नटेश शिव (नीलकंठेश्वर मंदिर, निलंगा, जि. लातुर)
शिवाच्या विविध मनमोहक मूर्ती मराठवाड्यात आहेत. निलंग्याच्या मंदिरावर बाह्यभागावर देवकोष्टकात ही मुर्ती आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात खट्वांग आहे. खालच्या हातात बीजपुर (मातुलुंग) आहे. शिवाच्या उजव्या बाजूस खाली नंदी बसलेला आहे. डाव्या बाजूस गंगा आहे. डावा पाय जमिनीवर टेकवला असून उजवा पाय गुडघ्यात दूमडून वर उचलला आहे. अशा १०८ नृत्यप्रकार सांगितले जातात त्यातील ही मुद्रा भुजंगतलास म्हणून ओळखली जाते. मूर्ती तीन फूटाची आहे.
१२ व्या शतकातील हे उत्तर चालुक्य कालीन मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मुख्य गाभार्यात शिवलिंग असून इतर दोन गाभार्यांत विष्णु व हर गौरी (शिव पार्वती एकत्र) या मूर्ती आहेत. (माया पाटील शहापुरकर यांच्या “मंदिर शिल्पे’ या ग्रंथात या मंदिरावर सविस्तर लिहिले आहे. ही माहिती त्यातीलच आहे.)
शिवाच्या या नृत्य मूर्तीला नटेश असे म्हणतात. नटराज हा शब्द आपण शिवाच्या सगळ्याच नृत्य मूर्तीला वापरतो. पण तो तसा नाही. (फोटो सौजन्य डाॅ. दत्तात्रय दगडगावे, लातुर)
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद