निसर्गनिर्मित दगडी पुल –
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात अनेक निसर्गनिर्मित आश्चर्य लपलेले आहेत .सह्याद्रीच्या पाऊलवाटा पालथ्या घालताना निसर्गाची अशी अनेक रुपे बघायला मिळतात .असाच एक निसर्ग निर्मित चमत्कार हा जुन्नर तालुक्याच्या मायभुमीत लपलेला आहे. पण काही मोजकेच भटके वाट वाकडी करुन तिकडे जातात. शिवजन्मस्थळ जुन्नर तालुका तसा सगळ्यांना परिचयाचा आहे. प्रचिनकाळा पासुन जुन्नर शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे.काही जुन्या व्यापारी घाट वाटा देखील याच परिसरात आहेत.नाणे घाट , आहुपे घाट हे त्यापैकीच. आजच्या आधुनिक दळणवळणामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले .अशाच एका राष्ट्रीय महामार्गाला लागुन जुन्नर तालुक्यात एक निसर्गनिर्मित दगडी पुल आहे.
बेल्हे गावातील गुळंचीवाडी गाव आहे .गाव तसे छोटेच पण राष्ट्रीय महार्गामुळे नकाशावर आले..आळे फाट्यावरुन साधारण १७ किलोमीटर वर गुळचीवाडी लागते .याच गावातुन आणे घाट मार्ग चढुन गेल्यावर नगरला जाताना डाव्या बाजुला व कल्याण जाताना उजव्या बाजुला श्री मळगंचे मुळ ठाणे म्हणून असलेली छोटी कमान दिसते.ह्या कमानी शेजारी गाडी लावुन निसर्गाच्या प्रेमात पडायला तयार व्हायचे. कमानीत थांबल्यावर समोर गर्द झाडी तसेच पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेली ओढा दिसतो.खाली तळा पर्यन्त गुळवचीवाडी ग्रामस्थांनी पायर्यांची व्यवस्था केलेली.जो पर्यंत पायर्या उतरुन खाली जात नाही तो पर्यत आपल्याला मळगंगेचे कळस दिसत नाही. नागमोडी पायर्या ऊतरुन खाली गेल्यावर समोर दिसते ते मळगंगेचे मुळ ठाणे.
मंदिराचा परिसर पाहुन खरोखरच त्याच्या प्रेमातच पडायला होते .नीरव शांततेत पक्ष्यांची चाललेली कुजबुज स्वतःला हरवायला मदत करते. मंदिराच्या बाजुलाच दोन बाकडे ठेवण्यात आलेले आहे. चार खांबावर असलेल्या मंदिराच्या पायर्या चढुन गेल्यावर समोरील दगडात कोरिव आई मळगंगेची प्रचंड मुर्ती पाहुन थक्क होते. सहा हातात शस्त्रे तसेच वाघावर आरूढ झालेली मुर्ती देखण्याजोगी आहे. मंदिराच्याच गाभाऱ्यात भाविकांनी देवीला नेसवलेल्या साड्यांचा ढिग समोर दिसतो. सर्व पंचक्रोशीत आई मळगंगेचे ठाणे प्रसिद्ध आहेच पण या परिसरात अजून एक आश्चर्य दडलेले आहे.
आणे घाटातील खोल दरीत दोन डोंगर रांगांना एकत्र जोडणारा हा ऐतिहासिक नैसर्गिक पुल. तो पुल पाहुन आपण आश्चर्यचकित होऊन जातो.खरे तर या भागाचे खरे सौंदर्य तर पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. स्वर्ग त्यापुढे फिका वाटतो.त्यामुळे हजारो पर्यटक येथे गाडी रोडवर पार्क करुन पावसाचा आनंद लुटतात दिसतात.
Nitin Kemse