मृदंगवादिनी सुरसुंदरी –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.२ –
कोरवली येथे स्थित असलेल्या शिवमंदिरावर मर्दला समूहातील एकूण चार सुंदरी पहावयास मिळतात. त्यामध्ये मृदंग किंवा पकवाजा प्रमाणे वाद्य वाजवणार्या दोन रुपसंपन्न, ललना,व एक अप्सरा डमरूच्या आकाराचे वाद्य वादन करित आहे. एक अप्सरा वीणा वाजवणारी वीणावादिनी आहे. मर्दला या समूहामध्ये मोडणाऱ्या या सुरसुंदरी मोहक आहेत. या चारही रूपगर्वितांची वैशिष्ट्य पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेच्या मंडोवरावर स्थित असणार्या मूर्ती पैकी हि पहिली मूर्ती होय.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ असे की, मंदिराच्या भोवती चारिहि बाजूस गावकरांनी मातीची भर घातली असल्याने ह्या सर्व सुरसुंदरीना अगदि जवळून हात लावून पाहता येते.मृदंगवादिनी सुरसुंदरी.
कोरवलीच्या मंदिरावर मर्दला या गटातील मृदुंग वादिनी पहावयास मिळते. ही मृदुंगवादिनी कोरवलीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्यावेळी भिंतीच्या आत गेलेली होती. अनेक वर्षे तिच्यावर सिमेंट दगड माती वाळू यांचा थर होता. परंतु अलीकडे यातून तिची मुक्तता झालेली आहे. मृदुंगवादीनी प्रत्यक्ष स्वर्गातून धरतीवर उतरलेल्या अप्सरे सारखी आहे.ती पाहताक्षणी नजरेत भरते. तिचा सडसडीत बांधा आणि तिचा गात्रांची लयदार हालचाल एवढी देखणी अप्सरा गेली अनेक वर्षे या मंदिराच्या बाह्य भिंतीवर असूनही सिमेंट काँक्रीटच्या कारावासात अडकली होती.
सौंदर्याची अनेक लक्षणे हिच्या ठायी दिसतात. तिच्या मस्तकावरील कुंतलांची रचना गोलाकार पद्धतीने झालेली आहे, हे एक प्रकारचे मुक्ताजाल आहे. केसांच्या समोर झेपावणाऱ्या काहि अस्ताव्यस्त बटाना तिने आपल्या कपाळावर व्यवस्थित घट्ट बसवलेले आहे. इतर सुंरसुंदरी प्रमाणे हिचा केशसंभार घनदाट आणि लांबसडक असल्याचे जाणवते. यासाठी त्यांनी आपल्या केसांना झुकलेल्या सारख्या रचनेत बांधून टाकले आहे.
चेहरा गोल गरगरीत आणि गुबगुबित आहे. दोन चक्षु व त्यावरील भुवया नासिका आणि तिच्या नाजूक अधरांचे स्पष्ट वर्णन करता येत नाही. कारण तिच्या चेहऱ्याचे थोड्या प्रमाणात भंजन झाले आहे. स्मित हास्य करणारी ही सुहास्यवदना आहे. आपल्या चेहऱ्याला साजेल अशीच भलीमोठी तरीही सुबक अशी कर्णभूषणे ल्याली आहे. ठशठशीत कर्णभूषणे आणि तिचा विपुल केशसंभार हेच तिच्या झुकल्या मानेचे कारण असावे .समांतर रेषा असणारे तिचे दोन्ही खांदे यांनी खांद्यापासून खाली आलेले अतिशय प्रमाणबद्ध आणि लांबसडक असे तीचे दोंही कर तिच्या मूळच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत.
खरोखरच सिंहकटि म्हणजे काय? याची पाहणाऱ्यास जाणीव होण्यासाठीच कलाकारांनी एवढा नाजूकपणा आणि लयदार वक्रता पाषाणातून निर्देशित केली असावी. तिच्या नाजूक पावला वरून देखील तिच्या नृत्य हालचालीची स्पष्टता येते. या स्वर्गीय अप्सरेला केवळ हळुवार मृदुंग वाजवित नृत्य करण्यासाठीच कोणीतरी येथे उभे केले आहे असे भासते. साजेसे परंतु मोजकेच अलंकार तिने आपल्या तनूवर चढविले आहेत.
त्यामध्ये कानातील तिची भलीमोठि कर्णाभूषणे,स्कंदमाला,ग्रीवा,स्तनहार,केयूर,पादवलय,पादजालक यांचा समावेश आहे तिने नेसलेल्या वस्त्राचा सोगा हादेखील रेखीव असाच आहे. नखशिकांत लावण्यमयी असलेली ही मर्दला मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर