नकटीचे देऊळ, कर्जत, अहमदनगर –
अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरापासून साधारण ८० किमी अंतरावर असणारे कर्जत हे एक तालुक्याचे ठिकाण. महाभारत काळात पांडव वनवासात असतांना त्यांचा वध करण्याच्या हेतुने दुर्योधन व कर्ण त्यांच्या मागे आले होते. पांडवांची छावनी पाथर्डीत असतांना, दुर्योधन व कर्णाची छावनी येथे पडली होती. कालांतराने दुर्योधन च्या छावनीच्या जागेला दुरगाव, तर कर्ण छावनीच्या जागेला कर्जत नाव पडले अशी आख्यायिका आहे. गावात ‘नकटीचे देऊळ’ नावाने ओळखले जाणारे पुरातन शिवमंदिर असून, या मंदिराच्या जवळच मल्लिकार्जुन हे आणखी एक पुरातन महादेव मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे गावचे वैभव असून पुरातत्व विभागाने या मंदिरांना राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
नकटीचे देऊळ हे पूर्वाभिमुख असून साधारणतः १३ व्या शतकातील हे मंदिर असावे. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आपल्याला दिसून येते. मंदिर परिसरात काही लहान मंदिराचे भग्न अवशेष विखुरलेले दिसतात. मंदिराच्या मुखमंडपाच्या बाह्य अंगावर अनेक शिल्पे असून त्यात भगवान विष्णूचा नृसिंह अवतार व गणेश शिल्पं आपलं लक्ष वेधून घेतात. या शिवाय अनेक स्त्री शिल्पे, युगल शिल्पे व काम शिल्पे बाह्य अंगावर दिसून येतात. बहुतेक शिल्पांची नैसर्गिक माऱ्यामुळे झीज झाली असली तरी ती आपली सौंदर्य टिकवून आहेत.
सभामंडपाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी सजवलेली आहे. सभामंडपातील स्तंभावर पशु, पक्षी, योद्धे व अनेक स्त्री शिल्पांकने दिसून येतात. तसेच सभामंडपात एक सर्पशिळा व भग्न भारवहक यक्ष शिल्पे विखुरलेली दिसतात. सभामंडपात उत्तर व दक्षिण दिशेला दोन गर्भगृह आहेत, परंतु यात कुठलीही मूर्ती आपल्याला आता दिसून येत नाही. मुख्य गर्भगृहाची द्वारशाखा मात्र अगदी साधी आहे. गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून समोरच भग्न अवस्थेतील शिव पार्वती आलिंगन शिल्पं दिसून येते.
मंदिराच्या उजव्या बाजूला एक वीरगळ असून यात वीराची शत्रू सैन्या सोबत धनुष्य बाणाची लढाई दाखवण्यात आली आहे. डाव्या बाजूला एक मुर्ती शेंदूर लावून उभे करून ठेवलेली आहे. या मूर्तीची स्थानिक महिला आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी पूजा करतात असे परिसरातील लोक सांगतात. मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात असले तरी या ऐतिहासिक वारश्याची योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही. गावातील लोकांनी देखील आपल्या या ऐतिहासिक ठेव्याची काळजी घेणे व तो जपणे गरजेचे आहे.
©️ रोहन गाडेकर