मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर –
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे प्राचीन काळापासून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. यादव साम्राज्याची राजधानी भूषविलेल्या या प्राचीन सिन्नर शहरामध्ये गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर यासारखी प्रसिद्ध प्राचीन मंदिरे आहेतच, त्यांच्याबरोबर आणखी एक मंदिर आहे, जे फारसे प्रसिद्ध नाही. सिन्नरच्या इतिहासाला समृद्ध करण्यात सिन्नरच्या वैभवात भर टाकणार्या या मंदिराचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामध्येच सिन्नर येथील फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले मुक्तेश्वर मंदिर मात्र आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.
सिन्नर शिर्डी महामार्गालगत असलेल्या मुक्तेश्वरनगर येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. सध्या मंदिराची बरीच पडझड झाली असल्याने मंदिराचे गर्भगृह फक्त शिल्लक आहे. परंतु मंदिराच्या शिल्लक अवशेषांवरून मंदिर किती मोठे असावे हे समजण्यास नक्कीच मदत होते. मंदिर जवळपास पाच फूट उंचीच्या दगडी चौथर्यावर उभारलेले असून, हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशीच मुक्तेश्वर मंदिराची रचना असावी, हे मंदिराच्या विधानावरून समजण्यास मदत होते. मंदिराचे केवळ गर्भगृह सध्या शिल्लक असून गर्भगृहाच्या मध्यभागी शिवलिंग आहे.
ग्रामस्थांनी या मंदिरांची उत्तम स्वच्छता तसेच साफसफाई ठेवली असून मंदिर जरी छोटे असले तरी तो एक ऐतिहासिक ठेवा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शासन व पुरातत्व विभागाने मंदिराची डागडूजी करून मंदिराची पडझड थांबवावी व मंदिराला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे अशी ग्रामस्थ आशा करतात.
– रोहन गाडेकर