मकर तोरणावरील देखणा नटेश –
मंदिराच्या मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना जो पॅसेज लागतो त्याला अंतराळ म्हणतात. या भागात डाव्या उजव्या भिंतींवर देवकोष्टके असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते तिच्या वरच्या भागाला मकर तोरण म्हणतात. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे “कोरस” म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
छायाचित्र सौजन्य Vincent Pasmo
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद