महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,971

नक्षीची हवेली | भालेराव वाडा, नाशिक

Views: 2586
4 Min Read

नक्षीची हवेली | भालेराव वाडा, नाशिक –

ही गोष्ट आहे इसवी सन १८०० च्या आसपासची.फार मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात. गोरगरिबांना जगणं मुष्किल झालेलं असताना नाशकातील काही धनिकांनी आपल्या घरांची,वाड्यांची कामे काढली. उद्देश एकच..हातांना काम मिळावं हा.पेशव्यांचे उपाध्याय देवराव हिंगणे यांनी दिल्लीकडुन कसबी कारागीर मागवुन लाकडांवरील कोरीव काम करुन घेतले.अनेक उत्तमोत्तम वाड्यांची उभारणी त्या काळात झाली. त्यातलाच एक वाडा म्हणजे भालेराव वाडा अर्थात नक्षीची हवेली.

गोदावरी नदी गावाच्या बाहेर पडते ती मोदकेश्वरा पासुन. तेथुनच नाव दरवाजा सुरु होतो. तर ह्या नाव दरवाज्याच्या मध्यावर उभा आहे हा भालेराव वाडा अर्थात नक्षीची हवेली. हो..नक्षीची हवेलीच.हेच नाव   रुढ आहे ह्या वाड्याचे.आणि ते यथार्थही आहे.

पावसाळ्यात गोदेला पुर येतो..पण कधी तो महापुराचे रुप धारण करतो.कुठपर्यंत पाणी येऊ शकते जास्तीत जास्त?याचा विचार करुनच या हवेलीचे बांधकाम केलेले आहे. रस्त्यापासुन पाच फुट उंचीचे दगडी जोते बांधुन त्यावर या हवेलीचे बांधकाम केले आहे.

दगडी जोत्यावर उभा असलेला हा वाडा.त्याचे पाच खण.तळमजला आणि पहिला मजला. आणि दर्शनी भागावर असलेले अप्रतिम नक्षीकाम. त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. पाच खणांमध्ये असलेले पाच दरवाजे.. आणि वरच्या मजल्यावर असलेल्या पाच खिडक्या. हे या वाड्याचे दर्शनी रुप.या संपूर्ण भागांवर असलेले उठावदार.. कोरीव काम..वेलबुट्टी..सुर्य, चंद्र, कमळ,कलश..मधुन द्रुष्टीस पडणारे मोर,पोपट.. आज इतकी वर्षे झाली.. पण अजूनही त्यात ताजेपणा आहे. प्रमाणबध्दता आहे.

दरवाज्यांच्या आणि खिडक्यांच्या महिरपी तर विलक्षण सुंदर आहेत. पुर्वी ही हवेली दोन मजली होती. म्हणजे तळमजला आणि पहिला मजला. त्यावर कौलांनी शाकारलेलं छत.बबनशेठ भालेराव आणि नारायणशेठ भालेराव हे दोघे बंधु.त्यांच्या व्यवसाय सोनारकाम.एक खानदानी सोनार म्हणून नावलौकिक. तळमजल्यावर असलेले  त्यांचे दुकान अजूनही डोळ्यासमोर आहे.पांढरे शुभ्र धोतर..खादीची कोपरी..त्यांचे ते कामाचे टेबल,ऐरण हातोडा..गिर्हाइकांसाठी पांढरी शुभ्र भारतीय बैठक.. पानाचा डबा,आणि पितळेचा चकचकीत खलबत्ता.. पान कुटण्यासाठी.

(विशेष म्हणजे थोड्याफार फरकाने हे दुकान अजुनही तसेच आहे).

दुकानच्या मागील भागात माजघर.तेथुन वर जाणारा लाकडी जिना. या जिन्याच्या मध्यावर एक लहानशी खिडकी. झरोक्यासारखी.जिन्यातुन कोण चढ उतार करतो ते बघण्यासाठी. त्याकाळी पुरुष मंडळींचा बराच धाक असायचा. वरच्या मजल्यावर एक प्रशस्त बैठकीची खोली. त्याला सर्वजण म्हणायचे..बंगला.

या बंगल्यात मी आयुष्यातला बराच काळ घालवलेला. हा भालेराव वाडा म्हणजे माझ्या आजीचे माहेर.लहानपणापासून तेथे जाणे येणे. माझ्या आजीची एक बहिण होती.बाई म्हणत तिला.अजुनही डोळ्यासमोर दिसतीय मला. सकाळच्या कोवळ्या उन्हात.. खिडकीतून येणाऱ्या उन्हात बसलेली आहे. धुलीकणांनी भरुन गेलेला तो उन्हाचा कवडसा.समोर ठेवलेल्या लाकडी पेटीतल्या आरशात बघुन ती वेणी घालतेय.

१९४०-४२ च्या आसपास स्वातंत्र्य सैनिक श्री वसंतराव नाईक भुमीगत होते. त्यावेळी दोन वर्षे त्यांना आसरा दिला तो याच हवेलीने.

खुप आठवणी आहेत या हवेलीच्या.त्यावेळी लक्षात आले नाही.. पण आता जाणवतंय. गेल्या पन्नास वर्षात काही काही बदल झाला नाही या हवेलीत.नाही म्हणायला दोन मजले चढवलेत यावर,पण ते मुळ रुपाला धक्का न लावता.बर्याच वेळा आपण पहातो.पावसाळ्यात घरांचे दरवाजे फुगतात. व्यवस्थित लागत नाही. पण या हवेलीचे सर्वच.. अगदी खिडक्यांचेही दरवाजे कोणत्याही ऋतुत अगदीच व्यवस्थित लागतात. त्याच्या बिजागर्या,कडी कोंडे सर्वच वेगळ्या घडणीचे आहेत.

सध्या या हवेलीच्या पाच खणांपैकी तीन खण भालेराव कुटुंबाकडे..तर दोन खण पवार कुटुंबाकडे आहेत. भालेराव कुटुंबाने ही हवेली अगदी काटेकोरपणे जपली आहे. अगदी दोनशे वर्षापुर्वी होती तशीच. त्याची देखभाल ठेवणे हे नक्कीच सोपे नाही.या वास्तु जतन करण्यासाठी देखील एक द्रुष्टी असावी लागते. जुन्याच वास्तुंमध्ये..वाड्यांमध्ये एक प्रकारची कलात्मकता होती. हळुहळु गावे बदलत चालली आहे.. शहरीकरण होत आहे. शेकडो वर्षे जुन्या संस्था,जागा, इमारती.. आणि त्यांच्यातली कलात्मकता पाश्चिमात्य देशात जशी जपली जाते, तशी आपल्याकडे. त्या प्रमाणात तरी जपली जात नाही. आणि म्हणुनच भालेराव कुटुंबाने जपलेल्या या हवेलीचे मोल खुप मोठे आहे. आणि याची जाण खर्या अर्थाने आहे ती विदेशी पर्यटकांना.. अभ्यासकांना. नाशिकमध्ये आले की त्यांची पावले नाव दरवाज्याकडे हमखास वळतात.

सुनील शिरवाडकर.

Leave a Comment