महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,814

खानदेशातील मुगल प्रशासन

By Discover Maharashtra Views: 2665 10 Min Read

खानदेशातील मुगल प्रशासन –

मुगल कालीन इतिहास कार अबुल फजल याने इ.स. १५८२ या वर्षी खानदेशाच्या सीमा आणि भुप्रदेशाची माहिती अशा प्रकारे दिली असून याच्या मते खानदेशाला दानदेशाचा सुभा मानला जाई. आशिरगड जिंकल्यावर खानदेशाला दानदेश असे नाव दिले. हांडीयाजवळील पुरगावपासून ते सलंग पर्यत अहमदनगर येथील सरहद्दीला लागून जवळजवळ पंच्च्याहत्तर कोस लांबीचा ते आणि जामोद पासून आणि पालपासून बेरार राज्याच्या सिमेपर्यत ते माळव्यापर्यंत पसरलेला पन्नास कोस रूंदीचा प्रदेश असा खानदेशाचा विस्तार होता तर ईशान्य दिशेला माळवा दक्षिणेकडे अजिंठा डोंगररांगा पुर्वेस बेरारचे राज्य आणि उत्तर दिशेला पसरलेली लांबची लांब सातपुड्याच्या रांगा आहेत. या प्रदेशाचे भौगोलिक वैशिष्ट्ये सांगतांना अबुल फजल म्हणतो की, ” बागलाण इतकाच हा प्रदेश मजबूत आहे. या प्रदेशात एकेका दिवसाला आगेकूच करतांना एक एक असे भिन्न भिन्न दिशेला असे वीस किल्ले आहेत.(खानदेशातील मुगल प्रशासन)

चांदवड, अंकाई, टंकाई, साल्हेर, त्रिंबक, गाळणा, मांगी तुंगी अशी ठिकाणे याच प्रदेशात आहेत.या भागातून तापी वहात असून तिची खोली काही ठिकाणी तीस ते चाळीस फूट खोल आहे”.

हॅमिल्टन याने अठराव्या शतकातील खानदेशातील प्रजेबद्दल म्हटले आहे की पाच षष्ठांश प्रजा हिंदू आहे.एकुण प्रजा वीस लाख एवढी आहे. तापी आणि नर्मदेच्या खोऱ्यातील लोक भिल्ल असून त्यांच्या लष्करी प्रमुखांचे वर्चस्व हे सातपुड्याच्या रांगेतील जाणाऱ्या मार्गावर आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी भिल्ल सैनिकांच्या बरोबर अरब आणि हिंदुस्थानी सैनिकांचा समावेश असतो. त्याने पुढे असेही वर्णन केले आहे की गाळणा,चांदवड, लळींग, नामपूर ही या भागातील प्रमुख शहरे आहेत.

मुगल प्रशासनाने काय व्यवस्थापिय बदल केले? सर्वात प्रथम दानदेश हा मुगल सुभा समजण्यात आला. १६०१ मध्ये. त्याची विभागणी सरकार, महाल, परगणा, आणि देहे यात केली. खानदेश सुभ्यात बिजागड, बऱ्हाणपूर, नंदुरबार,गाळणा, बागलाण इत्यादि सरकारांचा समावेश होत होता. खानदेशच्या सुभ्यात ३२ परगणे होते. असोद,अत्राण, एरंडोल, अमळनेर, वरणगाव, पाचोरा, पुरमाळ, बोदवड, बहाळ, भडगाव, बेटावद, भामेर, थाळनेर,जामोद, जामनेर, चान्सर, चोपडा, डांगरी, रावेर, सावदा, ऐनपूर, शेंदुर्णी, एदलाबाद, लोहारा, मांजरोद, नसिराबाद, इत्यादि समावेश होता. इ.स. १६३६ या वर्षी खानदेशात जळगाव, धुळे आणि गाळणा यांचा समावेश झाला तर शाहजहान या बादशहाने खानदेशात बिजागड, नंदुरबार, हांडियाचे काही महाल समाविष्ट केले.  इ.स. १६३७ मध्ये बागलाण खानदेशला जोडण्यात आले. इ.स. १६३७-३८ मध्ये खानदेशात एकूण १२८ परगणे, ६,३३९ खेडी होती.

दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल(हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मन्त्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसम्बन्धी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिन्दीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली ‘कुळकर्णी वतने’ समाप्त केल्या गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली. शाहू महाराजांनी सन १९१८ मध्ये पगारी तलाठी पदाची नियुक्ती केली.

मोगल राजवट:-

जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.१५४० ते १५४५ दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.

मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळीचा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी १/३ एवढा हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील १९ वर्षाच्या सरासरी इतके पुढील १० वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे. मंत्री तोरडमलची वरील नमुद पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन १६०५ ते १७२६ या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.

या प्रदेशातील व्यवस्था बघण्यासाठी  खालील अधिकारी होते.

सुभेदार –

सुभेदार हा सुभ्याचा प्रमुख असे आणि काही वेळा त्यास नाझीम देखील म्हणत असत. सुभ्यात शांतता ठेवणे ही त्यांची जबाबदारी असे तर सुभेदार एका सुभ्यावरून दुसऱ्या सुभ्यावर बदली होत असे. नायब सुभेदार हा सुभेदाराच्या गैरहजेरीत नेमला जाई. काही वेळा सुभेदारास फौजदाराचीही जबाबदारी पार पाडावी लागे. किंवा याउलटही होत असे. खजिन्याची रवानगी योग्य ठिकाणी करावी लागे. परकिय व्यक्तीकडून नजराणे स्विकारणे, त्यांच्या संमतीने युरोपियन लोकांनी वखारी उघडलेल्या होत्या.

दिवाण हा सुभेदारानंतरच अधिकारी होता. त्याची नेमणूक बादशहाकडूनच होई. खानदेशातील दिवाणाला बेरारच्या दिवाणाचीही कामे करावी लागत. सुभ्यात खजिना व जमिन महसुलाची सर्व जबाबदारी सोपवली होती.त्यास परगण्यातील किल्ले, सरकारी इमारती, यांच्या दुरूस्ती साठी पैशाची तरतूद करावी लागे. सुभ्यातील बेवारस व्यक्ती मरण पावल्यास मालमत्ता जप्त करण्याची जबाबदारी दिवाणाची होती. तसेच सरकारी कारखाने सुध्दा दिवाणाच्या देखरेखीखाली ठेवले जात. दुष्काळात अन्नधान्य पुरवणे, संकटात मदत करणे, जनतेवर जास्त कर लावण्याचा अधिकार तर किल्लेदारास तोफखान्यासाठी लागणारी सामग्री पुरवणे, सुभ्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी दिवाणाची असे.

दिवाणाचे कार्यालयात  वाकानवीस मुश्रफ आणि खजिनदार इ.प्रमुख अधिकारी होते. मुश्रफ यास खजिन्याचा हिशोब बघावा लागे खजिनदारास एकूण येणे व देणे याची नोंद ठेवावी लागे.शिल्लक रकमेवर देखरेख ठेवावी लागे. काही वेळा मुतासादी यास दिवाणाचा प्रतिनिधी म्हणून नेमण्यात येई. तसेच वाकानवीस हा इतर अधिकाऱ्यांप्रमाणे महत्त्वाचा अधिकारी मानला जाई.

फौजदार –

फौजदाराची नेमणूक  प्रांतात, सरकारात आणि शहरात करण्यात येई. फौजदारास एकाच वेळी अनेक शहरांच्या फौजदारीचा कारभार सांभाळावा लागे. जसे की सय्यद महंमद हा इ.स.१६९२ मध्ये एकाच वेळी सुलतानपूर आणि नंदुरबार या शहरांची फौजदारी सांभाळली होती. फौजदार यास लष्करी कामे पार पाडावी लागत. बंडखोरांना शासन करण्याची जबाबदारी त्यांचीच होती.

काही वेळा परगण्यातील पाटबंधाऱ्यावर देखरेख करण्यासाठी फौजदार नेमला जाई. परगण्यातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत. कसब्याच्या शहरातील न्याय प्रशासनात त्याचा कारभार असे. फौजदाराने त्याच्या कामात कुचराई केल्याचे बादशहास आढळल्यास त्याचा मनसबीचा दर्जा कमी केला जात असे.

ठाणेदार आणि किल्लेदार –

लष्करी ठाण्याच्या प्रमुखास ठाणेदार म्हणत त्यांचेकडे प्रत्येक ठाण्यास लागणारे पन्नास ते पाचशे घोडेस्वार दल असे. ठाणेदाराच्या देखरेखीखाली किल्ले येत असत ठाणेदार यास दोन ते तीन हजार मनसबदाराचा दर्जा दिला जाई.  ठाणेदारांना त्यांच्या प्रदेशातील पोलीसाप्रमाणे कर्तव्य पार पाडावी लागत. त्यांच्याकडे हमरस्त्याच्या टेहेळणीचे काम असे. लष्करी वाहतूक सुरळीत करण्यासाठी व्यवस्था करावी लागे. बंडखोरांना शिक्षा देणे तसेच मार्गावर असलेल्या लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी, पकडले गेले तर शिक्षा करणे ही कामे असत.

किल्लेदारास किल्ल्याच्या रक्षणासाठी व व्यवस्था ठेवण्यासाठी लागणाऱ्या गरजांची माहिती ही बादशहास द्यावी लागे. परगण्यातील जमिनदार हा किल्लेदारामार्फत बादशहाकडे अर्ज विनंत्या पाठवत असत. तसेच राज्यातील महामार्गावरील लुटारूंचा उपद्रव करणाऱ्या लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना शिक्षा, कैद ही जबाबदारी किल्लेदाराची असे शिवाय सरकारी तोफखान्यातील सामग्री, दारूगोळा वगैरे देखरेख किल्लेदारास ठेवावी लागे.

बक्षी –

प्रांतावरील लष्करी व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी तसेच शहरांच्या देखरेखीखाली बक्षी पद असे. त्याच्या गैरहजेरीत नायब बक्षी काम बघत.काही प्रसंगी बक्षी यास वाकानविसाचे काम करावे लागे.बक्षीची नेमणूक ही बादशहाकडून होई. किंवा सुभ्याचा सुभेदार शिफारस करीत असे. तर बरेचदा सुभेदारी वरून निवृत्त झालेल्या व्यक्तीकडून बक्षी म्हणून काम करवून घेतले जाई. बक्षीला सुभ्यातील सर्व प्रकारच्या माहिती बादशहास पाठवावी लागे. यात सुभ्यातील सरंजाम आणि सरदारांबद्दल माहिती सरकारकडे पाठवणे हे त्याचेच काम होते. मनसबदारांकडील सैन्याचा हिशोब, त्याची माहिती सरकारला कळवणे, प्रांतातील सैन्यावरील होणाऱ्या खर्चाचा हिशोब,त्याची तपासणी आणि घोड्यांची पहाणी ही कामे बक्षीस करावी लागत.

अमीन –

हा परगण्यातील महसुलाचा तपासनीस होता. त्याला परगण्याती महसुलाची चौकशी, तपासणी करावी लागे तर परगण्यातील खजिन्यातून त्यास पगार मिळे.त्यास काही वेळा बक्षी किंवा वाकनवीस म्हणून काम करावे लागे. शंभर स्वारांचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याचा मनसबीचा दर्जा होता.

काझी –

प्रांतातील आर्थिक, मुलकी तंट्याचा न्यायनिवाडा करावा लागे. बऱ्हाणपूर हे काझीचे ठिकाण असे शिवाय परगणा आणि सरकारी ठिकाणी काजींची नेमणूक असे. बरेचदा साक्षीदार म्हणून काम पहात असत. सरकारी ठिकाणी पगार मिळे तर परगण्यांच्या ठिकाणी एखादे गाव दान मिळे. लाचखोर काजीला कैद होई व इस्लामच्या कायद्यानुसार शिक्षा मिळे.

कोतवाल –

सुभ्यातील प्रत्येक शहरांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कोतवाल यास काम करावे लागे. शहरातील चोऱ्या, लुटारू यांचा बंदोबस्त ठेवावा लागे. शहरातील जिवनावश्यक वस्तूंच्या किमती वर नियंत्रण ठेवणे, खानदेशात होणारा भिल्ल व कोळी लोकांचा सामान्य लोकांना होणारा उपद्रव थांबवणे शहरात शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे ही जबाबदारी त्याची होती. शहरात चोरी झाल्यास त्याची नुकसानभरपाई त्यास द्यावी लागे. त्यासाठी चोरीचा अर्थ लावून गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा करणे ही त्यांची महत्वाची जबाबदारी होती तर तुरूंगाची व्यवस्था बघावी लागे. तुरूंग अधिकारी म्हणून काम पहावे लागे. काही मुस्लीम कोतवालांना जिझीया करास विरोध करणाऱ्या हिंदू लोकांना शिक्षा करण्याचे काम सोपवले होते.त्याच्या कार्यालयास कोतवाली चबुतरा म्हणत. त्यात अमीन, अहदीज, मिशल, बारदार आणि नाईक यांचाही समावेश होई. मुकादम

हा खेड्यांचा प्रतिनिधी म्हणून काम पहात असे.महसूल अधिकारी व न्यायाधिकारी म्हणून काम पहात होता.त्याच्या मोबदल्यात काही गावे इनाम म्हणून दिले जात असत. एका प्रकारे खेड्यातील पोलीस अधिकारी म्हणून काम पहात असे. चोरांचा शोध लावून शिक्षा देणे तसेच इतर बाबींना जबाबदार असे.खानदेशातील मुगल प्रशासन.खानदेशातील मुगल प्रशासन.

Suresh Suryawansh 

Leave a Comment