शिवकाळामध्ये मुंबईतील हालचाली
आपण शिवकाळातील घटनावली तर पाहिलीच आहे. संपूर्ण कोकण, बारा मावळ इत्यादी भागात आपल्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून सर्व किल्ले, प्रदेश स्वराज्यात आणला अगदी त्याच काळात इथे मुंबईत काय हालचाली होत होत्या याचे थोडक्यात वर्णन मांडले आहे.शिवकाळामध्ये मुंबईतील हालचाली.
जेराल्ड ऑगियर यांची जुलै १६६९ मध्ये सुरतेच्या फॅक्टरीचे अध्यक्ष आणि मुंबईचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. १६७० च्या जानेवारीत ते मुंबईला आले. कंपनी सरकारच्या सैनिकी आणि मुलकी कारभाराची त्यांनी घोषणा केली. फेब्रुवारीत ते सुरतेस परत गेले. त्यावेळी सुरतेवर मराठे हल्ले करत असत. ऑगियरने सूरतेचे ठाणे मुंबईला हलवले. त्या काळापर्यंत मुंबई इंग्रजांच्या ताब्यात असली तरी राज्यपद्धती वरील पोर्तुगीज छाप कायमच होती. ऑगियर याने इंग्लिश कायदा लागू केला. जॉर्ज विल्किन्सची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. किल्ल्यांच्या परिसरात शहराची नव्याने मांडणी केली. ३०० ते ४०० टनांची जहाजे लागतील असा धक्का बांधला. याला मोल स्टेशन म्हणत. याच जागी पुढे बॅलार्ड पिअर बांधण्यात आला. त्यांनी मिंटचा पाया घातला. किल्ल्याची बळकटी केली. शिवाय रुग्णालयाची स्थापना केली. जाती पंचायती कारभाराची सुरुवात करून दिली .
मुंबई बेटांवरील बरीच जागा पोर्तुगीजांनी आपल्या निवृत्त सैनिकांस इनाम म्हणून दिली होती. त्यावेळी मुंबई बेट हे वसईचाच भाग म्हणून ओळखले जात असे. त्यांचा कामकाजात माहीम म्हणून फक्त उल्लेख होई. इ.स. १६६१ मध्ये इंग्लंडच्या चार्ल्स राजाला मुंबई बेटे विवाहाच्या वेळी भेट म्हणून दिली होती. त्यावेळी नकाशात साष्टी वसई चा समावेश होत होता आणि नंतर १६६८ मध्ये ती बेटे ईस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केली गेली. त्यापूर्वी बराच काळ हि बेटे पोर्तुगीज अधिकाऱ्यांकडे होती. ईस्ट इंडिया कंपनीने दरसाल दहा पाउंड भाडे इंग्रजी सरकारला द्यायचे असे ठरले.
इ.स. १६६२ मध्ये गव्हर्नर कूकच्या सहाय्याने अनेकांनी बनावट कागद तयार करून बेटावरील जागेवर अधिकार प्रस्थापित करण्याचे कारस्थान केले होते. माझगावचा भाग, मनोर १५७१ मध्ये पोर्तुगालचा राजा सबॅस्टिन याने लिओनेल डिसूजा या दर्यासारंगला भाडेपट्ट्याने दिला होता. फिलिप राजाने १६३७ मध्ये बर्नादिन डिटावरा या डिसूजा च्या नातवाला हा भाग नाममात्र भाड्याने वंशपरंपरा इनाम करून दिला. त्यावेळी वंशपरंपरा खाजगी मालकीची अशीही एक जमीन होती. इतर कुळे वार्षिक भाडे आणि सैनिकी नोकरीच्या करारानुसार जमिनीचा उपभोग घेत. या पोर्तुगीज जमीन धारकांची कंपनीच्या अधिकार्यांशी नित्य भांडणे होत असे. सिन्योर अल्वारिज पेरेज डिटावरा या माझगावच्या इनामदारासह १२० जमीन धारकांनी १२ नोव्हेंबर १६७२ रोजी सभा भरवण्यात आली आणि जागेची स्वामित्व म्हणून वार्षिक १२०० पाउंड आकार निश्चित करण्यात आला. Foras म्हणजेच वरील मागणीला १६ जुलै १६७४ रोजी भरलेल्या सभेत मान्यता देण्यात आली. याबाबत काही इंग्लिश जमीन धारकांनी खळबळ केली परंतु त्याला ऑगियरने दाद दिली नाही. बेटावरच्या जमिनीचे याप्रकारे वाटप झाले तरी किनारपट्टीवरील जागा सरकारच्या ताब्यात राहिली त्याचा उपयोग मृतांचे दहन आणि दफन करण्यासाठी होत असे.
इ.स. १६६२ च्या सुमारास मुंबई बेट हे हलक्या प्रतीचें होते, त्या वेळीं सगळ्या बेटांचे मिळून उत्पन्न साधारण २४,००० रुपये इतके होतें. असे सांगतात कि, त्या वेळी मलबार हिल्स हि एका गवळ्यास १३० रुपयांत भाड्याने दिली होती . कुलाबा हें एक मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटच्या बाजूला लहानसे बेट होते व तिथे गुरे चरत असत. त्याकाळी तिथे आगरी आणि कोळी लोकांची वस्ती असे. इ.स. १६६४ पर्यंत कुलाबा हे मुंबईत आहे असे ग्राह्य धरीत नसे. कुलाबाचे पूर्वीचे नाव “कोल्स” होते आणि ते इंग्रज अधिकाऱ्यांचे शिकारीचे प्रमुख स्थळ असे. एत्तद्देशीयास सात वर्षे नोकरी केल्यावर अर्धा पगार आणि जमीन देण्यात येई . इ.स . १६७६ मध्ये शंभर जमीनधारकांनी ६०० सैनिकांची फलटण तयार केली होती. कोणी सैनिकांनी जर नोकरी नाकारली तर त्याची जमीन जप्त होत असे. परळच्या जेसुइटांनी जंजिराच्या सिद्दीशी हातमिळवणी केली म्हणून १६९० परळ जप्त झाले.
मुंबई हि मराठ्यांच्या मनात देखील होती. अगदी पूर्वी पासून मुंबई काबीज करावी असं मराठ्यांना वाटे. १६६६ मध्ये शिवाजी महाराजांनी ठाण्याच्या किल्ल्यावरून सर्व मोगल लोकांस हाकलवून लावले आणि १६७० पर्यंत थेट कर्नाळा आणि माहुली येथील किल्ले घेतले. त्याच वर्षी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांचा जलमार्गाने पराभव केला परंतु महाराजांनी त्यांचा अजिबात विचार न करता पुढील स्थळे घेत गेले त्यात घोडबंदर आणि साष्टी होते. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाला थांबवण्यासाठी इंग्रजांनी एक वकील पाठवला आणि तहाची बोलणी चालू केली त्यात आपण इंग्रजी मुलुखावर चालून जाणार नाही असे कबुल केले. त्यानंतर १६७३ मध्ये मुंबईत डच लोक आले आणि त्यांनी मुंबईतील नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. परंतु गव्हर्नर ऑगियर यांचा कडेकोट बंदोबस्त असल्याकारणाने डच लोकांचे एकही चालले नाही आणि नाईलाजाने त्यांना मुंबई सोडावी लागली. इ.स. १६७४ मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला त्यावेळी मुंबईवरून इंग्रजांनी आपला वकील पाठवला होता. त्याने शिवाजी महाराजांसोबत व्यापाराबाबत बोलणी केली.
मुंबईवर अजून एकाचा डोळा होता तो म्हणजे जंजिरेकर सिद्दी. मुंबईस तो वारंवार त्रास देत असे. इ.स. १६७२ ते १६८० या काळात सिद्दीची लोक प्रत्येक वर्षी मुंबईत येत. इ.स. १६७४ मध्ये सिद्दीची लोक मुंबईतील शीवच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यातील लोकांना हाकलवून लावले, त्यामुळे नाईलाजाने इंग्रजांनी सिद्दीशी असा करार केला कि मुंबईमध्ये कोणत्याही प्रसंगी सिद्दीच्या ३५० पेक्षा अधिक लोकांनी राहू नये आणि तलवार वगळता कोणतेही हत्यार त्यांनी बाळगू नये. इंग्रजांची या प्रकरणात द्विधा परिस्थिती झाली होती ती म्हणजे अशी कि त्यांनी सिद्दीला मुंबईत प्रवेश दिला तर शिवाजी महाराजांच्या मनात इंग्रजांविषयी संशय येईल आणि जर का सिद्दीला मुंबईत येण्यापासून अडवले तर तिथे दिल्लीपती बादशाह इंग्रजांवर चालून येईल. इ.स. १६७३ -१६७४ काळात इंग्रज खऱ्याअर्थाने अडकित्यात फसले होते. या परिस्थीचे वर्णन करताना फ्रायर म्हणतात, “हल्ली आमचा संबंध पोर्तुगीज, इंग्रज आणि शिवाजी सोबत येत असतो आणि हे तिघे एकमेकांचे शत्रू आहेत. आम्हाला त्या तिघांसोबत अगदी सौम्यतेने वागावे लागे. कोण्या एका पक्षास मदत केली तर बाकीचे दोन आमच्यावर चालून येत.”
इ.स. १६७३ ते १६७७ पर्यंत पोर्तुगीज आणि इंग्रज हे आपापसात लढत असे. पुढे, पोर्तुगीज जनरल मॅन्युअल सालडाना याने १२०० लोकांना घेऊन मुंबईवर चाल केली. कारण इंग्रज गव्हर्नरने पोर्तुगीजांचे एक जहाज मलबार येथील बंदरात अडकवून ठेवले होते. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी असा आदेश सोडला कि मुंबईतील सर्व पोर्तुगीज पाद्र्यांस हाकलवून द्यावे. हे इंग्रजांचे कृत्य त्यांस न आवडल्याने पोर्तुगीजांनी मुंबईतील लोकांना भुके मारावे असे ठरवले आणि म्हणून त्यांनी वांद्रे (Bandra) येथील तांदूळ येण्याचे बंद केले इतकेच नाही तर फळं, भाजी, कोंबडी इत्यादी पदार्थांवर जबरदस्त कर बसवला.
शिवकाळामध्ये मुंबईतील हालचाली
इ.स. १६७८ मध्ये मुंबई बंदरात असलेल्या मुसलमान बोटी जाळण्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला परंतु महाराजांना या प्रयत्नात यश मिळाले नाही. १६७९ मध्ये मुंबई बंदराच्या दक्षिण किनाऱ्याचे सिद्दी पासून रक्षण व्हावे म्हणून महाराजांनी कान्हेरी बेत हस्तगत केले परंतु इंग्रज आणि सिद्दी हे दोघेही या बेटावर आपले हक्क दाखवू लागले. इंग्रजांनी तर मराठ्यांचा पाडाव करून चार गलबते बुडवली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर युवराज संभाजी राजे आणि सिद्दी यांच्यामध्ये वारंवार मुंबई किनाऱ्यावर हल्ले चालू होते. त्यामुळे मुंबईकर इंग्रज फार घाबरून गेले होते. संभाजी महाराज देखील मुंबईवर बरेच लक्ष ठेऊन होते म्हणून ते वारंवार कान्हेरी, घारापुरी आणि उंदेरी येथे वारंवार छावणी देत होते.
इ.स. १६८२ त मोंगलांचे सैन्य जुन्नराहून कल्याणास आले त्यावेळी पोर्तुगिजांची सत्ता बेलापुरावरची नाहीशी झाली होती आणि सिद्दीकासीम हाही बेलापुर येथे मराठ्यांपासून आपले संरक्षण व्हावें म्हणून एक किल्ला बांधीत होता. ह्याच वर्षाच्या एप्रिल महिन्यांत सिद्दी कासीम हा मुंबईवर आला तेव्हा औरंगझेब बादशहाची मर्जी न व्हावी म्हणून इंग्रजांनी त्यास मुंबईच्या बंदरांत वरवा करण्याची मोकळीक दिली. पुढे पावसाळा गेल्यानंतर मराठे आणि सिद्दी ह्यांची पुनः मुंबईच्या बंदरांत चकामक उडाली त्यात संभाजी राजांचा पराभव होऊन सिद्दीने त्याचीं तारवें लुटिलीं, गांवें जाळिली व कित्येक बायका पळवून नेऊन महाडपर्यंत चाल करून संभाजी राजांचा जनरल दादाजी रघुनाथ देशपांडे ह्याची बायको कैद करून घेऊन गेला. असें जेव्हां झाले तेव्हां संभाजी राजांनी घारापुरी येथे किल्ले बांधण्याची तयारी करून आपल्या दौलतखान नामक सरदारास मुंबईस वेढा घालण्याकरितां पाठविलें व त्यास कुमक करण्याकरितां मोंगलांचे ३,००० लोक माजगांव येथे तळ देऊन राहिले होते.
- शिवकाळामध्ये मुंबईतील हालचाली
लेखनसीमा
लेखन – मयुर खोपेकर
संदर्भ – मुंबईचा वृत्तांत