नागेशगोपाल | आमची ओळख आम्हाला द्या –
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात वडवळ नावाचे एक लहान गाव आहे. इस तेराव्या चौदाव्या शतकात हेग्रस नावाचा शिवभक्त होऊन गेला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिव या ठिकाणी प्रकट झाला. वडवाळ ही नागेश संप्रदायाची भूमी आहे. या हेग्रसाचे कुलदैवत म्हणजे गोपाळपूरचा श्रीकृष्ण होता. हेग्रस नागेशाची म्हणजे शिवाची सेवा करून रोज गोपाळपूरला पायी चालत जात असत व आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत असत. हे नागेशाच्या लक्षात आल्यानंतर भक्ताचे कष्ट वाचवण्यासाठी नागेशाने गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मूर्ती मंदिरासह उचलून वडवळला आणली ,अशी दंतकथा प्रचलित आहे. येथेच कुलदैवताचे दर्शन घेतजा असेही हेग्रसाला सांगितले. हे मंदिर वडवळ नागनाथ मंदिराच्या मागे आहे .त्या मंदिरातच दुर्मिळ स्वरूपातील श्रीकृष्ण मूर्ती आहे.नागेशगोपाल.
स्थापत्यशास्त्र नुसार हे मंदिर यादवकालीन असावे, सभामंडप व गर्भगृह असे दोनच भाग मंदिरास आहे. गर्भगृहात श्रीकृष्णाची मूर्ती आहे मूर्तीची उंची साधारणतः सहा फूट आहे मूर्ती पूर्णतः बेसॉल्ट खडकाची आहे. श्रीकृष्ण चतुर्भुज असून समोरील दोन्ही हातात बासरी पकडलेली असून, मागील वरच्या डाव्या हातात चक्र वरील उजव्या हातात शंख धारण केलेले आहे. डोक्यावर किरिट मुकुट असून त्यावर नागफणा आहे. या नागाची शेपटि श्रीकृष्णाच्या पाठी मागून डाव्या पायाच्या खालीपर्यंत उतरली आहे. श्रीकृष्ण नेहमीच्या स्थितीत देहुडा अवस्थेत उभा आहे. उजवा पाय दुमडलेला असून अंगठा जमिनीवर टेकवलेला आहे.
मूर्तीच्या गळ्यात रुद्राक्ष, मूर्तीच्या अंगाखांद्यावर रुद्राक्षाच्या माळा आहेत. गळ्यामध्ये हार,ग्रीवा, पायात पादवलय व पादजालक हि आभूषणे आहेत. मूर्तीच्या दंडात केयूरच्या ठिकाणी नागाचे बाजूबंद आहेत. मुक्तद्बाम अतिशय सुबक असून मधोमध वस्त्राचा सोगा अत्यंत खुबीने कोरलेला आहे .या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या चेहऱ्यावर मिश्या आहेत. मूर्तीच्या श्रृंगावर डाव्या बाजूस चंद्र व उजव्या बाजूस सूर्य आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस डोक्यावर घट धारण केलेल्या गोपिका व सवत्स कामधेनु आहेत. पादपिठावर मधोमध गणेशाचे रिद्धी सिद्धीसह शिल्प आहे.
अशा पद्धतीचे शिल्प इतरत्र कोठेही आढळून येत नाही. ही मूर्ती शैव व वैष्णव यांच्या वादातून निर्माण झालेली असावी.वडवळ हि नागेश संप्रदायाची भूमी आहे.शिव हि नागेश सांप्रदायाची आराध्य देवता आहे.वडवळ याठिकाणी नागनाथाचे मंदिर आहे. त्यामुळे त्यावर शैव व वैष्णव प्रतिकांचा सुरेल संगम पहावयास मिळतो. शैव व वैष्णव पंथीयांची संमिश्र लक्षणे असताना या मूर्तीस फक्त श्रीकृष्ण असे न संबोधता नागेशगोपाल म्हटले तर चुकीचे ठरणार नाही कारण या मूर्तीमध्ये शिव व कृष्ण यांची लक्षणे एकत्रितरीत्या असल्याने यास नागेशगोपाल असे म्हटले जावे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर