मुरार जगदेव –
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला सुरुवात केल्यावर राजमाता जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शिवरायांच्या प्रथम पुणे भेटीचा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो.इ.स.१६३६ मध्ये शिवरायांनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विजापूरकर आदिलशाही फौजेने सहा वर्षांपूर्वी पुण्याचा केलेला विध्वंस बघायला मिळाला.इ.स.१६३० च्या पावसाळ्यात शहाजहान बादशाहच्या मदतीस धावलेल्या आदिलशाहने मुरार जगदेव,रणदुल्लाखान.कान्होजी जेधे, राया राव वगैरे सरदाराना शहाजी राजांच्या जहागिरीवर विजापुरी फौजेसह रवाना केले होते. त्यावेळी मोगल( शहाजहान ) व निजामशाही यांतील संघर्षात शहाजी राजे निजामशहा च्या बाजूने होते तर आदिलशाह मोगलांच्या बाजूने होता.
मुरार जगदेवाने ‘ पुणे कसबा वस्ती जाळून गाढवाचा नांगर पांढरीवर ( नागरी वस्तीवर )धरिला.पुण्याचा कोट पाडून शाहजीचे वाडे जाळिले व लुट केली;आणि भुलेश्वराच्या डोंगरावर दौलत मंगळ किल्ला बांधून तेथून पुणे परगण्याचा कारभार आदिलशाह कडून चालावा अशी व्यवस्था ठरविली.’ तसेच रस्त्यावर जमिनीत एक लोखंडी पहार ठोकून तिच्यावर फाटक्या तुटक्या वहाणांचे आणि जोड्यांचे तोरण टांगले ज्यातून ध्वनित करावयाचे होते कि आता हे गाव बरबाद करण्यात आले असून पुन्हा ते कुणी आबाद करण्याचा प्रयत्न करू नये,तसे केल्यास तो शाही अपराध समजला जाईल.
आदिलशाही फौजांनी विद्रूप केलेल्या पुण्याचा चेहरा मोहरा बदलुन पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली पुण्याच्या पुनर्निर्मितीसाठी जिजामाता व दादोजी कोंडदेवांनी विविध उपाय योजना करून पुण्याला पूर्वीची शान प्राप्त करून दिली. त्याचा श्रीगणेशा गाढवाचा नांगर फिरवलेल्या पांढरीत अस्सल सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने जमीन नांगरून करण्यात आला होता.
अशा रीतीने आपल्याला मुरार जगदेवांचे नाव माहित पडते.हे मुरार जगदेव कोण,कुठले होते,त्यांची मराठ्यांच्या इतिहासात दखल घेण्यासारखे कुठले कार्य,कामगिरी बजावली होती, ( सुरुवातीस नमूद केलेले पुणे विध्वंसाचे कृत्य सोडून ) ,इ.प्रश्न बरेच दिवस माझ्या मनात घोळत होते. मराठ्यांच्या इतिहासावरील माझ्या संग्रही असलेली पुस्तके वाचल्यावर मुरार जगदेव यांच्या विषयी मिळालेली माहिती संकलीत करून समूहातील सदस्यांच्या माहितीसाठी सादर करत आहे.
मुरार जगदेव यांचे मूळ गाव धोम ( सातारा ) हे होते.आपल्या कुशाग्र बुद्धी व स्वामी निष्ठेच्या जोरावर ते आदिलशाहीत वजीर समतुल्य अधिकार,प्रतिष्ठा असलेल्या पदावर जवळपास पंचवीस वर्षे टिकून राहिले.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून त्यांना आदिलशाहने ‘ महाराज राजाधिराज ‘ ह्या पदवीने गौरविले होते..ऐतिहासिक लिखाणात त्यांचा मुरारी पंडित,मुरार पंडीत ह्या नावांनी पण उल्लेख केलेला आढळतो. मुरार जगदेव यांचे विजापूर दरबारात अनन्य साधारण महत्व होते.पण ते हिंदू व धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांना विजापूर दरबारात छुपे शत्रू पण बरेच होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.१६३० मध्ये झाला.तेव्हा शहाजी राजे आपल्या आयुष्यातील अत्यंत अस्थिर राजकीय वाटचाल करत होते.मलिक अंबरचा मृत्यू,मुर्तजा निजामशहा ने लखोजी जाधव ( जिजामाता यांचे वडील ),त्यांचे दोन पुत्र अचलोजी व रघुजी,नातू यशवंतराव यांची भेटीस बोलावून विश्वासघाताने केलेली हत्त्या,शहाजहान च्या प्रबळ फौजांकडून निजामशहावर होत असलेली आक्रमणे,तात्कालिक स्वार्थासाठी आदिलशहा च्या नेहमी बदलणाऱ्या भूमिका,निजामशाहीतील अंतर्गत हेवेदावे,वगैरे कारणांमुळे शहाजी राजांचे चित्त पण कुठे स्थिर होत नव्हते.त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द निजामशाही, ( अहमदनगरची,हैदराबाद निजामशाहीशी काही संबंध नाही.)आदिलशाही,निजामशाही,मोगल,निजामशाही ह्या विविध शाह्यांमध्ये गेली.शहाजी राजांच्या आदिलशाहीतील प्रवेश व तेथील दरबारी राजकारणात टिकाव लागण्यामागे मुरार जगदेव यांची मोठी भूमिका होती. या संबंधात जेधे शकावलीत म्हटले आहे कि,’ शके १५५८ शहाजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी ईदलशहाकडून झाली.सरंजामास मुलुख दिल्हे त्यात पुणे देश राजांकडे दिल्हा.त्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेउ मलठणकर यांसी सुभा सांगून पुणीयास ठाणे घातले,तेव्हा सोन्याह नांगर पांढरीवर धरिला,शांती केली….’
कालौघात मुरार जगदेव आणि शहाजी राजे यांचे सख्य,मैत्री इतकी वाढली कि मुरार जगदेवानी पुणे जाळल्याच्या घटनेचे शल्य विसरून शहाजी राजे मुरार जगदेवांच्या तुलाविधीस स्वतः जातीने हजर राहिले.भाद्रपद वद्य अमावस्येच्या दिवशी—२३ सप्टेंबर १६३३—सूर्यग्रहण होते.या दिवशी पुण्यापासून दहा कोस अंतरावरील भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या नागरगावी सोने,रूपे,धान्य आदी चोवीस पदार्थांनी मुरार जगदेवांची तुला करण्यात आली.( एका पदार्थाने एकदा,म्हणजे एकूण चोवीस वेळा.) अल्लाउद्दिन खिलजीने हिंदू धर्मीय यादवांचे राज्य बुडविल्या नंतर च्या तीनशे वर्षांत वेद्घोषात झालेला हा पहिला तुलाविधी होता.ह्या तुला विधीमुळे नागरगाव चे नवीन नांव ‘ तुळापुर ‘ झाले.
नागरगाव इथे तुला करण्याचे एक कारण असे पण सांगितले जाते कि मुरार जगदेवांच्या अंगावर कुष्ठ उठले होते ज्यामुळे ते फार दुःखी झाले होते.नागरगाव इथे रुद्रनाथ नावाचे सत्पुरुष होते.त्यांच्या दर्शनाने व भीमा इंद्रायणी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने त्यांचे दुखणे बरे झाले.त्या प्रीत्यर्थ मुरार जग्देवानी त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून देवालय बांधले.
शहाजी राजे,मुरार जगदेव,रणदुल्लाखान,व अन्य आदिलशाही सरदारांनी उत्तरेकडून शहाजहान पुत्र शुजा,दस्तुरखुद्द मोगल सेनापती महाबतखान यांच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या मोगली फौजांची परीन्ड्याच्या आजूबाजूस कोंडी करून त्यांची रसद तोडून त्यांना दाती त्रूण धरून शरण येण्यास भाग पाडले.विजयाची आठवण म्हणून मुरार जग्देवानी जगप्रसिद्ध मुलुख मैदान तोफ जिचे वजन ५५ टन होते व अहमदनगर इथे निजामशाहीत ओतली ( बनवली ) गेली होती,विजापूरला नेली.त्यासाठी ४०० बैल,१० हत्ती तसेच शेकडो सैनिकांचा उपयोग करावा लागला.भीमा नदीतून नेताना तिची नावच बुडाली,जी पुन्हा बाहेर काढण्यासाठी अतोनात कष्ट,मेहनत घ्यावी लागली.अखेरीस २९ सप्टेंबर १६३२ रोजी हे प्रचंड धूड विजापुरात पोहचले. ‘ धूळधाण ‘ नावाची अजून एक अवजड तोफ मुरार जग्देवानी मुलुख मैदान तोफेबरोबर विजापूरला नेण्याचे प्रयत्न केले पण तोफ वाहून नेणारा तराफा भीमा नदीत बुडाल्याने धूळधाण तोफेस पण जलसमाधी मिळाली व काढता आली नाही.
आदिलशाहीची प्रदीर्घ सेवा करूनही मुरार जगदेवांचा शेवट मात्र फारच करुणास्पद झाला.विजापूर दरबारात खवासखान म्हणून वजीर होता.त्याचे व आदिलशहाचे काही कारणांवरून संबंध बिघडले.मुरार जगदेव व खवासखान एक विचाराने,एक दिलाने काम करणारी जोडी होती.खवास्खानाने इ.स.१६३५ मध्ये शहाजहान कडे गुप्त रीतीने वकील पाठवून शहाजहान ला मोगली फौजा विजापूरवर धाडण्याचा सल्ला दिला. त्या फौजेस लागणारी मदत आपण करू जेणेकरून विजापूर राज्य मोगलांना जिंकता येयील असा भरोसा पण दिला.खवासखानाच्या हालचाली विजापूरचा सुलतान महमद शहा यास कळल्यावर त्याने प्रथम खवासखानाची हत्त्या केली.( ऑक्टोबर १६३५ ).त्यानंतर एक महिन्याने मुरार जगदेवाना पण कैद करून,त्यांची जीभ छाटून,हात पाय मोडून विजापूर शहरातून धिंड काढून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले.
अशा तऱ्हेने एका कर्तृत्वशाली व्यक्तीचा शोचनीय शेवट झाला.सत्तेच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सेवाकाळात घेतलेल्या भूमिकांमुळे अशा व्यक्तींना प्रसंगी प्राणास हि मुकावे लागल्याची भरपूर उदाहरणे इतिहासात सापडतात.
संदर्भ:
( १ ) मराठी रियासत..गो.स.सरदेसाई,खंड एक.
( २ ) राजा शिवछत्रपती …पूर्वार्ध..लेखक बाबासाहेब पुरंदरे
( ३ ) मराठ्यांचा इतिहास..खंड पहिला.संपादक ग.ह.खरे आणि अ.रा. कुलकर्णी
-प्रकाश लोणकर