महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,15,161

मृगव्याधेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर

By Discover Maharashtra Views: 1328 2 Min Read

मृगव्याधेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर –

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात निफाड पासून ११ कि.मी. अंतरावर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले नांदूरमध्यमेश्वर हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर गाव वसले आहे. इथेच गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला आहे. येथील पक्षी अभयारण्या प्रमाणेच मृगव्याधेश्वर, गंगामध्यमेश्वर, बाणेश्वर या पुरातन मंदिरामुळे तसेच ऐतिहासिक व पौराणिक महात्म्यामुळे नांदूरची ओळख सर्वदूर आहे.(मृगव्याधेश्वर मंदिर)

गोदावरीच्या तीरावर असणाऱ्या मृगव्याधेश्वर मंदिरा विषयी अशी आख्यायिका सांगितले जाते की, प्रभु श्रीरामचंद्र, माता सीता व बंधु लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासात असताना दंडकारण्यात पंचवटीमध्ये वास्तव्य करून होते. या दरम्यान माता सीतेचे हरण करण्याच्या उद्देशाने रावणाने त्याचा मामा मारीच याला कांचनमृगाचे रूप धारण करून पंचवटीत पाठविले. त्या मायावी कांचनमृगाचे सुवर्णमय शरीर पाहता माता सीतेला त्याची कातडी कंचुकीसाठी वापरण्याची इच्छा झाली. माता सीतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रभुरामचंंद्र त्या कांचनमृगाची शिकार करण्यासाठी निघाले.

कांचनमृग मायावी असल्यामुळे ते प्रभू श्रीरामाला हुलकावणी देत नांदूरमध्यमेश्वर या ठिकाणी आले. तो मायावी मृग टप्प्यात येताच रामाने निर्वाणीचा बाण मारला आणि मृगाच्या पायाची खुरे तुटली गेली, याची आठवण म्हणून या ठिकाणी मृगव्याधेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली. आजही या ठिकाणी खुर तुटलेले मृग समाधिस्त आहे. ज्या ठिकाणाहून रामाने बाण मारला त्या ठिकाणी बाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली.

मृगव्याधेश्वर मंदिराच्या भोवती प्रशस्त आवार असून मंदिराच्या परिसरात काही लहान मंदिरे व गोसावी समाजाच्या समाधी पहायला मिळतात. मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना दिसून येते. मंदिरावरील शिल्पे चांगल्या स्थितीत आहेत. मृगव्याध्येश्वर मंदिरावर हरणाचे शिल्प आहे. मंदिराचा मूळ बाज तसाच ठेवून काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. पर्यटकांनी पक्षी अभयारण्याला भेट देताना या पुरातन मंदिरांना देखील भेट दयावी व आपला ऐतिहासिक वारसा अनुभवावा हीच अपेक्षा.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment