महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,78,817

श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे

Views: 1600
3 Min Read

श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे –

कर्वे रस्त्यावर असलेल्या मयूर कॉलोनीच्या सिग्नलवरून पुढे आल्यावर डाव्या हाताला गर्द झाडीत लपलेलं एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे.रस्त्यावरून ते दिसत नाही, पण तिथे असणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वारामुळे आणि बाजूला असलेल्या हारफुलांच्या दुकानामुळे इथे मंदिर आहे हे लक्षात येते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गर्द झाडीत लपलेलं मंदिर दिसते. फडके गणपतीची स्थापना करणारे उत्तर पेशवाईतले पराक्रमी सरदार हरिपंत फडके यांनी श्री दशभुजा गणपती मंदिर आणि श्री मृत्युंजयेश्वर मंदिर हि मंदिरे सुद्धा बांधली. श्री मृत्युंजयेश्वर मंदिराच्या बांधणीचा निश्चित कालखंड उपलब्ध नाही; मात्र साधारण इ.स. १७८० ते इ.स. १७९० या कालखंडात या मंदिराची निर्मिती झाली असावी. मुळच्या जुन्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाल्यामुळे ते आज आधुनिक स्वरूपात आहे.

या मंदिराला प्रशस्त आवार आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला छोटीशी सुरेख बाग आहे. त्यात विविध फुलझाडे लावली आहेत. पुढे पायऱ्या उतरून गेल्यावर प्रांगणात छोटा नंदी मंडप आहेत. त्यात काळ्या पाषाणातली नंदीची सुरेख मूर्ती आहे. समोर उंचावर मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती छोट्या मंदिरात आहे. मुख्य मंदिराला ऐसपैस सभामंडप आहे. सभामंडपाच्या पुढे मुळचा दगडी बांधणीचा गाभारा दिसतो. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतींवर छोटे कोनाडे असून त्यातल्या डाव्या कोनाड्यात गणपती आणि उजव्या कोनाड्यात विष्णू यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या दरवाजावर वरच्या बाजूला गणपती आणि खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहे. गाभाऱ्यामध्ये शंकराची काळ्या पाषाणाची पिंड आहे. त्याच्या मागे शिवशंकर आणि त्यांच्या डोक्यावर छाया धरलेल्या नाग यांचा  पितळी मुखवटा आहे. त्याच्या मागे कोनाड्यात देवीची संगमरवरी मूर्ती आहे. हे मंदिर शिव पंचायतन या पद्धतीने बांधले आहे. ज्यात शंकर, देवी, गणपती, विष्णू आणि मारुती यांची मंदिरे आहे. श्री देवदेवेश्वर संस्थान हे या मंदिराची व्यवस्था पाहते.

या मंदिराच्या परिसरातच सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी पेशव्यांची बाग होती. ती कोथरूडची बाग या नावाने ओळखली जायची. त्या बागेत एक बंगला होता. पुण्याच्या परिसरात पेशव्यांच्या भरपूर बागा होत्या पण त्या मनोरंजनासाठी किंवा विश्रांतीसाठी अगदीच निरुपयोगी होत्या. आपल्या व्यस्त दिनक्रमातून कधीतरी वेळ काढून पेशवे या बागेत विश्रांतीसाठी यायचे. तथापि ही बाग नक्की कोणत्या पेशव्यांनी वसवली याचे तपशील मात्र अज्ञात आहेत. कोथरूड बागेसंबंधी खात्रीलायक नोंद इ.स. २९/१/१८०७ सालची असून, त्यानुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी या ठिकाणी असलेल्या आरसे महालाची दुरुस्ती, जलमंदिराची दुरुस्ती, तावदानी बंगल्याची दुरुस्ती व चौसोपी बांधण्यासाठी एकूण २२४५ रुपये खर्च केल्याचे आढळते. मुळात अस्तित्वात असलेल्या बांधकामाची दुरुस्ती होते याचा अर्थ, ही बांधकामे इ.स. १८०७ च्या आधी निश्चितपणे झाली असणार.

इ.स. १९१९ मध्ये इतिहास संशोधक आबा चांदोरकरांनी ही बाग समक्ष बघून नोंद ठेवली आहे. त्यानुसार, या बागेत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा दुमजली बंगला धूळ खात पडला होता. त्यातील तळमजल्याचे बांधकाम शाबूत असून वरील मजल्याची पडझड झालेली होती, असे दिसते. शिवाय एक मोठा पाण्याचा हौदही बंगल्यासमोर असल्याचे नोंदलेले आढळते. पुण्यापासून २ मैलांवर असलेल्या कोथरूडमधील महादेवाच्या छोट्या देवळाशेजारी ही बांधकामे आहेत, असेही त्यांनी नोंदीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे, इ.स. १९४० मध्ये पुणे शहराचा अभ्यास करताना चिं. ग. कर्वे यांनी, मृत्युंजयेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कॅनॉलपलीकडे या वाड्याचे अवशेष अगदीच पडीक अवस्थेत शिल्लक असल्याची नोंद केलेली आहे.

संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी

पत्ता :
https://goo.gl/maps/i3BRjywC5VAvJjci7

आठवणी इतिहासाच्या FB Page

Leave a Comment