महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,288

श्री नारायणेश्वर मंदिर , कऱ्हाड

By Discover Maharashtra Views: 1289 3 Min Read

श्री नारायणेश्वर मंदिर , कऱ्हाड –

कऱ्हाड आणि परिसरात लहानमोठी बरीच मंदिरे आहेत. ह्यातल्या काही मंदिराचा समूह कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर आहे.यातील बरीचशी मंदिरे १८ व्या शतकातील असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा काठावरील कृष्णामाईचे मंदिर ग्रामदैवत आहे.त्याच्याच जवळ शेजारी असलेले श्री नारायणेश्वर मंदिर घडीव दगडांनी बांधणी केलेली असून मध्ये मुख्य शिखर व त्याच्या चारी बाजूंना तुळशी वृदांवन सारखे मध्यापर्यंत शिखर आहे.मंदिरात प्रवेश करत असताना सुबक असे नक्षीदार दगडी खांब , समोरच नंदी पहावयास मिळतो. दोन्ही बाजूला छोट्या देवळ्या , दारावर सुंदर अशी गणेशपट्टी, बाजूने दगडात कोरलेले काम दिसून येते, खाली कीर्तीमुख सुद्धा आहे.गाभाऱ्यात प्रवेश करत असताना समोरच वरच्या बाजूला नक्षीकाम केलेली खिडकी आणि खाली छोटीशी पांडुरंगाची राही रखुमाई सोबतची मूर्ती दिसून येते. मंदिरात एकूण चार मुर्त्या आहेत.डाव्या बाजूला विष्णू ची मूर्ती उजव्या बाजूला सुर्यदेवाची मूर्ती आहे. त्यासोबतच गणेशाची आणि ब्रम्हदेवाची मूर्ती सुद्धा आपल्याला पहावयास मिळतात.

मंदिरात प्रवेश करत असताना दगडी खांब ओलांडून गेल्यानंतर डाव्या बाजूला भिंतीत शिलालेख आहे.शिलालेख देवनागरी लिपीत आहे. हा शिलालेख ११ ओळींचा असून पहिल्या ओळींतील मधली अक्षरे जरा अस्पष्ट आहेत. त्याची लांबी ७० सें.मी व रुंदी ४८ सें.मी व शिलालेखात चार गावांचा उल्लेख मिळतो.इतिहास संशोधक – अभ्यासक के.एन.देसाई सर आणि कऱ्हाड समग्र लेखक का.धो.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही मित्रांच्या साहाय्याने संपूर्ण शिलालेखाचा अभ्यास पूर्ण केला. तेव्हा समजले की या शिलालेखाबाबत कुठेही अद्याप मांडणी करण्यात आलेली नाही.शिलालेखात ज्या मंदिर निर्मितीचा उल्लेख करण्यात आला त्यावरून (१८४७ – १८४८) या काळात पूर्ण झाल्याचे समजते.

मंदिरात अप्रकाशित असलेला शिलालेख..!

१. श्री दाजीराव व अपाजी ( उपनाम टिपणे पोलाद ) वाणि देश

२. पांडे व नाडगौडी तर्फ कोळे व मर्ळी इनामदार मौजे कोळे

३. वाडी बनपुरी सणबूर वगैरे राहणारा कोळे वाडी याचे जन्म शके

४. ( १७…) त्याणी ग्रहस्थाश्रम त्याग करून तेवीस वर्षा तच ( परमाविधी )

५.(…) होवून तीर्थयात्रेत तेवीस वर्षे नंतर सात वर्षे संन्यास आ

६. णि त्रेपन्नावे वर्षी शके १७५३ संवत्सरे क्षेत्र कहाड येथे भाद्र

७. पद श्रुध १ सर्मोधा स्थ जाहले त्याचे पुत्र नारायणराव या

८. णि श्री कृष्णा तीरी स्थळ समाधी देवून वर प्रासादाचे

९. काम चालू केले त्यात शके १७६९ वैशाख कृष्ण ३ दिव

१०. शी नारायणेश्वर प्रमुख पंचायतन नामे ठेवून बाण

११. लिंग स्थापना केली तो हा प्रासाद ।।

श्री दाजीराव व अपाजी वाणि देशपांडे नाडगौडी कोळे व मरळी इनामदार मौजे कोळेवाडी बनपुरी सणबूर राहणार कोळेवाडी यांनी ग्रहस्थाश्रम त्याग केला तेवीस वर्षात तीर्थ यात्रेत तेवीस वर्षे नंतर सात वर्षे संन्यास घेतला आणि त्रेपन्नावे वर्षी शके १७५३ ला कऱ्हाड येथे समाधी घेतली त्यांचा पुत्र नारायणराव यांनी कृष्णाकाठी स्थळ समाधी देवून देवालयाचे काम चालू केले शके १७६९ वैशाख कृ ३ दिवशी नारायणेश्वर प्रमुख पंचायतन नाव ठेवून बाण लिंग स्थापना केली.

© संकेत फडके , कऱ्हाड

Leave a Comment