मुधोजी मनमोहन राजवाडा, फलटण –
छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा अनेक आठवणींची साक्ष देत फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचे जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फुट इतके बांधकाम असून, मुधोजीराव जानोजीराव नाईक-निंबाळकर यांनी हा राजवाडा बांधला आहे.. राजवाड्यात रामाचा चौक, दसर्याचा चौक, देवीचा चौक, तुळशीचा चौक, मुदपाक चौक, खासगीचा हॉल, पागा चौक व नजरबाग असे चौक आहेत, तसेच गुलाबी हॉल, हिरवा हॉल, बदामी हॉल, दरबार हॉल, सुरुच हॉल, हमखासे हॉल, इंग्रजी हॉल अशा बैठकिच्या खोल्या असून, एनंदर 24 शयनगृहे आहेत.
सात खणी, चार खणी, गोल खणी, लक्ष्मी टेरेस, टॉवर हुजुर ऑफीस, खासगी, फड, तालीम , देवघर, माजघर, खजिना असेही भाग आहेत. मुधोजी महाराजांनी बसवलेले ब्रिटीश बनावटीचे उच्च प्रतीचे नक्षीदार फर्निचर मन मोहून टाकते, तसेच भिंतीवरील मोठे बिलोरी आरसे झेकोस्लोव्हाकीचन बनावटीची हवेच्या झुळूक आल्याबरोबर किणकिणारी क्रिस्टलची झुंबरे, वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या हंड्या, भिंतीवरील पूर्वजांची तैलचित्रे, हमखासे हॉलमधील चांदीचे फर्निचर व चांदीचा झोपाळा, शयनगृहामधील उच्च प्रतीचे शिसवी पलंग, कपाटे, ड्रेसिंग टेबल यांची नक्षी पाहून मन अचंबित होते.या राजवाड्यात अनेक भुयारे आहेत. एकंदर चौदा जिने आहेत. राजवाड्याच्या हत्ती दरवाजावरील दगडी अंबारी राजवाड्यात जाताना मन वेधून घेते.
हत्तीखाना, नगारखाना, जामदार खाना, दिवाण खाना, रथखाना, पोशाख खाना, पागा या वास्तूदेखील राजवाड्याच्या आजूबाजूला आहेत. काळाच्या ओघात हत्तीखाना व पागा या इमारती आता नामशेष झाल्या आहेत. राजवाड्यहाच्या पूर्वेला गेस्ट हाऊस होते. ते आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. त्याच्या शेजारी जेल(तुरुंग) असून, त्याच्या पलीकडील बाजूस छत्रपती शिवाजी वाचनालयाची इमारत आहे. हिचे पूर्वीचे नाव हुजूर लायब्ररी असे होते.
या राजवाड्याने राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वपुर्ण भूमिका निभावलेली आहे. मधल्या काळात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन होताना संस्थानची असलेली 64 लाख रुपयांची रक्कम भारत सरकारला सुपूर्द केली. त्यांनी याच राजवाड्यात विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये दहा हजार एकर जमीन सरकारला दान केली. सन 1957 मध्ये याच राजवाड्यात ग्रामीण भागातील पहिल्या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या राजवाड्यात सर विश्वेश्वरय्या, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे, साहीत्यीक न. चिं. केळकर, आचार्य प्र. के. आत्रे, कवी माधव ज्युलियन, सामाजिक कार्यकर्ते रामानंद गद्रे, माजी केंद्रीय कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई, इंदिरा गांधी, माजी खासदार इंदिरा मायदेव, यशवंतराव चव्हाण, महर्षी धोंडो केशव कर्वे, राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब खेर,
सरदार वल्लभभाई पटेल, सरदार गुप्ते, रँग्लर परांजपे, आदिंचे नेहमी येणे जाणे असे.
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेसह अगदी इंग्लिश मिडीयम स्कुलपर्यंतच्या अनेक संस्थांचा जन्म या राजवाड्यातच झाला. या राजवाड्यात अनेक सरकारी कार्यालयांचे वास्तव्य होते. त्यामुळे या राजवाड्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झालेले होते; परंतु तत्कालिन जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून राजवाड्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
बदलत्या काळानूसार राजवाड्याच्या वैभवाने बॉलिवूडलाही भुरळ घातली आहे.
अक्षयकुमारचा खट्टा-मिठ्ठा, सुश्मिता सेनचा देख भाई देख, तशेच झाशीची राणी, नऊ महिने नऊ दिवस, पांढर, एक होता राजा, कुंकू, गाढवाचं लग्न, शंभू माझा नवसाचा या चित्रपटांचे व विविध मालिंकांचे चित्रीकरण येथे झाले आहे. नाना पाटेकर, सुश्मिता सेन, मिलींद गुणाजी, कॅटरिना कैफ, अक्षयकुमार, ग्रेसी सिंग, अरुणा इराणी, रिमा लागू, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना या राजवाड्यहाने भुरळ घातली आहे. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असलेल्या जुन्या दुर्मिळ मोटारी व उत्तम जातीचे अश्व हेही या बॉलिवूडच्या कलाकारांचे आकर्षण असल्याचे एक ऐतिहासिक राजवाडा ते चित्रपटनिर्मिती केंद्र असा होत असलेला प्रवास महाराष्ट्राच्या लौकिकात आणखी भर टाकत आहे.
Sunita Kokare