नाना फडणीसांची बाग, नातू बाग –
नाना फडणीस म्हणजे उत्तर पेशवाईतले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. ते पेशव्यांचे कारभारी होते. छोट्या सवाई माधवराव पेशव्यांना जाणते करण्यापासून ते पेशवाईचा संपूर्ण व्याप समर्थपणे सांभाळून उत्कर्ष साधण्यापर्यंत त्यांनी सर्व काही केले. नवनवीन कल्पना राबवून त्यातून काही भव्य निर्माण करण्याची त्यांना आवड होती. नानांनी काळ्या वावरात जागा घेऊन तेथे प्रशस्त बाग तयार केली होती. काळे वावर म्हणजे आताच्या बाजीराव रस्त्यापलीकडील राजा केळकर संग्रहालय, सरस्वती मंदिर, पूर्वीचे तरुण भारतचे ऑफिस, वीरकर हायस्कूल ते थेट मामलेदार कचेरीपर्यंतचा भाग. या वावरात नानांनी बागेची उभारणी केली होती. काळ्या हौदासमोरील रस्त्यावर म्हणजेच राजा केळकर संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी या बागेचे एक प्रवेशद्वार होते, तर दुसरे चिंचेच्या तालमीमागे. हि बाग पश्चिमेस काळ्या हौदापर्यंत, पूर्वेस भिकारदास मारुती ते चिमण्या गणपती, उत्तरेस राजा केळकर संग्रहालयापर्यंत आणि दक्षिणेस टेलीफोन भवन एवढ्या औरस चौरस परिसरात होती. तत्कालीन कागदपत्रांमध्ये नाना फडणीसांची बाग, नातू बाग १८ एकर ३४ गुंठे एवढ्या प्रचंड क्षेत्रफळाची असल्याचा उल्लेख येतो.
पेशवाईच्या अखेरीस सारेच राजकारण बदलले. दुसरा बाजीराव केवळ वंशपरंपरेने पेशवा झाला. नाना आणि पेशव्यांमध्ये काही कारणांमुळे वितुष्ट आले, त्यामुळे नानांच्या मिळकती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी जप्त करून सरकारजमा केल्या, त्यात ही बागही जप्त केली. नाना इ.स. १८०० मध्ये कैलासवासी झाले. त्यानंतर ह्या बागेची रयाच गेली.
पेशवाई संपून इंग्रजी अंमल सुरू झाला. बाळाजीपंत नातू हे इंग्रजांचे सल्लागार होते. इ.स. १८३० च्या सुमारास इंग्रजांनी या बागेची जागा बाळाजीपंतांना इनाम दिली. त्या वेळी बागेचे अस्तित्व नावालाच होते. बाकी जमिनीला गंजीचे वावर असे नाव पडले होते. बाळाजीपंतांनी पुन्हा ही बाग फुलविली. हळूहळू नानांची बाग हा उल्लेख मागे पडून नातूंची बाग असा उल्लेख होऊ लागला.
बाळाजीपंतांचे चिरंजीव रावसाहेब गणपतराव नातू यांनी, या बागेत देऊळ असावे असे वाटून, इ.स. १८५६ मध्ये एक छोटेखानी पण सुंदर महादेवाचे मंदिर बांधले. जे आज वीरकर हायस्कूलच्या शेजारी राजा केळकर संग्रहालयासमोर आहे.
कालांतराने आजूबाजूला वस्तीही भरपूर वाढली आणि बागेचे १-१ भाग घरांखाली येऊ लागले. बाजीराव रस्ता पुढे टिळक रस्त्यापर्यंत वाढला. त्याने या बागेचे २ तुकडे केले. नातूंची घरे असणारा पूर्वेचा भाग राहिला, बाकी सर्व ओसाड झाले आणि नातूंच्या बागेचेही अस्तित्व संपले. आता नातू बागेच्या नावावर एक छोटेस ग्राउंड बाफना पेट्रोल पंपाच्या मागे आहे.
नंतर, साधारणत: २५-३० वर्षांपूर्वी या जागेवर एखादी सार्वजनिक बाग असावी या हेतूने सुंदर उद्यान पुणे महानगर पालिकेने बांधले. जे आज राणा प्रताप उद्यान म्हणून ओळखले जाते.
संदर्भ :
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पत्ता :
https://goo.gl/maps/5Qp9pz46accGaE6k6
आठवणी इतिहासाच्या