच्या शिरगाव येथील भट घराण्यातील लोक पुण्यात स्थायिक होऊन करीत असत. पुढे १८१५ मध्ये संगमावर असलेल्या एलफिन्स्टन साहेबाला मोदींच्या निष्ठेबद्दल संशय आला व त्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकले. तो अपमान सहन न झाल्याने मोदीशेठ यांनी आत्महत्या केली.

मोदींच्या बागेतील गणेशाची भट मंडळींची उपासना तशीच पुढे चालू राहिली. या भटांसंदर्भात या मोदी गणपतीजवळपास भटवाडी,  भटांचा बोळ अशी स्थानदर्शक नावे असणाऱ्या जागा अजूनही आहेत. पुढे या मीटरभर उंचीची गणेशमूर्ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, असा विश्वास अनेकांच्या मनी आला. मग गणपतीभोवती बहुदा १८६८ च्या सुमारास टुमदार गाभारा, सभामंडप आणि प्रांगण व त्याभोवती भिंत असं देखणं देऊळ बांधलं गेलं. आजही हे मंदिर भट घराण्याच्या खाजगी मालकीचं आहे.

मंदिरात प्रवेश केला की डाव्या बाजूला मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे. पुढे गेलं की लाकडी खांब असणारा सभामंडप आहे. मंदिराच्या सभामंडपाला मराठी धाटणीची महिरपी कमान, वीटकामात बांधलेला कळस, त्यावर चुन्याच्या गिलाव्यात केलेलं नक्षीकाम आहे. त्यात गणेशाची अनेकविध चित्रं आणि माहिती लावलेली आहेत. तसेच तिथे पुण्याचा १८६९-७२ सालचा एक जुना नकाशा पण एका भिंतीवर आहे. गाभाऱ्यासमोर छोटा उंदीर आहे. गाभाऱ्यातील पितळी मखरात मीटरभर उंचीची,  चतुर्भुज,  उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. पण शेंदूरलेपनामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप ध्यानी येत नाही.

हे मंदिर पुणे महानगरपालिकेने अ दर्जा असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांच्या यादी मध्ये समाविष्ट केल आहे.

संदर्भ:
मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर

पत्ता :
https://goo.gl/maps/PhzhXP4XiXzQEoNs9

तुम्हाला आमचा हा प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment