मृदंगवादिनी –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१८ –
कोरवली येथे स्थित असलेल्या शिवमंदिरावर मर्दला समूहातील एकूण चार सुंदरी पहावयास मिळतात. त्यामध्ये मृदंग किंवा पकवाजा प्रमाणे वाद्य वाजवणार्या दोन रुपसंपन्न, ललना,व एक अप्सरा डमरूच्या आकाराचे वाद्य वादन करित आहे. एक अप्सरा वीणे सारखे तंतुवाद्य वाजवणारी वीणावादिनी आहे. मर्दला या समूहामध्ये मोडणाऱ्या मृदंगवादिनी या सुरसुंदरी मोहक आहेत. या चारही रूपगर्वितांची वैशिष्ट्य पाहण्यासारखी आहेत.
त्यामध्ये सर्वप्रथम मृदंगवादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन सुंदरी या ठिकाणी आहेत. त्यापैकी आपण दुसरी सुरसुंदरी पाहणार आहोत .हि दुसरी मृदंगविदिनी मंदिराच्या दक्षिण दिशेच्या मंडोवरावर स्थित आहे.पहिली मृदंगवादिनी हि पश्चिम दिशेच्या मंडोवरावर आहे. अत्यंत सुंदर व मोहक अशा केशसंभारासह त्रिभांगा अवस्थेत उभी आहे.
आपल्या गळ्याच्या व मानेच्या मागे केशसंभार तिने सोडला आहे. केसांना गोल आकाराची भली मोठी गाठ बांधली आहे, आणि राहिलेले लांबसडक केस तिने पाठीवर सोडलेले आहेत. केशकुंतलाच्या ओझ्याने तिची मान किंचित झुकलेली आहे. इतर तारुण्यसुलभ यौवनांच्या मानाने आपल्याकडे असणारे हे वैशिष्ट्य या सौंदर्यवतीला अभिमानास्पद वाटते. विपुल कुंतलाचा तिला असलेला सार्थ अभिमान तिच्या चेहऱ्यावर दाखल्यांमध्ये कलाकारांने यश मिळवलेले आहे. तिच्या शारीरिक वैशिष्ट्याला उठाव देणारी अनेक आभूषणे तिने परिधान केलेली आहेत. गळ्यामध्ये घातलेल ग्रीवा आणि हार सूत्र हे अतिशय ठसठशीत असे अलंकार आहेत.खांद्यावर स्कंदमालि तसेच दंडामध्ये केयूर आहे.
भल्यामोठ्या मृदंगामूळे तिने परिधान केलेले कटिसूत्र चटकन नजरेत भरत नाही. दोन्ही हातांमध्ये घातलेले कटकवलय अर्थात मनगटातील अलंकार तसेच पायांमधील पादवलय व पादजालक अलंकार तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत. या सुरसुंदरीस घडवित असताना जाणीवपूर्वक कलाकारांनी जास्त वेळ दिलेला असावा म्हणूनच हे शिल्प रूखीव परंतु आव्हानात्मक असेच निर्माण झालेले आहे. आपल्याला दोन्हि हातांनी पकडलेला मृदंग खाली घसरणार नाही हा आत्मविश्वास तिच्याकडे आहे. घट्ट पकडून ठेवलेला हा मृदंग वाजविण्यात ती मग्न झालेली आहे. वादनाच्या नादात असलेली ही तरुणी नृत्याच्या तालातहि रममाण झालेली आहे. त्यासाठी एक पाय सरळ ठेवून आणि एक पाय काटकोनामध्ये उभा करून तिने नृत्य वादनाचा एवढा सुंदर ताल धरलेला आहे की तिने परिधान केलेल्या वस्त्राचा सोगा ही मुक्त दामाच्या खाली येऊन तिच्याबरोबर हळुवारपणे डोलत आहे.
अशा पद्धतीच्या वर्गातील सुरसुंदरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरावर आढळतात.होट्टल येथील परमेश्वर मंदिर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर , तसेच वरंगळ जिल्ह्यातील रामपाल मंदिरावर अशा पद्धतीच्या मंर्दला आढळतात. शिल्पप्रकाश ग्रंथांमध्ये मंर्दला या सुरसुंदरी बाबत बरेच संस्कृत श्लोक आहेत. खरोखरच या सर्व श्लोकांमध्ये सांगितलेली सर्व लक्षणे कोवरलीच्या सुरसुंदरी मध्ये आढळतात.
दक्षिणपात्र तत्स्थाने मध्यरेखान्नवर्तिनि।
एषा ही मर्दला श्रेष्ठज्ञ उन्मता वादने तथा।।
कारोभयेन संयुक्तस्ताल आनन्ददायकः।
एताः षोडश कन्याः स्थु शिल्पागार विमण्डिताः।।
क्रमशः
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर