महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,340

मुरुड जंजीरा | Murud Janjira Fort

Views: 4435
17 Min Read

मुरुड जंजीरा | Murud Janjira Fort…

महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी.लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा चालू होतो उत्तर कोकणातील दमण पासून तर संपतो दक्षिण कोकणातील तेरेखोलला. सृष्टि सौंदर्याने नटलेल्या या सागर किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. जंजिरा जलदुर्गावर जाण्यासाठी पुणे मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी चार पाच किलोमीटर अंतरावर आहेत. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी “किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ हा अजिंक्य जलदुर्ग उभा आहे. हामुरुड जंजीरा किल्ला अजिंक्य राहण्याचे एक कारण असे सांगितले जाते की ह्या किल्ल्याची पायाभरणी अतिशय शुभ मुहुर्तावर केली गेली होती.

मुरुड गावातुन आणि राजपुरी गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे. किनाऱ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. राजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या पायथ्यापाशी थांबते. २२ एकर जागेमध्ये बांधलेल्या जंजीऱ्याचे बांधकाम दगड, शिसं आणि चुना वापरून केलेले आहे. याचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य आहे. मुख्य दरवाजावर समुद्राच्या भरतीच्या खुणा पाहिल्या तर पाणी कुठपर्यंत येते हे सहज कळते. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. गडाचा मुख्य दरवाजा पूर्वेला म्हणजे किनाऱ्याच्या दिशेला आहे. समुद्राने नित्यनियमाने धुतलेल्या दगडी पायऱ्यांवरुन आपण आत जातो. मुख्य प्रवेशदारापाशीच पांढऱ्या दगडातील पर्शियन भाषेत एक शिलालेख आहे. तिथेच उजव्या हाताला एका सिंहाने सहा हत्ती धरल्याचे शिल्प कोरले आहे. चार पायात प्रत्येकी एक व शेपटीत आणि तोंडात एकेक धरलेला. बुर्हानखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. जणु बुर्हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, “तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.” डावीकडे एका वाघाचे व सिंहीणीचे शिल्प आहे. दोन दरवाजांच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.

जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणाऱ्या पायऱ्यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत. किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. याला पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५ पीर आहेत. असे म्हणतात की सिद्दीने हा गड जिंकायच्या आधी इथे रामाचे देऊळ होते. या पंचायतनाच्या पुढे काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात. येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाडयाची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला सोळाकोनी गोडपाण्याचा तलाव आहे. हा तलावाचा घेर सुमारे ७० फुट आहे.

संपुर्ण गडाला यातुन पाणीपुरवठा केला जाई. याच्या चार कोपऱ्यात चार हौद आहेत. याशिवाय किल्ल्यावर अजून एक तलाव आहे. बालेकिल्ल्याच्या मागे एक चुनेगच्ची इमारत आहे यालाच सदर असे म्हणतात. तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. त्याच्या शेजारी काही थडगीही दिसतात. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. ह्या व्यतिरिक्त हिंदु देवळांमधील शिल्पांचे भग्नावशेष काही ठिकाणी पसरलेले दिसतात.

नुकतेच पुरातत्व विभागाच्या उत्खननात ह्या किल्ल्यात एक शिवमंदिर सापडले आहे. किल्ल्याला स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत व त्या सर्वांवर तोफा बसविलेल्या असायच्या. प्रत्येक बुरुजाचा घेर ८० फुट असुन ते ३० ते ४५ फुट उंचीचे आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९५ फुटापेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये समुद्राकडे तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. मुख्य प्रवेशादारावरती तीन भव्य तोफा आजही दिसतात. त्यांची नावे कलाल बांगडी, चावरी व लांडा कासिम अशी आहेत. त्यातील कलाल बांगडी तोफ पेशव्यांनी जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी आणली होती. पण त्यांचा प्रयत्न फसला व माघार घेताना ही अवाढव्य तोफ मागे ठेवावी लागली. इतर बुरुजांवर प्रत्येकी दोन ते सात असे मानले तर सगळ्या मिळून दीडशेच्या वर तोफा आहेत.

किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल. संपुर्ण किल्ला नीटपणे पाहण्यास कमीत कमी चार तास लागतात.

आपल्या दराऱ्याने पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखण दुर्गशिल्प आहे यात शंकाच नाही. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे. यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्या नंतरपण सन १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्र होता. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती.

मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण अभेद्य किल्ला आणि रामराव कोळीचा पराक्रम ह्या पुढे मलिकने हात टेकले. त्यामुळे निजामशाहाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला होती. तो अतिशय चतुर होता. चार वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिऱ्याच्या तटाला लागले. पेरीमखानाने व त्याच्या सिद्दी नोकरांनी आपण व्यापारी असुन सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. एतबारराव ह्या किल्लेदाराने मंजुरी देताच पेरीमखानाचे मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पेरीमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी केली.

किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या अंमलाखाली आला (१४९०). निजामशहाने इ.स.१५६७ ते १५७१ या काळात येथे दणकट जलदुर्ग उभारला. निजामशहाने किल्ल्याची जबाबदारी सिद्दी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण ‘जंजिरे मेहरूब’ असे केले. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. सर्वप्रथम १४ ऑगस्ट १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वतः मोहीम आखली. पायदळाने दंडा -राजपुरी वर व जंजिऱ्या वर नौदलाने स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायची असा बेत होता.

जंजिऱ्याचा सिद्दी होता फत्तेखान व त्याच्या हाताखाली संबूल, कासीम व खैर्यत हे सेनानी होते. फत्तेखान स्वतः दंडा-राजपुरीत होता. त्याच्या अमलांतील प्रदेशात इतर सात किल्ले होते. स्वराज्याचे आरमार जंजिऱ्याला उभे ठाकले. जंजिऱ्याचे पूर्ण बळ खर्ची पडत होते. पायदळ एका मागे एक असे फत्तेखानाचे सातही किल्ले काबीज करून दंडा-राजपुरीकडे वळले होते. मराठी आरमारापुढे जंजिऱ्याची कलाल बांगडी तोफ लंगडी पडली. दंडा-राजपुरी काबीज झाल्यामुळे जंजिऱ्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदती साठी पत्र लिहिले, पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजां विरुद्ध पाऊल उचलण्या पेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला.

(जून १६६९) सिद्दीने मोगलांकडे आर्जव केले, त्यानुसार वेढा उठवण्याची आज्ञा महाराजांना झाली. पुरंदरचा वेढा, तह, महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन ह्याला फार वेळ झाला नव्हता. तहात गेलेले किल्ले मिळवून स्वराज्याची घडी नीट बसवेपर्यंत महाराजांना मोगलांचे अंकित असल्याचे नाटक वठवायचे होते. तरीही ती आज्ञा दुर्लक्षीत करून महाराजांनी वेढा अजून बळकट केला. महाराजांनी फत्तेखानाची झालेली कोंडी ओळखली होती, त्यांचा मुक्काम पेण जवळ होता (नोव्हेंबर १६६९). त्यांनी फत्तेखानाला सन्मानाने कळविले की जंजिरा आमच्या स्वाधीन करा त्या बदल्यात आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील बहाल करू. सिद्दी ह्यास कबूल झाला पण इतर सेनानी हे पाहून उसळले. त्यांनी फत्तेखानाला तुरुंगात डांबले व जंजिरा ताब्यात घेतला. सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला व सिद्दी कासिम आणि सिद्दी खैर्यत हे अनुक्रमे जंजिऱ्याचे किल्लेदार व हवालदार बनले.

विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली, त्याने सिद्दीच्या गादीला असलेला ‘वजीर’ हा किताब रद्द करून नवीन ‘याकूतखान’ हा किताब दिला व तिघांनाही मनसब, जहागीरदारी आणि सुरतेहून गलबतांचा काफिला दिला (डिसेंबर १६६९). १६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता. १६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. मुरुड जंजीरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्यावरील किल्ला होता.

मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकांशिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यतने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्यासाठी गेली व समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्यावर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दीकडे गेली.

जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्यावरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत्या तोफखान्याचे काम करत होत्या.

सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्यास गेला होता तो आपल्या आरमारासह परतला व मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला. ऑगस्ट १६७६ मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. लाय पाटील ह्याने ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले.

अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कामगिरी लाय पाटलाने निभावली होती पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. माहाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास “पालखी” असे नाव दिले.

एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये २५०० फुटाचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पळवायचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराजाकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजीराजे खूप क्रोधीत झाले. त्यांनी सिद्दीवर आक्रमण करण्याचे ठरवले. त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिऱ्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले.

किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच. याचवेळी औरंगजेबने हसनअली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसनअली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगडच्या दिशेने येवू लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.

गेली साडेतीनशे वर्ष मुरुड जंजीरा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही मग तो छोटा वा मोठा शत्रु का असेना. तीन कारणांमुळे हा किल्ला खरोखर अभेद्य झाला – खवळता समुद्र, कमालीची भक्कम अशी तटबंदी व तितक्याच चिकाटीचे सिद्दी. ह्या भागात सिद्दीचे राज्य टिकुन राहण्यासाठी हा एकच मुरुड जंजीरा किल्ला कारणीभूत होता असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सिद्दीच्या गोटातील हे कमालीचे शस्त्र होते. मुरुड राजापुरीच्या भागात सिद्दी सहजपणे फिरुन हवे ते करु शकायचा व शत्रुची चाहुल लागताच कासवासारखा जंजिऱ्यामधे लपुन रहायचा. नावीक दलाच्या दृष्टिकोनातुन ह्यापेक्षा उपयुक्त जागा मिळणे अवघड आहे. राजापुर खाडीच्या मुखाशी असलेल्या ह्या किल्ल्यातून दंडा व राजापुरी बंदरातील व्यापारावर लक्ष ठेवता यायचे.त्यामुळेच मराठ्यांनी नुकत्याच घेतलेल्या भागातील व्यापाऱ्यांना ह्याचा जाच होत असे. मराठ्यांनी ह्यावर किमान दहा बारा वेळा हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकही प्रयत्न सफल झाला नाही.

मुरुड जंजीरा च्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते. मात्र आत जाण्याची परवानगी नाही. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला. पण तरीही मुरुड जंजीरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिद्धी मुहंमदखान याच्या कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment