महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,49,409

नारायणराव मुख्यप्रधान

By Discover Maharashtra Views: 3582 3 Min Read

नारायणराव मुख्यप्रधान

अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रघुजी आंग्रेची भेट घेण्यास नारायणराव पर्वतीला गेला होता. रघुजीला मुख्यप्रधान विरोधी कारस्थानाची कुणकुण लागल्याने त्याने मुख्यप्रधानच्या भेटीत सावधगिरीचा इशारा दिला. रघुजीची भेट झाल्यावर नारायणरावाने हि गोष्ट हरिपंत फडकेच्या कानी घातली. मात्र असे कित्येक कट आजवर उघडकीस आल्याने त्याला या कारस्थानाचे महत्त्व वाटले नाही. नारायण देखील बराचसा गाफील राहिला. आपल्या विरोधात कट – कारस्थान रचण्यात आले आहे हे माहिती असताना देखील त्याने शनिवारवाड्यात परत आल्या आल्या कटवाल्यांचा तपास करून कारस्थानाची पाळेमुळे खणून काढण्याऐवजी सरळ विश्रांतीसाठी शयनगृहात जाण्याचा निर्णय घेतला. हरीपंतास त्या दिवशी एके ठिकाणी जेवणाचे निमंत्रण असल्याने भोजनोत्तर कटाचा बीमोड करता येईल अशा विचाराने तो गाफील राहिला.

दरम्यान कट फुटल्याची वार्ता कटवाल्यांना लागून त्यांनी त्वरा केली. हरिपंत जर परत आला तर सर्वांच्याच जिवावर बेतेल हे जाणून गारद्यांनी दंगा केला. वाड्यात घुसून त्यांनी सरळ तोडातोडी आरंभली. वाड्यात चाललेल्या आरडाओरड्यांनी नारायणास जाग आली. प्रसंगाचे गांभीर्य जाणून तो प्राण रक्षणास्तव पार्वतीबाईच्या दालानाकडे धावला. परंतु गारद्यांपासून त्याचा बचाव करण्यास ती असमर्थ असल्याने तिने दादाकडे जाण्याच्या त्यास सल्ला दिला. घाबरलेला नारायण तसाच चुलत्याकडे पळत गेला. त्याच्या कमरेला मिठी मारून आपणांस जीवनदान देण्यासाठी त्याची आर्जवे करू लागला. तितक्यात गारदी येउन पोहोचले. यावेळी दादाच्या मनात बरीच चलबिचल माजली. हा एक असा क्षण होता कि त्यावेळी त्याच्यातील सत्तेसाठी हपापलेला राजकारणी व एक कुटुंबवत्सल पुरुष यांच्यात झगडा पडून त्यात राजकारणी पुरुषाची हार झाली.

दादाने गारद्यांना आपला हात आवरता घेण्याची आज्ञा केली पण गारदी #सरदार यांना दादाची स्वभाव परिचयाचा असल्याने त्यांनी त्याची आज्ञा धुडकावून लावत नारायणावर घाव घातले. त्याप्रसंगी नारायण दादाला बिलगलेला असल्याने दादाच्या हातावर आणि डोक्यावर हलक्या अशा जखमा झाल्या. नारायणास पुरता शांत केल्यावर गारदी शांत झाले. वाड्यातील या खूनसत्रात सुमारे ११ गडी व २ स्त्रिया मारल्या गेल्या तर एका गाईला देखील आपले प्राण गमवावे लागले.  शनिवारवाड्यात गारद्यांनी धुमाकूळ घातल्याची वार्ता एव्हाना सर्वत्र पसरली होती. परंतु आत नेमके काय चालले आहे याचा कसलाच अंदाज न आल्याने हरिपंत वगैरे सरदार वाड्याभोवती फौजा व तोफा पेरून स्वस्थ बसले. इकडे गारद्यांनी वाड्यात दादाच्या नावाचा जयजयकार करत शक्य तितकी लुट केली.

वाड्याच्या बाहेर नारायण – दादाच्या पक्षपात्यांची झुंबड उडाली. आत काय घडले असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दादाने बाहेर चिठ्ठी पाठवून बजाबा पुरंदरे, भवानराव प्रतिनिधी, बापू, मालोजी घोरोपडे यांना आत घेतले. आतील वर्तमान नजरेस आणि कानावर पडताच या मंडळींनी दादाचा निषेध केला. त्यानंतर नारायणाच्या देहाचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात येउन त्याच रात्री दहनविधी गुपचूप उरकण्यात आला. यावेळी नारायाणाची बायको गंगाबाईने सती जाण्याचा अट्टाहास केला परंतु ती गरोदर असल्याने दादा – आनंदीने तिला सती जाऊ दिले नाही. अर्थात यामागील भावनिक कारणांपेक्षा राजकीय कारणे अतिशय प्रभावी होती. सतीचा समारंभ गुपचूप पार पाडता आला नसता. त्यामुळे घडल्या प्रकाराची सर्वत्र वाच्यता होऊन हाती आलेलं यश दुरावण्याचा धोका होता. असो, नारायणाचा दहनविधी वगैरे उरकून झाल्यावर दादाने कारभार हाती घेतला.

नारायणराव मुख्यप्रधान यांचा खून झाला ती तारीख होती – 30 ऑगस्ट 1773

माहिती साभार – रवि पार्वती शिवाजी मोरे | मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

Leave a Comment