भग्न मंदिरावरील उग्र नरसिंह –
दोनच दिवसांपूर्वी सूर्य नारायणाचे शिल्प आणि त्याची माहिती दिली होती. त्याच होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील जिर्णावस्थेतील सोमेश्वर महादेव मंदिरावरील हे दूसरे अप्रतिम शिल्प. हा आहे उग्र नरसिंह. मांडीवरील हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारे दोन हात आणि शंख चक्र धारण करणारे दोन हात असे चार हात ओळखता येतात. बाकी शिल्पावर दशावतार कोरलेले दिसत नाही. डोक्यामागे नागफणा आहे. नरसिंहाचा मुकुट स्पष्टपणे दिसतो.
मंदिराच्या बाह्य भागावर मुख्य देवकोष्टकांतील ही मूर्ती असावी. जशी सूर्य नारायणाची आहे. मंदिराची अवस्था पाहून याची दूरूस्ती करण्यास असमर्थ ठरलेली सरकारी यंत्रणा आणि सरकारवर दबाव टाकू शकणारे आपण या सगळ्यांच्याच नालायक वृत्तीचे पोट या नरसिंहाने फाडावे असे फार तीव्रतेने वाटते. दिवाळीच्या नंतर एक महिन्याने देवदिवाळी असते. आशा करू की या देवदिवाळीला सर्वांना सुबुद्धी सुचून प्राचीन मंदिरांची दूरूस्ती जिर्णाद्धाराची कामे मार्गी लागतील.
या मंरदिरासाठी चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ११०१ मध्ये देणगी दिल्याचा शिलालेख याच मंदिरापाशी सापडलेला आहे. मंदिराचा कालखंड अकराव्या शतकाच्या शेवटचा असल्याचे यातून निष्पन्न होते.
मंदिराचा जिर्णोद्धार आपल्याला करता येत नसेल तर देवदिवाळीच्या दिवशी या प्राचीन शीलालेखाच्या बाजूलाच अजून एक शिलालेख लिहून ठेवण्याची गरज आहे. “आम्ही या मंदिराची दूरूस्ती करू शकत नाही. करीता हे मंदिर जमिनीत गाडून टाकण्यात येत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४२ देवदिवाळी १५ डिसेंबर, २०२०, स्वतंत्र भारतातील लोकसभेत/विधानसभेत निवडून आलेले सर्व जनतेचे राजे, सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि १३५ करोड गौरवशाली इतिहास संस्कृती प्रेमी जनता.”
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद