मोरगाव गणपती मंदिर…
पुणे जिल्ह्यतील बारामती तालुक्यात, कऱ्हा नदीच्या काठावर मोरगाव क्षेत्र आहे. हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे.
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे.
मंदिराच्या पायऱ्या चढून दगडी चौथऱ्यावर पोहोचलो की, तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठा दगडी कासव नजरेत येतो. तसेच या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. महादरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणाच्या गणपतीसमोर तोंड करून बसलेला नंदी रेखीव असला तरी काहीसा अर्धवट कोरल्यावर काम तसेच राहिले आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.
दीपमाळेच्या पुढे नगारखाना आणि नगारखान्यापाशी पुढच्या दोन पायात लाडू घेतलेला उंदीर पाहायला मिळतो. मंदिराच्या सभोवती आठ कोपऱ्यात आठ गजाननाच्या म्हणजे एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर, धुम्रवर्ण आणि वक्रतुंडाच्या मूर्ती आहेत, त्याशिवाय ३४ परिवार मूर्तीही आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
मंदिराच्या आवारात शमी व मंदाराचे वृक्ष आहेत. पश्चिमेला तरटीचे झाड आहे यालाच कल्पवृक्ष म्हणतात. या झाडाखाली बसून अनुष्ठान केल्यास इच्छित फलप्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti