नागदेवी मनसा | आमची ओळख आम्हाला द्या –
भारतीय मूर्तीकलेत अशा अनेक मूर्ती आहेत, की त्यांना पाहताना त्या सजीव असे आहेत की काय ?असाच भास होतो. त्यांचे अलंकार, वस्त्र, केशभूषा, उभारण्याची पद्धत, आयुध यामधील विविधता त्या त्या देवतेचे खास स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करते. बर्याच देवता या ज्ञात असून त्या अज्ञात आहेत. त्यापैकीच नागदेवी मानसा होय. पुराणांमधून उल्लेखित कथांना अनुसरून मूर्ती घडवल्या जात असत. कधीकधी कलाकारांनी मूर्ती घडवताना मुक्त स्वातंत्र्य घेतले असल्याने मूर्तीत अनेक बदल झालेले पहावयास मिळतात. मनसा ही शिवाची मुलगी मानली जाते.
वासुकी ची बहिण देखील मानली जाते.कश्यपाची मुलगी तसेच नाग माता कद्रु यांची ती कन्या आहे असे उल्लेख मिळतात. मनसादेवी संबंधात वेगवेगळ्या कथा आहेत. प्रस्तुत छायाचित्रातील मूर्तीही रुबिन म्युझियम ऑफ आर्ट न्यूयाँर्क या ठिकाणी आहे.
मनसादेवी कमलपुष्पावर सव्य ललितासनात आरूढ असून द्विभुज आहे. उजव्या खालच्या हातात धारण फल केलेले असून डाव्या हाताने तिने नाग पकडलेला आहे. डोक्यावर जटा मुकुट असून त्यावर सप्त फणा काढून नागाने तिच्यावर छत्र धरले आहे. कानात चक्राकार कुंडले, नाकात नथ, गळ्यात ग्रीवा, हार, स्तनसूत्र, स्कंद माला, केयुर, कटकवलय ,कटीसूत्र इत्यादी आभूषणे तिने परिधान केलेली आहेत. कमरेभोवती नेसूचे वस्त्र अत्यंत रेखीव व कलाकुसरयुक्त आहे. खाली मोकळा सोडलेला पाय विसावण्यासाठी कमलपुष्पाचा आधार घेतला आहे.
चेहर्यावरील भाव अतिशय प्रसन्न आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस दोन्हीकडे कमलपुष्पावर विराजमान छोट्या मूर्ती आहेत. उजवीकडे दाढी आणि जटा असणारे ऋषी कष्याप असावेत आणि डावीकडे ज्याच्या डोक्यावर नागछत्र आहे तो वासुकी असावा. मूर्तीतील छत्रधारी नाग अत्यंत कोरीव व सुबक आहे. अशी ही नाग देवता आहे. तिला नाग माता म्हणून देखील ओळखले जाते.
डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक, मोडीलिपी व धम्म लिपी तज्ञ सोलापूर.