महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,61,022

नांगरदरा ट्रेक एक वेगळीच पर्वणी

By Discover Maharashtra Views: 3963 6 Min Read

नांगरदरा ट्रेक एक वेगळीच पर्वणी

घाटवाटा म्हटले कि या घाटवाटांनी फिरताना भटक्यांचा आनंद गगणात मावेनासा होतो.नांगरदरा नाव ऐकायला थोड विचित्र वाटते नाही का? अस काय आहे की ज्यामुळे या ठिकाणास नांगरदरा असे नाव पडले? निश्चितच मी आपणास ही माहिती अवगत करून देण्याचा प्रयत्न करतोय. याच सोबत एक नवीन माहिती पण आपणासमोर मांडतोय की जी कदाचित जुन्नरच्या इतिहासात आपण वाचली नसावी. जुन्नर आणि आस्वल असा उल्लेख तरी मी अद्याप कुठे ऐकला नाही. परंतु या घाटवाटेच्या शोधात मला अस्वलाचा उल्लेख स्थानिकांच्या तोंडून ऐकायला मिळाला व खुप अत्यानंद झाला.

खुप सा-या पर्यटकांनी नांगरदराचा संपर्क थेट दिवाणपाड्याशी जोडला व हे सत्य शोधण्यासाठी मी 28 कि.मी ची पायपीट करत समुद्रसपाटीपासुन 1146 मीटर उंच अशा अक्षांस- 19*19’25.6 रेखांश – 073*44’43.1 येथे अंजणावळ्याचा व-हाडी डोंगर व दौंड्या डोंगर यांच्या मध्यावर पोहचलो. ही पायपीट करताना अनेक कातळकोरीव पाय-या नजरेसमोर पडल्याने मी गोंधळून गेलो. सोबतीला दोन स्थानिक मार्गदर्शक रोहीदास बो-हाडे, किरण घुटे व मित्र सुशांत कबाडी होतेच.दरेवाडीतुन उत्तरेस पसरलेल्या माळशेज घाटाच्या कोकणकड्याकडे तो पण भर उन्हात. अनेक चढउतार पार करत करत घामाने ओलेचिंब होऊन आम्ही कोकणकड्यावर पोहचलो. लक्ष्य होते ते दरेवाडीतुन दिवाणपाड्यात उतरण्याचे. तो मार्ग म्हणजे आज मृत्यूची खाईच बनला आहे. स्थानिक सांगतात की खुप वर्षा पुर्वी लोक येथून वर येत असत परंतु येथे खराळ गेल्याने हा मार्गच बंद झाला. व दिसते ती फक्त दरी.

नांगरदरा ट्रेक

खरेतर दिवाणपाड्याचे नाते जोडले गेले ते नाणेघाटाशी. येथील असलेल्या दिवाणपाडा ते नाणेघाट मार्गाचा इतिहास 2200 वर्ष जुना असल्याचे निदर्शनास आला तो येथील कातळ कोरीव पाय-यां पाहूनच, व तो पुरावा सत्य असल्याचे जणू स्पष्टच संकेतच मिळाले. “दिवाण” म्हटले की आपण भुतकाळाच्या गुहेत शिरतो व आपल्या समोर उभे राहतात दिवाणजी कि ज्यांच्याकडे तेथील विभागाचा लेखा जोखा ठेवण्याची जबाबदारी पुर्वी असायची. नाणेघाट बांधला गेला व येथील शेतसारा व घाटमार्गामुळे जी जकात आकारली जायची ती संपूर्ण जबाबदारी दिवाणपाड्यात वास्तव्य करणा-या दिवाणजींकडे असायची. व त्यामुळे या वस्तीचे नाव दिवाणपाडा ठेवण्यात आले. या वस्तीला पण संरक्षण दिले गेले होते. कारण जुन्नरच्या मध्यवर्ती ठिकाणांना जोडणारी मुख्य म्हणजे हीच घाटवाट होती.

दिवाणपाड्या जवळ असलेले आंबेमाळ, सावर्णे अशी वेगवेगळी द-यांखो-यांत वसलेली गावे पहावयास मिळतात. येथून दिसणारे माळशेज घाट व वेडीवाकडी वळणे घेणारी एक काळी रेषा अर्थातच कल्याण ते अहमदनगर महामार्ग दृश्य, समोरच अंजनावळ्याचा व-हाडी डोंगररांग व याच डोंगराच्या आडून हळूच डोकाऊन पाहणारे किल्ले जीवधन व किल्ले भैरवगड यांचे अलौकिक दृश्य पहावयास मिळते.येथील परिसराचे निरीक्षण करत आम्ही निघालो ते नांगरदरा च्या शोधात. समोरच माळशेजच्या भेटीला आलेल्या दौंड्याचे रौद्र रूप वर चढण्यासाठी आव्हान देत होत. किरण व मी त्या कड्याच्या शिखरावर चढून विजय मिळविण्याचा प्रयत्न करत होतो. कातळाचे 90 डिग्री अँगलचे दोन टप्पे फ्रि हँड क्लाईंब केले खरे परंतु पुढील टप्याचा रूद्र अवतार पाहून त्या कड्याला मुजरा ठोकत आम्ही माघार घेत उतरणीला लागलो.

नांगरदरा ट्रेक

आता आम्ही माळशेज घाट कोकणकडा कडा अर्धा कि.मी दुर सोडत दक्षिणेस सरकु लागलो. समोर वनदेव डोंगर शिखर दिसत होते. शिखरावर चढण्याचा सोपामार्ग दक्षिणेकडून होता. त्या ठिकाणी पोहचून माघारी पुन्हा शिखरावर यावे लागणार होते. आम्ही तसे न करता सरळ उत्तरेकडून रिस्क घेत चढाई सुरू केली. कारण पश्चिमेला सुर्यदेव आराम करण्यासाठी मार्गस्थ झाल्याचे दिसून येत होते. दिवसभर तळपत्या त्या गोळ्यामध्ये आता थंडावा जाणू लागला होता. त्यामुळे शरीराला आराम वाटत होता. तो लाल गोळा डोंगराआड झाला की आम्हाला त्रासदायक ठरणार होता. कारण अंधार पडला तर येथील दगडधोंडे तुडवणे कठीण जाणार होते. त्या कठिण चढाई प्रसंगातून आम्ही वनदेवाचे दर्शन घेत तळमाची, किल्ले निमगीरी, किल्ले सिंदोळा, उधळ्या, शिनलोप, भोरदा-या व इतर सुंदर परिसर न्याहळत नांगरद-याकडे उतरू लागलो. बहरलेला रानमेवा आम्हास मेजवानीसाठी आमंत्रित करत असूनही आम्ही त्याच्या विनंतीला मान देऊ शकत नव्हतो.

सुर्यदेवता निद्रेच्या तयारीला लागली होती. हळूहळू त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या लवू लागल्या होत्या. आमची पावले झपझप उचलली जात होती. नांगरदरातुन उतरणे सोपे नव्हते. नांगरदरा पाठीमागे सोडत अस्वलदराने दरेवाडीत जायचा आमचा प्रयत्न होता. नांगरदराचा आकार बळीराजाच्या लाकडी नांगरा सारखा असल्याने पुर्वजांनी त्याचे बारश्याला ठेवलेले नाव म्हणजेच नांगरदरा असा भास झाला. नांगरदरा व अस्वलदरा हे खरेतर एकमेकांचे सोबती. दोघांनीपण येणाऱ्या पर्यटकांना जणू तळमाचीला पोहचविण्याचा ठेकाच घेतल्याचा भास होतो. अस्वलदरा म्हणजे जुन्नर तालुक्यात फक्त येथेच अस्वले पुर्वी पहावयास मिळायची असे येथील स्थानिक सांगतात म्हणून यास अस्वलदरा असे नाव पडले.अस्वलदरातील मोठ मोठाले दगड धोंडे तुडवत उतरणीला लागलो होतो. घामामुळे शरीरातुन दुर्गंधी येऊ लागली होती.पाय व गुडघे आराम मागत होते व ते त्यांना देणे शक्य नव्हते.

नांगरदरा ट्रेक

असमंतात पक्षी आपल्या घराकडे गुणगुणत जाताना दिसत होते. अगदी तशीच घराची ओढ आम्हास लागली होती. परंतु गुणगुण्यासाठी शरीरात त्राण शिल्लक नव्हते. दरेवाडीमध्ये 7:00 वाजता पोहचलो. येथुन 40 कि.मी प्रवास करून घरी वाट पाहत असलेल्या पिंलांच्या घरट्याकडे पोहचायचे होते. किरण व रोहीदासच्या घरच्यांनी दुरून आम्हाला पाहताच ब्लॅक टी तयारच करून ठेवला होता. चहाचे दोन घोट घेत व त्या दोघांना योग्य तो मोबदला देत व त्यांची जाण्याची परवानगी घेत आम्ही मार्गस्त झालो ते जुन्नर शहराकडे पुन्हा एकदा येथे वारंवर अभ्यास करण्यासाठी येण्याचा विचार करूनच.

मित्रांनो हे जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस 40 कि.मी अंतरावर देवळे या गावातील ठिकाण पहायला व अनुभवयाला विसरू नका. नाणेघाट मार्गाने किंवा माणिकडोह मार्गाने येथे पोहचता येते.भटकंती करताना जेवन पाणी सोबत ठेवायला विसरू नका.

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका
Leave a Comment