महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,607

मोहिते वाडा, राजेवाडी

By Discover Maharashtra Views: 3612 4 Min Read

मोहिते वाडा, राजेवाडी, ता.खंडाळा –

महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला पौराणिक किंवा ऐतिहासिक वारसा हा नक्कीच असतोच. मराठ्यांच्या इतिहासात ‘शिवकाळ’ हा महाराष्ट्रजनांच्या पराक्रम व कर्तृत्वाचा सर्वोच्च गौरवशाली कालखंड म्हणून इतिहासात नोंदविला गेला आहे. छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत अनेक घराण्यांनी दिलेले योगदान हा मराठी माणसाच्या अभ्यास व चिंतनाचा विषय आहे. ऐतिहासिक कालखंडात असलेल्या मात्तबर असामींनी केलेले अलौकिक कर्तृत्व हे लिखित स्वरूपात अल्प- स्वल्पच उपलब्ध झाले आहे, त्यामुळे निश्चितपणाने विस्तृत माहिती मिळेलच याची खात्री नसते. आणि हे जरी वास्तव असले तरी त्यांनी निर्माण केलेल्या तत्कालीन वास्तू मात्र आपल्या धन्याची समाजातील प्रतिष्ठा व कर्तृत्व मूकपणे व्यक्त करीत असतात.(मोहिते वाडा, राजेवाडी)

आज काही निमित्ताने भोर ते शिरवळ या रस्त्यावर भोरपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या ‘राजेवाडी’ (ता.खंडाळा, जि.सातारा ) या गावाला भेट देण्याचा योग आला. या रस्त्याने मी लहानपणापासून अगणित वेळा ये-जा केली आहे,आणि प्रत्येकवेळी या गावातील रस्त्याच्या कडेला सर्वोच्च ठिकाणी असलेला मोहितेंचा हा ऐतिहासिक वाडा मला नेहमीच आकर्षित करायचा. मीहि जाऊ या, कधीतरी ! एवढे मनातल्या मनात म्हणून राहायचो. बस्स. तो दिवस आज उजाडला.

आज दुपारी मी राजेवाडी येथील मोहिते वाड्याच्या समोर पोहोचलो. वाड्याकडे जाताना दगडी पायऱ्या चढून वर पोहोचलो. समोर काही फूट अंतरावर गतकाळाचे वैभव सांभाळणारा पूर्वाभिमुखी असलेला वाडा पाहून एकदा तो डोळे भरुन पाहत होतो. दर्शनी भागात भव्य सागवाणी दरवाजा, दरवाजाच्या बाहेरील बाजूस आठ खांबी लाकडातील लहान सोपा, त्याला कमरे इतक्या उंचीचा लाकडी सज्जा, सोप्याच्या मध्यातून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या. सोप्याला लाकडी फळ्यांचा छत, त्या छतावर दुसऱ्या मजल्याचा नक्षीदार सज्जा. प्रवेशद्वाराबाहेरील नक्षीदार सागवानी खांब घडीव दगडीवर स्थापित केलेले आहेत. तळ मजला घडीव दगडी बांधकामात असून दर्शनी भागातील दुसरा व तिसरा मजला वीट बांधकामात आहे.मात्र वाड्याचा अंतर्गत भाग दुमजली आहे.

चौसोपी वाड्याचे छताला थापिव कौलांचे आच्छादन आहे. भव्य दरवाजा ओलांडून आत प्रवेश करताच पहिल्या चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, चारही बाजूला असलेल्या पडव्यांनी हा चौक होत असला तरी चोहोबाजूचे दगडी बांधकामातील जोते अष्टकोणी असून संपूर्ण फरसबंदी चौकात पडणारे पाऊसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी अष्टाकृती आकाराचे घडीव दगडातील पाणी वाहिका देखाणी आहे. डाव्या बाजूला देवघर आहे. देवघरात कुलस्वामिनी व इतर देवदेवता आहेत. तेथे एक अॕल्युमिनियमची लहान थाळी व वीणा असून ह्या दोन्हीही वस्तू राष्ट्रसंत गाडगे महाराजांची असल्याचे ह्या वाड्याचे यजमान मा.श्री. दाजीसाहेब चंद्रसेन मोहिते सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार किर्तनसेवेला महाराज आल्यावर ते त्यांचे वाड्यात राहायचे. हे मोहिते घराणे मूळ इंदापूर बावडा नजीक असलेल्या टण्णू टाकळी येथील असून छत्रपति राजाराम महाराजांच्या कालखंडात येथे वतनदार म्हणून आले व तत्कालीन पूर्वजांनी हा वाडा बांधला. मोहिते घराण्याचे नातेसंबंध अनेक सरदार घराण्यांशी आहेत, तर दाजीसाहेब यांच्या आजी ह्या सयाजीराव गायकवाड घराण्यातील तर आई सिन्नरच्या वावीकर भोसले घराण्यातील होत्या अशी माहिती मोहिते सांगतात.

वाड्याचा हा एकमेव चौक व पडव्या सुस्थितीत असून बाकी चौक व इतर बांधकाम कालौघात नष्ट झाले आहे. त्यांच्याकडे पाट्याचा दगडी वरवंटा सुमारे दिड फूट लांबीचा व सामान्य वरवंट्याच्या कितीतरी पट वजनाचा आहे. वाड्याच्या दर्शनी भागात असलेला देखणा सज्जा अतिशय प्रेक्षणीय असून मोहिते घराण्यातील कर्तृत्ववान असामींचे सामाजिक स्थान अधोरेखीत करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्री. व सौ. मोहिते आपुलकीने व मनमोकळेपणाने संवाद साधतात तर आदरतिथ्य करण्याचा घराण्याचा वारसा आत्मियतेने सांभाळतात.

सुरेश नारायण शिंदे, भोर

Leave a Comment