महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,793

नाशिक ते जुन्नर | बारा शंकराची मंदिरे

By Discover Maharashtra Views: 2742 13 Min Read

नाशिक ते जुन्नर | बारा शंकराची मंदिरे –

सह्याद्रीत भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहार राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली ही आख्यायिका ऐकायला मिळते. पण खरोखर ही मंदिरे झंज राजाने बांधली आहेत का? शिलाहार राजांच्या आजपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध शिलालेख आणि ताम्रपट यांच्याद्वारे झंज आणि त्याने बांधलेल्या (?) शिवमंदिराचा आढावा ह्या लेखाद्वारे घेऊया.

राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (शके ७१५-७३६) याच्या काळात राष्ट्रकुट घराण्याचे मांडलिक म्हणून शिलाहारांचा उदय झाला. उत्तर कोकणातील शिलाहार राजघराण्यातील राजा वप्पूवन्न याचा मुलगा झंज. राजा वप्पूवन्न यांच्यानंतर झंज सत्तेवर आला. झंज राजाचा राज्यकाल किती होता सांगणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. आजपर्यंत झंज राजाचा कोणताही शिलालेख किंवा ताम्रपट अभ्यासासाठी उपलब्ध झालेला नाही आहे. झंज राजाचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा (शिलालेख/ताम्रपट) नसल्यामुळे त्याच्या काळातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी किंवा त्याच्या राज्यकाळात त्याने बांधलेल्या मंदिरांची माहिती मिळू शकत नाही.

अ. स. आळतेकर यांनी शके ८३२-८५२ हा झंज राजाचा कार्यकाळ निश्चित केला आहे. वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजांवर लिहिलेल्या पुस्तकात अ. स. आळतेकर यांनी झंज राज्याचा सांगितलेलाच कार्यकाळ नमूद केला आहे.

अरब इतिहासकार आणि भूगोलतज्ञ अल मसुदी याने आपल्या प्रवासवर्णनात सन ९१६ मध्ये शिलाहारांसंदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. “सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.”

झंज राजाच्या मंदिराबद्दल इतिहासकारांनी शिलाहार राजा छित्तराजा याच्या नंतर सत्तेवर आलेल्या राजांच्या निवडक शिलालेख आणि ताम्रपटांचा विचार केलेला दिसून येतो. सन १८८० मध्ये के. टी. तेलंग यांनी खारेपाटण येथील राजा अनंतदेव याचा प्रकाशित केलेला ताम्रपट अ. स. आळतेकर यांनी संदर्भ म्हणून वापरला आहे. तर वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजघराण्याच्या शिलालेखांवर आधारित पुस्तकात “त्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी स्वतःच्या नावाने शिवाची १२ मंदिरे बांधली. पण ती आता नष्ट झाली असावीत.” असे विधान केले आहे. पण ह्या विधानाला मिराशी यांनी कोणताही पुरावा दिला नाही आहे.

झंज राजाने बांधली म्हणून ज्या मंदिरांचा उल्लेख केला जातो, ती मंदिरे पुढीलप्रमाणे.

०१. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक (अहिल्यातीर्थानजीक असलेले भग्न शिवालय)
०२. वाकी नदी, त्रिंगलवाडी, जिल्हा नाशिक
०३. बाम नदी, बेलगांव, जिल्हा नाशिक
०४. धारणा नदी, तऱ्हेळे, जिल्हा नाशिक
०५. कडवा नदी, टाकेद, जिल्हा नाशिक
०६. प्रवरा नदी, रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०७. मुळा नदी, हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०८. पुष्पावती नदी, खिरेश्वर, नागेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
०९. कुकडी नदी, पूर, कुकडेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१०. मीना नदी, पारुंडे, ब्रम्ह्नाथ मंदिर, जिल्हा पुणे
११. घोड नदी, वचपे, सिध्देश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१२. भीमा नदी, भोरगिरी येथील शिवमंदिर, भोरगिरी, जिल्हा पुणे

झंज राजाच्या मंदिरासाठी शिलाहार राजा अपरादित्य याचा पन्हाळे (ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी) ताम्रपटात असलेल्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो. पण पन्हाळे ताम्रपट अपरादित्य राजाने दिलेलाच नाही आणि संदर्भासाठी दिलेला श्लोक पण अर्धवट आहे. “घ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानी” ह्याचा अर्थ आहे “झंजाने स्वतःच्या नावाने शंकराची बारा मंदिरे उभारली. हि मंदिरे म्हणजे धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” ह्या संपूर्ण श्लोकात फक्त मंदिरांचा उल्लेख आहे. मंदिरे कोणती हे सांगितलेले नाही.

छद्वैदेव याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स) शके ८७० या काळातील ताम्रपट आहे. झंज राजाचा उल्लेख असलेला पहिलाच ताम्रपट म्हणून हा महत्त्वाचा ताम्रपट आहे. या ताम्रपटात झंजाचे वर्णन करणारा श्लोक आहे. “झंज: सकलगुनौघै: संपहो (न्नो) गीयते जगत्यनिशं| आखंडल इव तस्मादभवत्सां (ग्रामिकैर्) गुणै (वि)दित:” याचा अर्थ आहे “त्याच्यापासून झंज ज्याची संपूर्ण जगात प्रशंसा केली जात होती, त्याच्याकडे अनेक गुणवत्ता होत्या. युध्दकौशल्यामध्ये तो इंद्रासारखाच निपुण आहे.” छद्वैदेव याने झंज राजाची तुलना इंद्राबरोबर केली आहे. परंतु त्याने कोणत्याही मंदिरांचा उल्लेख केलेला नाही आहे. तसेच छद्वैदेव नंतर सत्तेवर आलेल्या कोणत्याही शिलाहार राजाने छद्वैदेव याचा उल्लेख केलेला नाही आहे. तसेच झंज राजानंतर गोग्गी आणि गोग्गीनंतर छद्वैदेव सत्तेवर आले. याचाच अर्थ झंज आणि छद्वैदेव यांच्यामध्ये कमीतकमी साधारणपणे ३० वर्षांचे अंतर असावे. तसेच झंज व छद्वैदेव यांचे नाते आजोबा-नातू असे होते.

छद्वैदेव राजानंतर त्याचा भाचा अपराजित सत्तेवर आला आणि याच्याच राज्यकाळात ताम्रपटांचा मसुदा निश्चित करण्यात आला. अपराजित याचे शके ९१५ मधील दोन ताम्रपट जंजिरा येथे सापडले आहेत आणि दोन्ही ताम्रपटात झंजाबद्दल वर्णन करणारे श्लोक सारखेच आहेत. जंजिरा ताम्रपटात “झंजनामा सुतस्तस्माद्वप्पुन्नादभूदसौ । उदितोदितता येन वंशस्य प्रकटिकृता ||२०|| चतुरश्चतुरारा स्योपि नकृत्स्नान्गदितुंगुणान् । स(श)रद भ्रसितान्यस्याचतुरास्ये तु का कथा ||२१|| तस्यानुजो निजभुजोर्ज्जितारि: श्रीगोग्गीराज इह श्रीझंजराणकगुणान्दधानस्त्यागा भ्दुजङविजयीर्म्मडिझंजनामा ||२२||” असे झंजाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ आहे “वपुवन्नापासून जन्माला आलेल्या मुलाचे नाव झंज होते आणि त्याने घराण्याचे नाव उच्चपदाला नेले. तसेच त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांची बरोबरी ब्रम्हदेवसुध्दा करू शकत नाही. झंजानंतर गादीवर आलेल्या त्याच्या धाकट्या भावाकडे म्हणजे गोग्गीकडे सुध्दा त्याच्या मोठ्या भावासारखेच चांगले गुण आहेत. म्हणून त्याला “इर्मडी झंज” किंवा “तरुण झंज” अशी उपाधी दिली आहे.” या श्लोकात सुध्दा कोणत्याही मंदिरांचा उल्लेख आलेला नाही.

अपराजित यांच्या शके ९१९ मधील भदना ताम्रपटात “वपुवन्नापासून जन्माला आलेल्या मुलाचे नाव झंज होते आणि त्याने घराण्याचे नाव उच्चपदाला नेले” अश्या अर्थाचा श्लोक आहे. इथे पण कुठेही मंदिराचा उल्लेख आलेला नाही.

अपराजितनंतर सत्तेवर आलेल्या अरीकेशरी (वज्जड दुसरा याचा भाऊ आणि छित्तराजा याचा काका) राजाचा एकमेव ताम्रपट शके ९३९ मधील असून तो ठाणे येथे सापडला. या ताम्रपटात झंजाचे वर्णन “त्याचा मुलगा (वप्पुवन्नाचा) झंज हा पराक्रमी होता” असे केलेले आहे.

अरीकेशरी नंतर त्याचा भाचा छित्तराजा सत्तेवर आला. याचे आत्तापर्यंत ७ ताम्रपट उपलब्ध झालेले आहेत. शिलाहार घराण्यातील हा एकमेव राजा ज्याचे एवढे ताम्रपट उपलब्ध आहेत. झंज राजाने बांधलेल्या शिवमंदिराचा पहिल्यांदा उल्लेख असणारा छित्तराजा याच्या राज्यकाळातील पहिला ताम्रपट कल्याण येथे सापडला. या ताम्रपटाचा काळ शके ९४१ असा आहे. या ताम्रपटात मंदिरासाठी पुढील श्लोकरचना आहे. “शंभोर्यो द्वादशापि व्यरचयदचिरात्कीर्तनानिस्वना म्ना सोपानानीव मन्ये प्रणत तनुभृतां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” याचा अर्थ आहे “त्याने शंकराची बारा मंदिरे बांधली आणि ती त्याच्या नावाने ओळखली जाऊ लागली. धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी ती मंदिरे म्हणजे स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” छित्तराजाच्या भोईघर (शके ९४६) च्या ताम्रपटात फक्त “स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” फक्त एवढाच उल्लेख आहे. भोईघर ताम्रपट गहाळ झालेला असल्यामुळे संपूर्ण श्लोक उपलब्ध नाही आहे. पण हा श्लोक झंज राजाशीच निगडीत असावा असे मिराशी यांचे मत आहे. छित्तराजाचा पनवेल ताम्रपट (शके ९४७) काळातील आहे. ह्या ताम्रपटाच्या फक्त एकाच पत्र्याच्या फोटो उपलब्ध आहे. इतर पत्रे गहाळ झालेले असल्यामुळे ह्या ताम्रपटातील झंजाचे वर्णन माहिती नाही. छित्तराजाच्या भांडूप (शके ९४८) व दिवे आगार (शके ९४९) या ताम्रपटात अनुक्रमे “श्रीझंज इत्यभवदस्य सुत:” (त्याचा मुलगा (वप्पुवन्नाचा) पराक्रमी झंज होता आणि “श्रीझंजराजस्ततोभूत्” (त्याच्यानंतर झंजराजा होता) असे झंजराजाचे वर्णन आले आहे. छित्तराजाच्या भोईघर, भांडूप व दिवेआगार ताम्रपटात मंदिराचा उल्लेख आलेला नाही. पुन्हा मंदिरांचा उल्लेख एकदम शके ९५६ काळातील व सध्या बर्लिन येथे असलेल्या ताम्रपटात मिळतो. बर्लिन ताम्रपटात “तस्माज्जातस्तनूजो रजनिकर इवानदिताशेषलोक श्लाघ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानीव मन्ये प्रणत तनुभृ तां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” अशा स्वरूपाचे झंज राजा व त्याच्या मंदिरांचे वर्णन आले आहे. या श्लोकाचा अर्थ “त्याचा (वप्पुवन्नाचा) कौतुकास्पद मुलगा पराक्रमी झंज सत्तेवर आला. चंद्र आकाशात आल्यानंतर जसा लोकांना आनंद लोकांना होतो, तसाच आनंद झंज सत्तेवर आल्यानंतर लोकांना झाला. सूर्य जसा अंधार दूर करतो तसाच अंधकार त्याने दूर केला. त्याने स्वतःच्या नावाने शंकराची बारा मंदिरे उभारली. ही मंदिरे म्हणजे धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” चिंचणी ताम्रपट (शके ९५६) छित्तराजाचा मांडलिक चामुंड राजा याचा असल्यामुळे त्या ताम्रपटात झंजाचा उल्लेख नाही आहे.

नागार्जुन राजा ठाणे (९६१), मुम्मुणी ठाणे (९७०), मुम्मुणी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय (९७१), अनंतदेव खारेपाटण (१०१६), महाकुमार केशिदेव ठाणे (१०४२), अपरादित्य वडवली (१०४९), विक्रमादित्य पन्हाळे (१०६१) आणि मल्लिकार्जुन पन्हाळे (१०७३) या नंतरच्या सर्व ताम्रपटात छित्तराजाने झंज राजाबद्दल व मंदिरांबद्दल बर्लिन ताम्रपटात लिहिलेलाच श्लोक लिहिलेला आहे.

झंज राजाने बांधलेल्या मंदिरासाठी ज्या अपरादित्य राजाच्या पन्हाळे ताम्रपटाचा आधार घेतला जातो असा कोणताही ताम्रपट ह्या राजाचा नाही. अपरादित्य राजाचा वडवली ताम्रपट आहे आणि पन्हाळे ताम्रपट एक नसून दोन आहेत. त्यापैकी पहिला ताम्रपट विक्रमादित्य (शके १०६१) व दुसरा ताम्रपट मल्लिकार्जुन (शके १०७३) या राजाचा आहे. तसेच ज्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो, तो अर्धवट आहे. पूर्ण श्लोक: तस्माज्जातस्तनूजो रजनिकर इवानदिताशेषलोक श्लाघ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानीव मन्ये प्रणत तनुभृ तां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां. हा संपूर्ण श्लोक सद्यस्थितीत बर्लिनमध्ये असलेल्या छित्तराजाच्या शके ९५६ च्या ताम्रपटात आधीच आला आहे.

वरील ताम्रपटांचा अभ्यास केल्यानंतर छित्तराजाच्या कल्याण व बर्लिन ताम्रपटात पहिल्यांदा झंज राजाचे नाव शिवमंदीरांशी जोडले गेलेले दिसते. जर झंज राजाने शंकराची मंदिरे बांधली असती तर त्याचा उल्लेख झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी किंवा छद्वैदेव यांनी नक्कीच केला असता. पण झंज राजानंतर साधारणपणे ८९ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या छित्तराजा याने केलेला आहे. छित्तराजाच्या आधीच्या राजांनी ताम्रपटात झंज राजाने बांधलेल्या शंकराच्या मंदिराविषयी काहीच भाष्य का केलेले नाही ह्याचे समाधानकारक उत्तर मिळणे सध्यातरी कठीण आहे.

झंज राजाच्या काळात ह्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असे मानले आणि ही मंदिरे त्याच्या कार्यकालात पूर्ण न होता नंतरच्या राजांच्या कार्यकालात पूर्ण झाली असे मानले, तर त्या राजांनी शिलालेख नोंदून ठेवले असते. उदा. अंबरनाथ शिवमंदिरातील राजा मम्मुनी याचा शिलालेख. छित्तराजा हा पण मोठा शिवभक्त होता. त्याने अंबरनाथ येथील प्रसिध्द भूमिज शैलीतील शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. पण ते मंदिर छित्तराजाच्या कारकि‍र्दीत पूर्ण न होता मम्मुनी राजाच्या कार्यकालात पूर्ण झाले. तर अंबरनाथ मंदिरात तश्या अर्थाचा शिलालेख कोरून ठेवला आहे. या शिलालेखात हे मंदिर छित्तराजा याने बांधायला सुरुवात केले आणि मम्मुनी याच्या काळात काही अधिकाऱ्यांनी मंदिराचे काम पूर्ण केले असे नमूद केले आहे. ह्या शिलालेखाचा काळ शके ९८२, शुक्रवार ९ आणि श्रावण महिना आहे. मंदिराचे काम ज्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले त्यांची नावे सुध्दा दिलेली आहेत. उदा. महामात्य बिंबपैय, महाप्रधान नागनैय इ.(नाशिक ते जुन्नर)

शिलाहार राजांनी मंदिरे बांधली आणि त्या मंदिरांसंदर्भात त्यांनी शिलालेख पण कोरून ठेवले आहेत. त्या शिलालेखांमध्ये मंदिराचे नाव, काळ, मंदिराला जमीन दान दिली असेल तर त्याचे उल्लेख, मंदिर कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले इ. अनेक संदर्भ वाचायला मिळतात. उदा. १) लोणाड येथील अपरादित्य दुसरा याच्या शके ११०६ मधील गध्देगाळीवर कोरलेल्या शिलालेखात “व्योमेश्वर” मंदिराचा उल्लेख आहे. लोणाड गावात शिलाहारकालीन मंदिर आहे आणि तो शिलालेख ह्याच मंदिरासंदर्भात असावा. २) चौधरपाड्यातील केशीदेव दुसरा याच्या शके ११६१ काळातील शिलालेखात “श्रीषोंपेश्वर” असा मंदिराचा उल्लेख आला आहे.

झंज राजाने बांधली म्हणून जी बारा मंदिरे सांगितली जातात, त्यापैकी फक्त हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर आणि नागेश्वर हीच तीन मंदिरे मूळ रुपात आहेत. बाकीची मंदिरे धरणाच्या पाण्यात गेलेली आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण झालेले आहे. मंदिराची शैली ओळखण्यासाठी मंदिराचे शिखर महत्त्वपूर्ण ठरते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर नागर शैलीत, अमृतेश्वर मंदिर भूमिज शैलीत आणि नागेश्वर मंदिर फांसणा शैलीत आहेत. कुकडेश्वर मंदिराचा शिखर नष्ट झालेले असल्यामुळे त्याची निश्चित शैली सांगता येणार नाही. जर झंज राजाने ही मंदिरे बांधली आहेत, तर त्यांची शैली वेगवेगळी का?

तसेच झंज राजा मंदिरे बांधतो ती पण त्याच्या राजधानीपासून भरपूर लांब ठिकाणी. असे का? त्याला मंदिरे बांधायचीच असती तर ती त्याने राजधानीच्या आसपास बांधली असती. ज्या प्रदेशात ही सगळी मंदिरे आहेत तो प्रदेश झंज राजाच्या ताब्यात होता का हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक ते जुन्नर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांच्या उगमावर असलेली बारा मंदिरे झंज राजानेच बांधलेली आहेत ह्या दाव्याला आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे.नाशिक ते जुन्नर.

संदर्भ – Mokashi, Rupali 2016 King Jhanja and the Legend of Shiva Temples: An Epigraphical Analysis. Research Deliberation, Vol II / Issue I (May, 2016) 8:3, pp. 25–41. शिलाहारांचे उपलब्ध असलेले ताम्रपट.

Pankaj Vijay Samel 

Leave a Comment