महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,924

नळदुर्ग | Naldurg Fort

By Discover Maharashtra Views: 4971 27 Min Read

नळदुर्ग | Naldurg Fort

महाराष्ट्रात सर्वात मोठा भुईकोट कोणता ? असा प्रश्न जर दुर्गप्रेमीना कुणी विचारला तर क्षणातच आपल्याला उत्तर मिळेल नळदुर्ग (Naldurg Fort). आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर भुईकोट कोणता असा प्रश्न कोणी विचारला तर याचेही उत्तर नळदुर्ग असेच आहे. भक्कम दुहेरी तटबंदी, विविध आकाराचे बुरुज व त्यावरील अनेक तोफा, एकमेवाद्वितीय पाणीमहाल अशा विविध वास्तुनी नटलेला हा किल्ला अलीकडेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दहावीच्या भूगोल या विषयासाठी अभ्यासक्रमात सामील केला आहे.

प्रचंड पसारा असलेला हा किल्ला १०५ एकरवर पसरलेला असुन याची तटबंदी साधारण ६ कि.मी. आहे व या तटबंदीत विविध आकाराचे एकुण ११४ बुरुज आहेत. अशा या सर्वांगसुंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला नळदुर्ग शहर गाठावे लागते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यात असलेला हा दुर्ग मुंबईहुन ४५० कि.मी.अंतरावर तर पुण्यापासुन ३०० कि.मी.अंतरावर आहे. नळदुर्गला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे सोलापुर. सोलापुरहुन ५० कि.मी. अंतरावर असलेल्या नळदुर्गला जाण्यासाठी सोलापुर बस स्थानकातुन बसची चांगली सोय आहे. नळदुर्ग बस स्थानकातुन किल्ल्याचा मुख्य दरवाजा १ कि.मी.वर असून चालत तिथपर्यंत जाण्यासाठी १० मिनीटे पुरेशी होतात. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यांनी युनिटी मल्टीकॉन्स प्रायवेट लि. या खाजगी आस्थापनाच्या माध्यमातुन बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर या किल्ल्याचा अतिशय सुंदर असा कायापालट केलेला आहे. इच्छाशक्ती असेल तर किल्ल्याचे कशाप्रकारे संवर्धन करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नळदुर्ग किल्ला.

किल्ला पहाण्याची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असुन किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ६ ते १२ वयोगटातील मुलांना १० रुपये तर प्रौढांसाठी २० रुपये प्रवेशशुल्क आहे. संपुर्ण किल्ल्याचे केलेले संवर्धन पहाता हे प्रवेशशुल्क नगण्यच म्हणावे लागेल नाही तरी काही ठिकाणी जुजबी काम करून पुरातत्वखाते अनाठायी २० रुपये प्रवेश शुल्क आकारते. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी सर्वप्रथम आपण किल्ल्याची रचना समजुन घेऊ. नळदुर्ग हा एक किल्ला नसुन रणमंडळ व नळदुर्ग हे दोन वेगवेगळ्या उंचवट्यावर वसलेले जोडकिल्ले आहेत. या दोन्ही किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग असुन हे दोन्ही किल्ले त्यामधील बंधाऱ्यावरील पुलाने एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही मार्गाने प्रवेश केला तर दोन्ही किल्ल्यावर जाता येते. यातील रणमंडळ किल्ल्याचा बाहेरील दरवाजा सध्या बंद केला असल्याने नळदुर्ग किल्ल्याच्या बंधाऱ्या वरूनच या किल्ल्यात जाता येते. रणमंडळ किल्ल्याचा परीसर २४ एकरवर पसरलेला असुन याच्या सव्वा कि.मी. तटबंदीत एकुण २२ बुरुज आहेत. तर नळदुर्ग किल्ल्याचा परीसर ८० एकरवर पसरलेला असुन याच्या ४ कि.मी.तटबंदीत एकुण ८६ बुरुज आहेत. याशिवाय नळदुर्ग किल्ल्याच्या अंतर्गत भागात सर्वात उंच असा उपळा बुरुज आहे. या दोन्ही किल्ल्याच्या रक्षणासाठी त्यांच्याभोवती खंदक खोदुन किल्ल्यापासुन काही अंतरावर वहाणाऱ्या बोरी नदीचे पाणी या खंदकात सोडले आहे त्यामुळे या खंदकात वर्षभर पाणी साठते.

दुर्गनिर्माता इतकेच करून थांबला नाही तर त्याने नदीपात्र फिरवुन या दोन्ही किल्ल्यांच्या मध्यात आणुन त्यावर बंधारा बांधुन नदीचाच खंदक म्हणुन वापर केलेला आहे. या नदीपात्रामुळे केवळ संरक्षण लाभले नाही तर दोन्ही किल्यातील पाण्याची गरज देखील पुर्ण झाली आहे. नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजांमध्ये विविधता असुन यात आपल्याला गोलाकार, अर्धगोलाकार, चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी इतकेच नव्हे तर ९ अर्धगोलाकार बुरुजात गुंफलेला कमळाच्या आकाराचा बुरुज देखील पहायला मिळतो. नळदुर्ग बस स्थानकातुन आपण किल्ल्याच्या दरवाजासमोर असलेल्या खंदकाजवळ पोहोचतो व समोरच अवाढव्य पसरलेली किल्ल्याची दुहेरी तटबंदी नजरेस पडते. दरवाजासमोर असलेल्या खंदकाची रुंदी साधारण ४० फुट असुन कधीकाळी या खंदकावर काढता-घालता येणारा लाकडी पुल असावा कारण दरवाजाच्या विरुद्ध असलेल्या खंदकाच्या भागात बांधकामाचे अवशेष व ओवऱ्या पहायला मिळतात.

सध्या या खंदकात मातीचा भराव टाकुन येण्याजाण्याचा मार्ग तसेच वहानतळ बनवलेला आहे. इतर भागात या खंदकाची रुंदी ७० ते १५० फुट असुन खोली साधारण ३०-४० फुट आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन मुळात हा एक दरवाजा नसुन तीन दरवाजांची साखळी गुंफलेली आहे. दोन बुरुजांच्या अरुंद बोळीत बांधलेल्या कमानीतुन किल्ल्यात प्रवेश केल्यावर अरुंद तटबंदीच्या बोळात बांधलेला दुसरा दरवाजा पार करून आपण मुख्य किल्ला व बाहेरील तटबंदी यामध्ये असलेल्या परकोटात प्रवेश करतो. सुरवातीच्या दोन दरवाजाचे बांधकाम पहाता हे दरवाजे किल्ल्याच्या मुळ बांधकामातील नसुन नंतर बांधलेले असावेत.दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन डावीकडे परकोटाच्या तटबंदीत एका ओळीत सात ओवऱ्या बांधलेल्या आहेत. परकोटाच्या दोन्ही बाजुस भिंत घालुन त्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे पण येथील जिन्याने तटावर चढुन हा परकोट व दरवाजातील अरुंद प्रवेशमार्ग पहाता येतो. येथुन इंग्रजी U अक्षराचे वळण घेऊन आपण किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख असलेल्या मुख्य दरवाजासमोर पोहोचतो. या दरवाजाबाहेर समोरील बुरुजात दोन ओवऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन डावीकडील बुरुजात मुख्य दरवाजा बंद असताना आत प्रवेश करण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असून त्यावर गोलाकार माथ्याचे मोठमोठे लोखंडी खिळे ठोकलेले आहे.

तीन दरवाजांचा हा मार्ग हलमुख दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस असलेल्या चौथऱ्यावर पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातुन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दोन्ही बाजुस कट्टयावर १२ फुट लांबीच्या दोन तोफा मांडून ठेवल्या आहेत. येथे डावीकडील तटबंदीत दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाने तटावर जाऊन सर्वप्रथम किल्ल्याची दरवाजाच्या बाजुने असलेली दुहेरी तटबंदी व प्रवेशमार्ग पाहुन घ्यावा. तटावरून खाली आल्यावर डावीकडे आयताकार आकाराची तीन कमानीवर तोललेली मशीद पहायला मिळते. या मशिदीची काही प्रमाणात पडझड झालेली आहे. दरवाजासमोरच काही अंतरावर हत्तीशिल्प ठेवलेली एक मोठी वास्तु पहायला मिळते. येथे असलेल्या या हत्ती शिल्पामुळे या वास्तुला हत्तीखाना म्हटले जाते पण हा गडाचा अंबरखाना आहे. आपण प्रवेश केलेले किल्ल्याचे दरवाजे पहाता या दरवाजातुन हत्ती आत येणे शक्य नाही.

कदाचीत हत्तीखाना असलेली हि इमारत नंतरच्या काळात अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार म्हणुन वापरली गेली असावी. आयताकृती आकाराच्या या वास्तुवर एका बाजुस गोलाकार घुमट असुन समोरील तीन मोठया कमानी बंद करून त्यात लहान दरवाजे बांधलेले आहेत. या वास्तुच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. अंबरखाना पाहुन सरळ वाटेने गेल्यावर डावीकडे मुन्सिफ कोर्ट नावाची इमारत आहे. चौसोपी आकाराच्या या इमारतीत मध्यभागी असलेल्या चौकात १२ फुट लांबीची पंचधातूची लांब तोफ ठेवलेली आहे. निजामाच्या काळात या इमारतीत तहसील कार्यालय तसेच न्यायालय असल्याने काही तुरुंग कोठड्या आहेत. या इमारतीवर PRISONERS शब्द म्हणजेच तुरुंग असा निजामकाळात कोरलेला दगड आहे. रस्त्याच्या डाव्या बाजुस सफेद रंगाने रंगवलेली जामा मशीद आहे. बंदिस्त प्राकारात असलेली हि मशीद ४० x ३० फुट आकाराच्या एका चौथऱ्यावर उभारलेली असून आतील भिंतीवर चुन्याच्या गिलाव्यात मोठया प्रमाणात कोरीव काम केलेले आहे.

मशिदीच्या दर्शनी भागात तीन व आतील भागात तीन अशा सहा कमानी असुन छतावर चार टोकास चार मिनार व मध्यभागी घुमट आहे. मशिदीच्या आवारात काही थडगी असुन प्राकाराच्या दरवाजावर उर्दूतील शिलालेख आहे. मशीदीच्या मागील बाजुस पुर्वीची दफनभूमी असुन त्याशेजारी दोन वाड्यांचे अवशेष व १०-१२ घरांची किल्ल्यातील वस्ती आहे. मशिदीच्या भिंतीला लागुन किल्ल्याच्या तटबंदीकडे जाणारी वाट असुन येथील बुरुजात नदीपात्रात जाण्यासाठी एकामागे एक दोन दरवाजे बांधलेले आहेत. येथे आता नौकाविहाराची सोय केलेली असुन या तटबंदीबाहेर असलेले एकुण बांधकाम व नदीपात्रातील दगडी धक्का पहाता येथे पुर्वीपासुन नौकाविहाराची सोय असावी. हा दरवाजा पाहुन पुन्हा मशिदीकडे यावे. मशीदीसमोर रस्त्याच्या डाव्या बाजुस तटबंदीला लागुन बारादरी नावाची इमारत असुन किल्ल्याची दुरुस्ती करताना या इमारतीचे चांगल्या प्रकारे संवर्धन केलेले आहे. बारादरीच्या आवारात २१ फुटांची लांबलचक तोफ ठेवलेली आहे. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज नळदुर्ग भागावर अधिकारी असताना याच इमारतीत वास्तव्यास होता. बारादरीला नदीच्या दिशेने असलेल्या तटबंदीत दरवाजा असून या दरवाजाबाहेर व्हरांडा बांधलेला आहे.

बारादरीच्या छतावरून बोरी नदी पात्राचे तसेच त्यावरील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. बारादरीच्या पुढील भागात तटाला लागुनच रंगमहाल नावाची दुसरी वास्तु आहे. चारही बाजुने बंदिस्त असलेल्या या वास्तुत जाण्यासाठी एक मुख्य प्रवेश नदीच्या बाजुने असुन बारादरीच्या दिशेला लहान दरवाजा आहे. एका चौथऱ्यावर बांधलेल्या या वास्तुच्या दर्शनी भागात ५ कमानी असुन हि वास्तु एखादया रंगमंचासारखी आहे. या वास्तुच्या छतावर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. या महालात दुसरा इब्राहिम आदिलशहा याचा गोवळकोंड्याच्या राजकन्येशी शाही लग्नसमारंभ पार पडला होता. जामा मशीदीच्या पुढे रस्त्याच्या उजव्या बाजुस उध्वस्त झालेला किल्लेदाराचा वाडा असुन त्याच्या दरवाजाच्या कमान आजही शिल्लक आहे पण त्यावर वाढलेल्या झुडूपांमुळे आत शिरता येत नाही. रस्त्याने सरळ पुढे निघाल्यावर किल्ल्याचा निमुळता भाग सुरु होतो. येथे उजव्या बाजुस मोठया प्रमाणात घरांचे अवशेष पहायला मिळतात. वाटेने पुढे जाताना दोन्ही बाजुस किल्ल्याची भक्कम तटबंदी असुन डाव्या बाजुस बोरी नदीचे पात्र तर उजव्या बाजुस खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकात पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी दगडी भिंत बांधलेली असून हि भिंत मछली तट म्हणुन ओळखली जाते.

डावीकडे नदीपात्राच्या दिशेने असलेल्या तटबंदीत फारसे बुरुज नसुन उजवीकडील खंदकाच्या बाजुस एकामागे एक भक्कम बुरुज बांधलेले आहेत. पुढे गेल्यावर डाव्या बाजुस तटबंदीच्या बुरुजात बांधलेला व बोरी नदीच्या दिशेने उतरत जाणारा भक्कम दरवाजा नजरेस पडतो. या दरवाजाच्या उजव्या बाजुस ३ तर डावीकडे १ अशा ४ देवड्या बांधल्या आहेत. दरवाजाच्य या बुरुजावरून नदीच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या रणमंडळ किल्ल्याचे तसेच नळदुर्ग व रणमंडळ यामधील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. दरवाजा बाहेरील भागात दुहेरी तटबंदी बांधलेली असुन बाहेरील तटात बांधलेला दुसरा दरवाजा आपल्याला नदी पात्रात नेतो तर उजवीकडील वाट या दुहेरी तटबंदीच्या आतील परकोटातुन या बंधाऱ्यावर जाते. परकोटाच्या या तटबंदीत जागोजागी देवड्या बांधलेल्या असुन पुढे तटावरच विश्रातीसाठी कक्ष बांधलेला आहे. या विश्रांतीगृहाच्या भिंतीत कबुतरांसाठी खुराडे बांधलेले आहे. येथुन पुढे आल्यावर परकोटाच्या तटबंदीत असलेला लहान कमानवजा दरवाजा पार करून आपण बंधाऱ्याच्या भिंतीवर पोहोचतो. नळदुर्ग आणि रणमंडळ हे दोन्ही किल्ले या बंधाऱ्याने एकमेकांशी जोडलेले आहेत.

नळदुर्ग किल्ल्यावरील सर्वात मोठे आकर्षण असलेला हा बंधारा म्हणजे केवळ बंधारा नसुन या बंधाऱ्याच्या आत एक जलमहाल दडलेला आहे. त्यासाठी बोरी नदीचे पात्र कायम ठेवून तिच्या प्रवाहाचा काही भाग किल्ल्याला संरक्षणासाठी वळवुन नदीचा खंदक निर्माण केला गेला व त्या खंदकात बंधारा बांधुन त्याचा पाणीसाठा, पुल व जलमहाल असा वेगवेगळ्या गरजांसाठी वापर केला गेला. महालाचे सौंदर्य वाढवण्यासाठी या बंधाऱ्यावर नर व मादी हे दोन कृत्रिम धबधबे तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रवाहाचे दरवाजे वेगवेगळ्या स्तरावर अशा रीतीने बांधले आहेत कि यातील मादी धबधबा प्रथम सुरू होऊन याचे पाणी सरळ रेषेत पडल्याने हिरवेगार दिसते तर नर धबधबा उशीरा सुरु होऊन याचे पाणी खळखळत पडल्याने पांढरे शुभ्र दिसते. बंधाऱ्याच्या भिंतीचा कल्पकतेने वापर करून इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात मीर इमादीन या स्थापत्यकाराने हिजरी १०२२ म्हणजे इ.स.१६१३ मध्ये हा बंधारा व त्यातील जलमहाल बांधला. जलमहालात कोरलेल्या संगमरवरी पर्शियन शिलालेखात जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल अशा आशयाचा मजकुर कोरलेला आहे.

बेसाल्ट दगडात बांधलेला हा बंधारा व महाल ५५० फुट लांब ४० फुट रुंद तर ६० फुट उंच आहे. या बंधाऱ्यातील जलमहालात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन आत प्रकाश यावा यासाठी वरील बाजुस दोन चौकोनी झरोके बांधलेले आहेत. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर आपण या जलमहालात पोहोचतो. या जलमहालात दोन दालने असून यातील एका दालनात पाण्याच्या दाबावर चालणाऱ्या पाणचक्की आहे तर दुसऱ्या दालनात कारंजे आहेत. पाणचक्कीची जाती सध्या जागेवर नाहीत. बंधाऱ्याची वरील बाजू नीट पाहिल्यास या दोन्ही ठिकाणी पाणी उतरण्यासाठी केलेल्या जागा पहायला मिळतात. कारंज्यासाठी असलेला पाणीमार्ग कमानीदार व लहान आहे तर चक्कीचा पाणीमार्ग चौकोनी व काहीसा मोठा आहे. दोन्ही दालनात बैठकीसाठी ओटे बांधलेले असुन दालनाच्या डाव्या बाजुस टोकावर स्नानगृह व शौचालय आहे. या संपुर्ण महालात मोठया प्रमाणात नक्षीकाम केलेले आहे. महालाच्या एका बाजुस पाणी अडवलेली भिंत असुन दुसऱ्या बाजुस नऊ कमानींचा नक्षीदार सज्जा आहे. पावसाळ्यात बंधारा भरून वहायला लागल्यावर नर-मादी धबधब्यातुन कोसळणारे पाणी या सज्जातून पहाणे हा अवर्णनीय अनुभव आहे.

चारशे वर्षापुर्वी बांधलेल्या या महालात आजही कोठेही पाण्याचा स्पर्श होत नाही. हे धरण व जलमहाल त्याकाळातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जलमहाल पाहुन आपण बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजुस येतो. बंधाऱ्याचे दुसरे टोक म्हणजे रणमंडळ उर्फ रामदुर्ग किल्ला. बंधाऱ्याच्या या टोकावरून देखील बंधाऱ्याच्या आतील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बंधाऱ्याच्या या भागात देखील आत तळात काही दालने आहेत. येथे एका पट्टीवर गणेशाची मुर्ती कोरलेली असून या पट्टीमुळे या भागाला गणेशमहाल नाव आहे. हा भाग बहुदा बंधाऱ्याच्या अथवा किल्ल्याच्या संरक्षणाशी संबंधित असावा. या ठिकाणी ८ फुट उंच ५ फुट रुंद व १.५ फुट जाडीचा लाकडी दरवाजा असुन दगडी खाचातुन हा दरवाजा खालीवर करण्याची सोय केली आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी, तसेच प्रसंगी बंधारा रिकामा करण्यासाठी या लाकडी दरवाजाची रचना करण्यात आली आहे. बंधाऱ्याचा हा भाग पाहुन आपण रणमंडळ किल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो.

त्रिकोणी आकाराच्या रणमंडळ किल्ल्याचा परीसर २४ एकरवर पसरलेला असुन याच्या सव्वा कि.मी. तटबंदीत एकुण २२ बुरुज आहेत. बंधाऱ्याच्या दिशेने असलेली थोडीशी १०-१२ फुटाची तटबंदी वगळता संपुर्ण तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा संपुर्ण किल्ला बोरी नदीच्या पात्राने वेढलेला असुन याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या उत्तर दिशेला आहे. बंधाऱ्याच्या दिशेने असलेल्या तटबंदीतील दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या दरवाजावर पुर्णपणे झीज झालेला शिलालेख आहे. हा दरवाजा थेट किल्ल्याच्या तटबंदीत दरवाजा बांधला असुन या दरवाजाच्या उजव्या बाजुस असलेल्या तटबंदीला लागुन बंधाऱ्याच्या दिशेने थोडी तटबंदी बांधली आहे. या तटबंदीच्या टोकाला गोलाकार बुरुज बांधलेला असुन मध्यभागी कमानीदार दरवाजा व त्याशेजारी दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. हा दरवाजा फाशी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर सर्वत्र मोठया प्रमाणात गवत वाढलेले दिसुन येते. मध्यंतरीच्या काळात या किल्ल्यात शेती केली जात असल्याने आतील सर्व अवशेष भुईसपाट झालेले आहेत. किल्ल्यात कोणतेही अवशेष नसल्याने मळलेल्या पायवाटेने आपण किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेल्या दरवाजाकडे निघावे.जाताना वाटेत तटबंदीला लागुन असलेल्या कोठाराचे अवशेष पहायला मिळतात. रणमंडळ किल्ल्याच्या उत्तर दरवाजाचा आतील भाग हा नळदुर्ग किल्ल्याच्या आतील भागापेक्षा सुंदर आहे.

किल्ल्याच्या या दरवाजाच्या भागात दुहेरी तटबंदी बांधलेली असुन एकामागे एक तीन दरवाजे बांधले आहेत पण हे तीनही दरवाजे आकाराने लहान आहेत. मुख्य दरवाजाबाहेर बोरी नदीचें पात्र असून या नदीपात्रात भिंत बांधुन हे पाणी नळदुर्ग व रणमंडळ किल्ल्यामधील खंदकात वळवलेले आहे. भर पावसात पाणी या भिंतीवरून खाली वाहते. रणमंडळ किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला या भिंतीवरून यावे लागते. किल्ल्याचा हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असून किल्ल्यात आपला प्रवेश जरी उत्तरेकडून होत असला तरी आतील दरवाजा पुर्वाभिमुख आहे. या दरवाजाच्या पट्टीवर एक शिल्प कोरलेले आहे. या दरवाजातुन आत आल्यावर समोर काटकोनात असलेल्या उंच तटबंदी समोर गोलाकार बांधलेली लहान तटबंदी दिसते. मुख्य तटबंदीत बांधलेला दरवाजा लपवण्यासाठी हि तटबंदी बांधली असून या तटबंदीत दुसरा लहान दरवाजा बांधलेला आहे. या दरवाजाने आत आल्यावर आपण मुख्य तटबंदीत असलेल्या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजासमोर येतो व हा दरवाजा पार करून किल्ल्यात प्रवेश करतो. या दरवाजाच्या आतील कमानीवर दोन्ही बाजुस व्याल कोरलेले असुन यातील एका व्यालाने पंजात हत्ती पकडलेला असुन दुसऱ्या व्यालाने गंडभेरुंड पकडलेला आहे.

दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीला लागुन उंच चौथरा असुन त्यावर मोठया प्रमाणात ओवऱ्या आहेत. हा चौथरा व ओवऱ्या यावर कोरीवकाम केलेले आहे. एका ओवरीच्या कमानीवर पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. या ओवऱ्याच्या छताच्या टोकास छपराला आडवे खांब टाकण्यासाठी नक्षीदार दगडी हस्त असुन टोकाला दोन अखंड दगडी हत्ती व मध्ये एका ठिकाणी अखंड दगडी व्याल आहे. (कोरलेले चित्र नाही तर अखंड मुर्ती ) रणमंडळ दरवाजाचा हा भाग आवर्जुन पहायला हवा. याशिवाय रणमंडळ किल्ल्याची बोरी नदीच्या खंदकाच्या दिशेने असलेली तटबंदी नदीपात्रापर्यंत बांधत नेली असुन याच्या टोकाला खंदकाच्या पाण्यात एक बुरुज बांधलेला आहे. या बुरुजाकडील तटबंदीत किल्ल्याचा दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्यात इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.

रणमंडळ किल्ला पाहुन झाल्यावर आपण नळदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीतुन बाहेर पडलो त्या दरवाजासमोर असलेल्या उंच बुरुजाकडे जावे. उपळी बुरुज नावाने ओळखला जाणारा हा टेहळणी बुरुज दोन तटबंदीच्या मध्यावर असुन या बुरुजाची उंची १५० फुट आहे. बुरुजावर जाण्यासाठी चार मोठमोठया कमानीवर ७७ पायऱ्या बांधलेल्या असुन यातील चौथी कमान बंदिस्त करून त्याचे उंच दालन केलेले आहे. या बुरुजावर एकुण तीन तोफा मांडण्याची रचना असुन आज या बुरुजावर केवळ दोन तोफा पहायला मिळतात. यातील एक तोफ २१ फुट लांब तर दुसरी तोफ १८ फुट लांब असुन या तोफेवर पशुचे मुख कोरलेले आहे. किल्ल्यावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन केवळ नळदुर्ग व रणमंडळ किल्लाच नव्हे तर दुरदुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या बुरुजाच्या तळघरात जाण्यासाठी माथ्यावर लहान दरवाजा असुन यातील पायऱ्यांनी आत शिरल्यावर छोटासा हवामहल पाहायला मिळतो. याच्या भिंतीत व छतावर चुन्यामध्ये मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. बुरुजावरून खाली उतरल्यावर बुरुजाच्या मागील भागात पायऱ्या असलेला एक मोठा हौद तर उजव्या बाजुस दारुकोठाराच्या दोन इमारती पहायला मिळतात. दारुकोठारात प्रवेश करण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. या इमारतीत वेगवेगळे भाग पाडलेले असुन दारूकोठाराभोवती कुंपणाची दगडी भिंत बांधलेली आहे.

हौदाकडून तटबंदीच्या दिशेने सरळ पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेल्या तटबंदीतील हत्ती दरवाजाकडे पोहोचतो. हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस चौथऱ्यावर बांधलेल्या कमानीदार देवड्या आहेत. दरवाजाच्या आसपास असलेल्या तटबंदीत काही ओवऱ्या बांधल्या असुन या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढल्याने त्यातुन सापांचा वावर आहे. त्यामुळे गडाचा हा भाग नीटपणे फिरता येत नाही. हत्ती दरवाजा पाहुन मागे फिरावे व सरळ वाटेने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने किल्ल्याच्या निमुळत्या भागात आल्यावर डावीकडे गोलाकार आकाराचा एक बुरुज दिसतो. तुर्ऱ्या बुरुज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या बुरुजाला ओळखण्याची खुण म्हणजे या बुरुजाच्या बाहेरील बाजुस असलेल्या खंदकात पाणी अडविण्यासाठी खंदकात भिंत घातलेली आहे. या बुरुजातुन खाली खंदकात असलेल्या मछली तटाकडे जाण्यासाठी वाट काढलेली आहे. हा बुरुज पाहुन पुढे गेल्यावर आपण रंगमहालाकडे पाहिलेल्या घरांच्या अवशेषांजवळ जवळ येतो. या अवशेषांपाठी असलेल्या बुरुजावर १२ फुट लांबीची तोफ पहायला मिळते. येथे आपण मशिदीकडून आलो ती वाट उजवीकडे दिसते पण तेथे न जाता सरळ वाटेने पुढे निघावे.

पुढे आल्यावर रस्त्याच्या डावीकडे नर्तकी महाल किंवा राणी महाल म्हणुन ओळखली जाणारी वास्तु दिसते. या इमारतीत अनेक दालने असुन त्यात मोठया प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. या वास्तुच्या आवारात कारंजे बांधलेले असुन वास्तुची एकंदरीत रचना पाहुन हि वास्तु शाही निवासासाठी असावी. येथुन पुढे गेल्यावर उजवीकडे आपण येताना पाहिलेल्या किल्लेदाराच्या उध्वस्त वाड्याच्या दरवाजाची मुख्य कमान दिसते तर डावीकडे पडझड झालेला हमामखाना पहायला मिळतो. या इमारतीची बाहेरून पडझड झाली असली तरी आतील बाजुस पाण्याचे हौद,वास्तुतील कोनाडे व त्यावरील नक्षीकाम आजही शिल्लक आहे. हा हमामखाना येथे असलेल्या इमारतीच्या अंतर्भागात असावा. येथुन पुढे गेल्यावर डावीकडे दगडी भिंतीच्या आत आयताकृती आकाराची दोन थडगी पहायला मिळतात. यातील उत्तरेकडील थडगे हे कर्नल मिडोज टेलर यांचे आहे. वाटेच्या पुढील भागात डावीकडे दोन घुमट असलेला मोठा हमामखाना पहायला मिळतो. हा हमामखाना कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत भागात बांधलेला नसुन पुर्णपणे वेगळा बांधलेला आहे. वाटेच्या उजव्या बाजुस जमिनीच्या उतारावर खोलगट भागात एका बाजुने आडवी भिंत बांधुन पाणी अडविलेला मोठा तलाव आहे. हा तलाव हत्ती तलाव म्हणुन ओळखला जातो.

वाटेच्या डाव्या बाजुस असलेला किल्ल्याच्या टोकावरील बुरुज आण्णाराव बुरुज म्हणुन ओळखला जातो. वाटेच्या समोरच किल्ल्याचे दुसरे मुख्य आकर्षण असलेला नवबुरुज अथवा नऊ पाकळ्यांचा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. दोन गोलाकार बुरुजामध्ये असलेला हा दुमजली बुरुज दुहेरी तटबंदीने बंदिस्त केलेला असुन याच्या बाहेरील बाजुस कमळाच्या पाकळीसारखे नऊ गोलाकार कंगोरे आहेत. या बुरुजाचा आकार आतुन फारसा जाणवत नसल्याने या बुरुजाचे खरे सौंदर्य किल्ल्याबाहेरूनच पहायला मिळते. अशी भव्य रचना कोणत्याही किल्ल्यावर पहायला मिळत नाही. पाकळी बुरुजाच्या पुढील बुरुजात किल्ल्याबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. वाटेने पुढे जाताना तटबंदीत काही कमानीदार कोठारे व दालने पहायला मिळतात. किल्ल्याच्या या टोकावर आल्यावर बाहेरील बाजुने दुहेरी तटबंदीची सुरवात होते. या टोकावर आतील तटबंदीत असलेला बुरुज फतेह बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर झेंडा फडकविण्याची सोय केलेली असुन बुरुजाच्या मध्यभागी झेंड्याची काठी रोवण्यासाठी मोठा दगडी खळगा आहे. या बुरुजाखाली असलेल्या परकोटाच्या संपुर्ण तटबंदीत सलग बांधलेल्या देवड्या पहायला मिळतात.

बुरुजापासुन पुढे काही अंतरावर तटबंदीत बाहेरील परकोटात उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथुन सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्यावर प्रवेश केलेल्या मुख्य दरवाजाजवळ येतो. येथे अंबरखान्याजवळील मशिदीसमोरून एक रस्ता सरळ जाताना दिसतो. या वाटेने गेले असता वाटेच्या उजव्या बाजुस चौकोनी आकाराची दगडी बांधकामातील दर्ग्याची इमारत दिसते. या दर्ग्यात एक थडग्याचा चौथरा आहे. या दर्ग्याच्या आसपास काही वाड्यांचे अवशेष आहेत. वाटेने सरळ पुढे गेल्यावर उजव्या बाजुस चौकोनी आकाराची पाण्याची विहिर आहे. या विहिरीशेजारी उंच बांधकाम असुन विहीरीतील पाणी उंचावर खेचुन तेथील टाक्यातुन ते खापरी नळाने आसपासच्या वास्तुना पुरवलेले आहे. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या उत्तर टोकावर असलेल्या परांडा बुरुजावर घेऊन जाते. या बुरुजावर पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या असुन मध्यभागी तोफ फिरवण्याचा गज रोवलेला आहे. या बुरुजावरून संपुर्ण रणमंडळ किल्ला,त्याचा नदीच्या दिशेने असलेला लहान दरवाजा तसेच दोन्ही किल्ल्यामधील पाण्याने भरलेला खंदक नजरेस पडतो. तटावरून पाण्याने भरलेल्या या खंदकाच्या दिशेने गेले असता तटातुन बाहेर पडण्यासाठी एक लहान दरवाजा दिसतो. येथे तटाशेजारी पाण्याचे चार हौद बांधलेले असुन एका हौदाचे आत १० टाक्या बांधल्या आहेत.

तटाच्या पुढील भागात खंदकात उतरण्यासाठी दरवाजा बांधलेला असुन येथे तटाबाहेर नदीच्या पाण्यात एक इमारत बांधलेली आहे पण तेथे जाता येत नाही. किल्ल्याच्या उत्तर दिशेस असलेल्या तटबंदीत संग्राम बुरुज असल्याचे वाचनात येते पण त्याची नेमकी स्थाननिश्चिती होत नाही. याशिवाय किल्ल्यावर फिरताना इतरही अनेक पडक्या वास्तु व वाडयाचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. वेळ असल्यास रिक्षाने तटबंदी बाहेरून पाकळी बुरुज जरूर पाहुन घ्यावा. संपुर्ण नळदुर्ग किल्ला आणि रणमंडळ किल्ला पहाण्यास एक पुर्ण दिवस लागतो. किल्ल्यात फिरताना पिण्याच्या पाण्याची तसेच चहा नाष्ट्याची चांगली सोय आहे. रहाण्यासाठी नळदुर्ग गावात विश्रामगृहे आहेत. आज आपण पहातो त्या नळदुर्ग किल्ल्याची बांधणी आदिलशाही काळात झालेली आहे. स्थानीक लोककथांमधुन नळदुर्ग किल्ल्याचा संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळराजाने हा किल्ला बांधल्याने त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग नाव पडल्याचे सांगितले जाते. हे कितपत खरे आहे हे माहित नसले तरी या किल्ल्याच्या नावावरून या भागास नळदुर्ग नाव पडले हे मात्र सत्य आहे. या दुर्गाची पहिली नोंद इ.स. ५६७ मध्ये कल्याणीचा चालुक्य राजा कीर्तीवर्मन याच्या काळात येते.

लोककथांच्या आधारावर तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथात नळदुर्ग किल्ला नळराजाने आपल्या मुलासाठी बांधल्याचा उल्लेख येतो. इ.स. १३५१ ते इ.स. १४८० दरम्यान बहामनी सत्ताकाळात केव्हातरी यास दगडी तटबंदी बांधण्यात आली. बहमनी राज्याच्या विघटनानंतर इ.स.१४८२ मध्ये नळदुर्ग विजापुरच्या आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स.१५५८ मध्ये विजापुरच्या आदिलशहाने या किल्ल्यास भेट दिल्याची नोंद आढळते. आज आपल्याला दिसतो हा किल्ला अबुल मुझफ्फर अली आदिलशहाच्या काळात ख्वाजा नियमतुल्लाह याच्या देखरेखीखाली हिजरी ९६८ म्हणजे इ.स.१५६० साली बांधलेला असुन त्याचे नाव शहादुर्ग ठेवण्यात आले पण ते फारसे रुळले नाही. यानंतर इब्राहीम आदिलशहा दुसरा याच्या काळात इ.स. १६१३ मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधुन पाणीमहाल बांधण्यात आला. इ.स.१६८६ साली औरंगजेबाने आदिलशाही नष्ट केल्यावर नळदुर्ग किल्ला मुघल साम्राज्याचा भाग बनला. इ.स. १७२४ मध्ये निजामाने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केल्यावर नळदुर्ग निजामाच्या ताब्यात आला व किल्ल्याचे महत्व वाढले.

२ जानेवारी १७५८ रोजी नानासाहेब पेशव्यांच्या काळात विश्वासराव, सदाशिवभाऊ, दत्ताजी शिंदे आदींनी नळदुर्ग जिंकुन मराठा राज्याला जोडला पण लवकरच मराठे उत्तरेला पानीपतच्या राजकारणात गुंतल्याचे पाहुन निजामाने तो पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१८५३ मध्ये निजामाने ईस्ट इंडिया कंपनीच्या तैनाती फौजेसाठी झालेले ६४ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वऱ्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना दिले. १८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे मुख्य ठिकाण होते. इ.स. १८५३-५७ या कालावधीत कर्नल मेडोज टेलर येथे अधिकारी असताना नळदुर्ग किल्ल्यात वास्तव्यास होता. त्याचे निवासस्थान व समाधी आजही किल्ल्याच्या आत आहे. या किल्ल्याच्या वृत्तांतात तो लिहीतो मी आजवर पाहिलेल्या अनेक स्थळांमध्ये नळदुर्ग किल्ला ही मोठी आकर्षक जागा आहे. इ.स. १८५७ च्या उठावात निजामाने इंग्रजांना केलेल्या मदतीसाठी बक्षीस म्हणुन त्याला नळदुर्ग व रायचूर हे २१ लाख रुपये उत्पन्नाचे जिल्हे परत करण्यात आले. भारत स्वातंत्र्य झाल्यावर १९४८ साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई करुन मराठवाडा भारतात समाविष्ट केल्यावर नळदुर्ग किल्ला भारत संघराज्यात विलीन झाला.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment