महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,54,535

मोहिमाता मंदिर, मादळमोही

By Discover Maharashtra Views: 1264 2 Min Read

मोहिमाता मंदिर, मादळमोही –

भारतात देवीची १०८ शक्तीपीठे विखुरलेली आहेत. त्यापैकी साडेतीन प्रमुख शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत. याच साडेतीन पीठांची अनेक उपपीठे ही महाराष्ट्रात आहेत. तसेच प्रत्येक गावोगावी ग्रामदेवता देवीची वैशिष्टपूर्ण मंदिरे आहेत. याच मंदिर साखळीतील मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड येथील ग्रामदैवत श्री मोहीमाता देवीचे मंदिर वैशिष्ट्य पूर्ण आहे.(मोहिमाता मंदिर मादळमोही)

मादळमोही हे गाव राष्ट्रीय महामार्ग विशाखापट्टनम ते कल्याण या रस्त्यावर बीड शहरापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात अनेक मंदिरे असून त्यापैकी मोहिमाता देवीचे मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर १०० बाय १०० फूट असणाऱ्या यादवकालीन बारवेत आहे. या बारवेची खोली अंदाजे ५० फूट असून या बारवेत उतरण्यासाठी दक्षिण व उत्तर दिशेस दोन प्रवेशद्वार आहेत. दक्षिण प्रवेशद्वारातून बारवेत प्रवेश केल्यावर आपणास चहूबाजूंनी दगडी  व्हरांडा दिसून येतो. या व्हरांड्यातील दगडी खांब कोरीव असून अत्यंत सुबक व आकर्षक आहेत. या दगडी व्हरांड्यातून सर्व बारवास चक्कर मारता येते व बारवाचे विहंगम दृश्य पाहता येते.

पश्चिम दिशेला एक दगडी सुबक कोनाडा बांधलेला असून त्यात मोही मातेची पूर्वाभिमुख सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. पूर्वी या मूर्तीच्या ठिकाणी केवळ तांदळा स्वरूपात देवीची मूर्ती होती. पण नंतर मंदिराचा जीर्णोद्धार करताना मोहीमातेच्या सुबक संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्री मोहिमाता देवी ही त्याच्या नवसाला पावणारी असल्याने येथे पंचक्रोशीतील भक्त बोललेला नवस फेडण्यासाठी येतात. शारदीय नवरात्र व अश्विनी पोर्णीमा म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरते. आपणही या महामार्गावरून कधी गेलात तर अवश्य या पुरातन मंदिर बारवेला भेट द्या. आपला एक ऐतिहासिक वारसा पाहिल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल यात शंका नाही.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment