महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,134

नानासाहेब पेशव्यांची पेशवेपदप्राप्ति

By Discover Maharashtra Views: 2510 3 Min Read

नानासाहेब पेशव्यांची पेशवेपदप्राप्ति व पुढील उपक्रम –

नानासाहेबाच्या टीकाकारांनी या पेशव्यावर टीका करतांना त्याने प्रथमच कपटकारस्थानाने पेशवाई संपादिली असा त्यावर आरोप ठेवलेला आढळतो.या मुद्द्याचे निराकरण करण्याकरितां हा प्रकार कसा घडला तें प्रथम सांगितले पाहिजे. थोरले बाजीराव वैशाख शु. १३ रविवार ता.२८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले, व ता.२५ जून रोजी नानासाहेबास पेशवाईची वस्त्रे मिळाली.नानासाहेब पेशव्यांची पेशवेपदप्राप्ति. म्हणजे या दोन महिन्यांतच काय ती टीकाकार म्हणतात ती कारस्थाने घडली असली पाहिजेत. त्यांतील आरंभीचा महिना तर बापाच्या मृत्यूची बातमी नानासाहेबास कळून तो पुण्यास येऊन पोचण्यापर्यंत संपला. याच सुमारास शाहुंकडून नारो राम मंत्री व जिवाजी खंडो चिटणीस हे इसम नानासाहेबास साताऱ्यास नेण्यासाठी पुण्यास आले. या एकाच गोष्टीवरून शाहू महाराजांचा कल स्पष्ट दिसतो.

१३ जून रोजी साताऱ्यास पोहोचल्यावर बारा दिवसांतच नानासाहेबास पेशवाईंची वस्त्रे समारंभाने देण्यात आली. या वस्त्रांची किंमत २३० रुपये होती. खेरीज मोत्यांचा तुरा, निमचा व कट्यार हे जिन्नसही त्यास देण्यात आले. याच वेळी पेशव्याच्या गैरहजरीत साताऱ्यास त्याच्यातर्फे काम पहाण्यासाठी महादाजीपंत पुरंदरे यास शाहूनें पेशव्याचा मुतालिक म्हणून नेमिलें.

नानासाहेबास पेशवाई मिळू नये अशी खटपट करणारांचा विरोध राज्यास अपायकारक न व्हावा, याविषयी काळजी घेण्यासही शाहू महाराज विसरले नाही, हें गोविंदराव चिटणीसाने लिहिलेली शाहूची बखर वाचल्यास कळून येते. पेशवाईची वस्त्रे देण्याच्या दरबारांतच शाहूनें सर्व लोकांजवळ शपथपूर्वक असे मागणे मागितले की, “बाळाजीपंत लहान आहे, मसलत उभी करील, जाईल, हूडपणा करील, तर पत घेतली असे होऊ न देता, याजला संभाळून, मसलतीस एकदिल होऊन याचा लौकिक होईल, असे तुम्ही करून दाखवा.”  शाहू महाराजांचे हे मागणे दरबाऱ्यांनी मनःपूर्वक कबूल केलें. पेशवा कितीहि हुशार असला तरी हा वीस वर्षाचा पोर आम्हांस कोण शिकवणार, असे सर्व वयोवृद्ध व अनुभवी माणसांस वाटणे साहजिक होते. हा मनुष्यस्वभाव शाहू ओळखून होते, म्हणूनच त्यांनी स्वतःची भीड खर्च करून या प्रवृत्तीचे शक्य तें निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही या मंडळीस कह्यांत वागवीणे बराच काळ नानासाहेबास जड गेला. पण शेवटी त्याने आपली प्रधानकी चिरस्मरणीय केलेली पाहून इंग्लंडच्या इतिहासांतील धाकट्या पिट्टचे उदाहरण मनांत येते.शाहू महाराजांने नवीन पेशव्यास एकंदर तीस गांव मुकासे नेमून दिले. व आज्ञा केली की,

“बाजीरावाने थोरले बाळाजीपंत यांचे मागें बहुत सेवा निष्ठेने करून मोठमोठी कार्ये करून दाखविली. शेवटी इराणीचे पारिपत्य करून बादशाही स्थापावी म्हणून रवाना केले. तेथें आयुष्य थोडे झाले. त्यास त्यांचे पुत्र तुम्हीं, पातशाही रक्षून सर्व हिंदुस्थान आपले करावे ऐसा बेत त्याही केला, तो तुम्हीं सिद्धीस न्यावा, अटकेपार घोडे चालवावे.”

पातशाही रक्षून हिंदुस्थान आपलें करावे.हि शाहू महाराजांनी दिलेली आज्ञा नानासाहेबांनी तंतोतंत पाळली. नानासाहेबांच्याच कार्किर्देत राघोबा दादा आणि मल्हारराव होळकर यांनी अटकेपार झेंडे लावले आणि मराठेशाहीच्या घटनेस एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले..!

संदर्भ ~
मराठी रियासत – गो.स.सरदेसाई
खंड ५ (पुण्यश्लोक शाहूराजे,पेशवा बाळाजीराव ) पृ.क्र.२६

श्रीमंत नानासाहेब पेशवे – रियासतकार देसाई
प्रकरण दुसरे पृ.क्र.६१,६२

– प्रसाद पाठक

Leave a Comment