महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,999

मुंबई आणि उठाव

By Discover Maharashtra Views: 1311 4 Min Read

मुंबई आणि उठाव –

इकडे महाराष्ट्रात सर्वत्र इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट उसळली असता, मुंबईतील चित्र मात्र वेगळेच होते. मुंबई बेटाला सातारा, कोल्हापूरसारखा स्वातंत्र्याचा पूर्वानुभव नसल्याने मुंबई थंड होती. कंपनी सरकारवरील राजनिष्ठा व्यक्त करण्यात काही समाजांमध्ये चढाओढच लागून राहिली होती. या संकटांतून पार होण्यासाठी सप्तशतीचे अनुष्ठान करावे असा सल्ला मुंबईच्या एका शास्त्र्याने गव्हर्नरला दिला होता. हे आपल्या २ सप्टेंबर १८५७ च्या पत्रात त्याने म्हटले आहे,(मुंबई आणि उठाव)

“हानराबल कौसल गवरनर साहेब यासी मंबई येथे अर्ज अर्जि बेशमी गोविंद शास्त्री राहणार हाली मुंबई सलाम अर्ज करीतो. आपल्या राज्य प्रकर्णी गडबड जाली आहे. यास सरकार सप्तशतीचे अनुष्ठान करवीतील तर या संकटातून पार होतील. याविशी आम्ही उद्योग करू या अनुष्ठानांत बहुतेक संकटातून पार जाले आहे. तर बाजीराव पेशवे याणीही फार अनुष्ठानास ब्राह्मण घालून ते अनुष्ठान गतवर्षी समाप्त त्याचे चिरंजीव याणी केले. या पत्राचा जाब मार्काटात मसीदीजवळ दागिन्याची सोन्यारुप्याची दुकान आहे मुरार पीतांबर व रामचंद्र गंगाधर यांचे दुकानीं सरकारास कारण असल्यास उत्तर पाठवावे ता.२ सप्तंबर गोविंद शास्त्री. (१८५७ ची पोलिटिकल डायरी क्र.२६ (११) पृ . ४४७-४४९ महाराष्ट्र सरकार पुराभिलेख खाते मुंबई)

हे पत्र सरकारात ५ सप्टेंबर १८५७ रोजी दाखल झाले आणि ७ सप्टेंबरला त्याचे इंग्रजी भाषांतर करण्याचे आदेश देण्यात आले. वास्तविक, सरकारच्या दृष्टीने हे पत्र कुचकामी होते, तरी ब्राह्मण वर्गाचा आपल्याला पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी ते जपून ठेवले असावे.

मुसलमान समाजाला देखील इंग्रज हेच आपले तारणहार आहेत, असे वाटत असावे.

आपली राजनिष्ठा व्यक्त करण्यासाठी मुंबईचा काझी मोहोम्मद युसूफ याने मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड जॉन एलफिन्स्टनला १ ऑक्टोबर १८५७ च्या पत्रान्वये मुसलमानांच्या भावना व्यक्त करणारे एक निवेदन धाडले होते. या निवेदनास जोडलेल्या पत्रात मुंबईचा काझी म्हणतो की,

“मुंबई इलाख्यातील सर्व मुसलमान बांधवांनी सरकारविरुद्ध चालू असलेल्या उठावापासून दूर रहावे आणि आपली राजनिष्ठा, आणि ब्रिटिश सरकारवरील आपला दृढ़ विश्वास त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने व्यक्त करावा या हेतूने एक उर्दू-इंग्रजी भाषेत निवेदन तयार केले आहे. गव्हर्नर साहेबांना हे पसंत पडले तर, त्याच्या शिळाप्रेसवर प्रती छापून त्या आपल्या प्रदेशांतील मुसलमान बांधवाना वाटण्याची अनुमती द्यावी.”

या निवेदनावर उलमा, मुफ्ती आणि ४० मुसलमान पुढारी व्यक्तींच्या सह्या आहेत. या पत्राची पावती ३ ऑक्टोबर १८५७ रोजी कंपनी सरकारने दिली आहे.

प्रस्तुत निवेदनात असे प्रामुख्याने नमूद केले आहे, की मुसलमान बांधवांनी आपल्या सुखसमृद्धीच्या दृष्टीने विनाशाप्रत नेणाऱ्या बंडवाल्यांच्या कारस्थानांशी संबंध ठेवू नये. कारण, विद्यमान कंपनी सरकारच्या राज्यात आपण शांततेने जगत आहोत, आपल्यावर कसल्याही प्रकारची जुलूम जबरदस्ती होत नाही; गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समानतेने वागविले जाते. ब्रिटिश सरकारची कीती सर्व जगभर पसरली आहे. माणसाला सुरक्षितता व सुखी जीवनाचा लाभ मिळावा म्हणून विद्यमान सरकार जे प्रयत्न करीत आहे, त्याबद्दल त्याचे कौतुक आपण जाहीरपणे का करू नये? कोणाच्याही धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करीत नाही, सर्व धर्माना, पंथांना संरक्षण सरकार देते, आमच्या हितसंबंधाचे रक्षण करते, आपले असंख्य बांधव दरवर्षी मक्केला यात्रेसाठी जातात, त्यांना या दूरवरच्या प्रवासात कसली भीती वाटत नाही; कसला उपद्रव होत नाही,ते सुखरूपपणे मायदेशी परत येतात. आमच्या व्यापारी बंधूच्या हिताकडे ध्यान दिले जाते. त्यांना कसल्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही.

संदर्भ –
कंपनी सरकार-अ.रा.कुलकर्णी

 म्हराष्ट धर्म

Leave a Comment