महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,855

खानदेशातील मुघलकालीन उद्योगधंदे

By Discover Maharashtra Views: 2689 7 Min Read

खानदेशातील मुघलकालीन उद्योगधंदे –

खानदेशातील मुघलकालीन उद्योगधंदे हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून होते. त्यांचा  व्यापार तसेच सातपुड्याच्या डोंगरात उत्पन्न होणारी जंगल संपत्ती हा सुद्धा मोठा उद्योग होता. कापड तयार करण्याचा सर्वात मोठा उद्योग होता. मुगल काळात तो भरभराटीस आला.मनुची यांचा उल्लेख करतांना म्हणतो की,” खानदेशचा प्रदेश रंगीत कापडासाठी प्रसिध्द होता. तेथे तयार केलेले कापड पर्शिया, अरेबियाआणि तुर्कस्थान इकडे निर्यात होई. बऱ्हाणपूर हे कापड उद्योगाचे केंद्र होते. तेथील कापडाला सर्वत्र मागणी असे.कापूस आणि रेशीम यापासून कापड निर्मिती होई. बऱ्हाणपूर येथे चकचकीत व रंगीत छटाचे कापड तयार होत असे. शिवाय लालबहरमी कापडही तयार होई.ते तुर्कस्तान, ग्रॅंड कैरो, पोलंड, अरेबिया इकडे निर्यात होत असे. मूर जातीचे कारागिर होते.

धरणगाव आणि एरंडोल ही दुसरी कापड उद्योग केंद्र होती. धरणगावला बैरामीचे कापड तयार होत असे.ते दिल्ली आणि इतर शहरांच्या कडे जाई. नंदुरबार, नवापूर ही सुद्धा या उद्योगात गुंतवणूक करणारी शहरे होती. तेथील पटका हा इंग्लंडला निर्यात होत असे. सुमात्रा, जावा आणि बॅटाम येथे सुध्दा जाई.

साखर तयार करण्याचा उद्योग हा नवापूर नंदुरबार आणि इतर ठिकाणी होता तर मद्य तयार करण्याचा उद्योग भिल्ल व फ्रेंच लोकही महुपासून दारू तयार करत. रंगकामाचा उद्योग कापडाच्या उद्योगांना जोडून चाललेला असे. नौका तयार करण्याचा उद्योग होता कारण गिरणा, तापी, पुर्णा या रूंद पात्रांच्या नद्यांना पूर येत शिवाय जलवाहतूक हा महत्त्वाचा घटक होता. सातपुड्याच्या आतमध्ये सागाचे लाकूड मुबलक उपलब्ध होते. तळोदा भागात बैलगाड्या बनत असत.

व्यापारामुळे प्रमुख शहरे व व्यापारी केंद्र निर्माण झाली. त्यातील बऱ्हाणपूर हे महत्त्वाचे केंद्र होते.

खानदेशातील प्रमुख शहरे जी फारुकी काळात होती त्यात थाळनेर, लळींग, आणि बऱ्हाणपूर हे महत्त्वाचे केंद्र होते. त्यात बऱ्हाणपूर ही राजधानी झाली आणि महत्व वाढले. या शहराला दक्षिणेकडून उत्तरेकडे जातांना प्रवेशद्वार म्हटले आहे. तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे येतांनाही सारखेच होते.

मुगल काळात “दारूससुरूस” असेही एक नाव होते. इ.स. १४०१ मध्ये नासिरखानाने या शहराची स्थापना केली आणि दख्खनमधील प्रसिध्द संत बुरहाउद्दीन यांच्या नावावरून बऱ्हाणपूर हे नाव दिले. राजपुत्र खुर्रम याने जेव्हा या शहराला भेट दिली. तेव्हा शहराभोवती १२ कोस लांबीची शहराभोवती तटबंदी बांधली. सतराव्या शतकात हेंरी यांच्या वर्णनात हे शहर वैभवशाली आणि दाट लोकवस्ती असलेले होते. दख्खनमधील सुभ्याचे संरक्षण करण्यासाठी अकबराने बादशहाने चाळीस हजार घोडदळ ठेवले होते. मुगल काळातील या शहरात अनेक युरोपीय व्यापारी येऊन राहिले होते. कुशल कारागीर व दलाल यांचाही समावेश होता. शहरात अनेक सुंदर बागा होत्या. इस्लामपुरात अतिशय सुंदर बाग होती. अमीन या अधिकाऱ्याकडे तिच्या देखरेख करण्यासाठी ठेवले होते. येथे तयार होणाऱ्या कापडामुळे  आणि लोखंडामुळे अनेक पर्शियन आणि अर्मेरियन व्यापारी या शहरात येऊन राहतात.

तसेच विपुल प्रमाणात फळफळावळ उपलब्ध होत असे. सोळाव्या शतकात येणाऱ्या  सर थॉमस रो यास हे शहर उजाड आणि तापदायक वाटले. परत १७ व्या शतकात येथील राजवाडा आणि सुंदर राजदरबार यामुळे परत एकदा गजबजलेले होते तर उद्योगधंदे वाढल्याने पुरे तयार झाली. हसनपुरा, शाहगंज, बाहदरपुरा, शाहजहान पुरा, खुर्रमपुरा, मावाबपुरा, असे पुरे तयार झाली आणि शहर वाढले. इंग्लंड, पौर्तुगाल तसेच फ्रांस वरून व्यापारी येऊन राहिले. शियापंथीय बोहरा लोक या शहरातील व्यापारी व सावकारीत अग्रेसर होते.

इ.स.१६१५ मध्ये इंग्रज्यांनी त्यांची वखार येथे स्थापन केली. या वखारीतून कापड, लोखंड, जस्त, मसाल्याचे पदार्थ, आणि जिवनावश्यक वस्तू बाहेरील प्रदेशात रवाना होत असत. हे शहर सुरत आणि मुगलांची राजधानी आग्रा,दिल्ली यांना जोडणाऱ्या महामार्गावर होते. या शहरात मलमल, रंगीत कापड, इतरही प्रकारचे कापड हे पर्शिया, तुर्कस्तान, पोलंड, अरेबिया, ग्रॅंड कैरो, आणि होरमुझ, मंगोलिया इत्यादि देशात जात असे. देशांतर्गत व्यापार तसेच टाकसाळी आणि राजकीय घडामोडी तसेच लष्करी तळ यामुळे हे महत्त्वाचे केंद्र होते.

धरणगाव हे डुनगाव, दहेजगाव या जुन्या नावांनी मध्यमयुगीन शहर म्हणून ओळखले जात होते. मुगलकाळात धरणगाव साडी, बैरमी, छीट कापड या प्रकारच्या कापडासाठी प्रसिध्द होते. इ.स. १६७४ मध्ये इंग्रज्यांनी येथे वखार उघडली. कुशल कारागिरांच्या वसतीमुळे हे महत्त्वाचे शहर होते. हातकागदही येथे तयार होत असत. सन १६०१ मध्ये मुगलांनी हस्तगत केले. तेव्हा “सिरीसाफ” व “भिरीन” हे कापड प्रसिध्द होते असे अबुल फजलने ऐन ए अकबरी मध्ये नोंद केली आहे.

शिवाजी महाराजांनी १६७५ व १६७९ दोनदा हे शहर लुटले. १६७५ मध्ये महाराजांनी खानदेशचा मुगल सरदार बहादुरखानवर हल्ला करून धरणगाव लुटतांना इंग्रज्यांच्या वखार सुध्दा लुटली होती. या लुटीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नजराणा घेऊन गेलेला इंग्रज वकील सॅम्युअल ऑस्टिन हा ७ सप्टेंबर १६७६ मध्ये महाराजांना रायगडावर भेटला होता. परंतु महाराजांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.( शा.वि.आवळासकर,रायगडची जीवन कथा).

सन १६८५ मध्ये संभाजी महाराज यानी लुटून आगी लावून बेचिराख केले. मराठी सैन्याने १६७५ मध्ये धरणगाव लुटले, त्यावेळी मुगली ठाणेदार कुतुबुद्दीन याने निकराचा विरोध केला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. गावात एक पिरान दस्तगिर नामक दर्गा हा औरंगजेबाने बांधला आहे असे सांगतात. रेल्वे स्थानकाजवळ भिल्लांचा पुढारी खाजा नाईक याचा पुतळा आहे.पाताळेश्वर मंदीर आहे.  लहानमोठ्या चौदा मशिदी आहेत. पाच दर्गे आहे. काही उध्वस्त कबरी या वसाहती मधील ब्रिटिशांच्या आहेत.

धरणगाव : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एक शहर. जळगावच्या पश्चिमेस सु. ३० किमी. वर तसेच भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील स्थानक. लोकसंख्या २४,३६५ (१९७१). हे हातमाग उद्योगाचे केंद्र असून कपाशीवरील प्रक्रिया व तेलबियांसाठी प्रसिद्ध आहे. १८६६ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. सतराव्या शतकातील दोनगाव, दोरोनगाव, द्रोणगाव यांसारख्या नावांनी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याचा उल्लेख आढळतो. १६०० च्या सुमारास चांगल्या प्रतीच्या कापडांसाठी प्रसिद्ध होते. या शहरी १६७४ मध्ये इंग्रजांनी व्यापारासाठी वखार स्थापन केली होती. १६७५ आणि १६७९ मध्ये शिवाजीने व १६८५ मध्ये संभाजीने हे शहर लुटले होते. मराठेशाहीच्या काळात भिल्लांचीही सतत आक्रमणे धरणगावावर होत. १८१८ मध्ये ते इंग्रजी अंमलाखाली आले. शहराच्या मध्यभागी असलेला दर्गा औरंगजेबाने बांधला आहे असे म्हणतात. येथे ३०० वर्षांपूर्वी बांधलेले पाताळेश्वराचे मंदिर आहे. शहरामध्ये ‘झुमकरण’ नावाचे सार्वजनिक वाचनालय आहे. येथे सरकी काढण्याचे आणि कापसाचे गठ्ठे बांधण्याचे कारखाने आहेत.(खानदेशातील मुघलकालीन उद्योगधंदे)

गाडे, ना. स.

साभार – सरला भिरुड & Khandesh FB Page

Leave a Comment