महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,04,524

मुरारबाजी देशपांडे

By Discover Maharashtra Views: 4895 5 Min Read

मुरारबाजी देशपांडे –

१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीष दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.

इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेनी दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी १६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला.दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली.

वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला.  मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची! पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते.

१६६५ चा तो एक भयाण दिवस…… १६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता. हा विचार की अविचार? त्याला एक कारणही होतेच. कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते. एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर? नाहितरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल.

मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला.मुरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , ‘ अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! ‘

हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ‘ मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय ?’

सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे –

‘सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय?’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला!’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’

आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला. धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला.बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment