महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,51,354

गड घेऊनी सिंह आला

By Discover Maharashtra Views: 2647 5 Min Read

गड घेऊनी सिंह आला – स्वराज्यातील एक अज्ञात मावळा.

कोंढाणा म्हणजेच सिंहगड किल्ल्याचा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे की सुभेदार तानाजी मालुसरे यांनी इ.स. १६७० मध्ये उदेभान राजपुताला हरवून सिंहगड किल्ला स्वराज्यात आणला. त्यावेळी महाराजांनी गड आला पण माझा सिंह गेला हे उद्गार आपण कसे विसरणार. कारण सुभेदारांनी आपल्या प्राणाची बाजी लावून, किल्ला जिंकला होता व त्यामधेच त्यांना वीरमरण आले होते हा इतिहास आपणांस माहीतच आहे आणि आपण तो पुस्तकं आणि चित्रपटाच्या माध्यमातून बघितलाच असेल. पण आपण आज सिंहगड किल्ल्यावरच्या दुसऱ्या सिंहाबद्दल जाणून घेणार आहोत. कारण या मावळ्यांचा इतिहास खूप जणांना माहीत नसेल.(गड घेऊनी सिंह आला)

सरदार नावजी लखमाजी बलकवडे या सरदारांनी हा इतिहास घडवलेला आहे पण काळाच्या ओघात त्यांचा इतिहास पुसट होत चाललेला आहे. आपण त्यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू.

झालं काय तर, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा लावला. बारा मावळातले बरेचसे किल्ले त्याने जिंकले. सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीच्या किल्ल्यावरून कारभार पाहत होते. मुघलांनी किल्ले जिंकण्याचा सपाटा लावल्यामुळे मराठ्यांच्या देशावरील हालचालींना मर्यादा येत होत्या. आपले किल्ले काहीही करून परत मिळवायचे होतें. तेव्हा महाराष्ट्रातील धुरा छत्रपती राजाराम महाराज यांनी शंकराजी नारायण पंत सचिवांच्या खांद्यावर सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली किल्ले जिंकण्याचा निर्धार मराठ्यांनी केला. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजी बलकवडे यांनी १६९२ च्या श्रावण महिन्यात ऐन मुसळधार पावसात लोहगड जिंकून आपल्या पराक्रमाची शर्थ केली होती.

नावजी बलकवडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरदार असलेल्या लखमाजी बलकवडे यांचे सुपुत्र होते. पित्याप्रमाणेच त्यांचे शौर्यही अतुलनीय असेच म्हणावे लागेल.पुढे पंत सचिवांनी त्यांच्यावर सिंहगड किल्ला घेण्याची जबाबदारी सोपवली. पण सिंहगड किल्ला घेणे म्हणजे एकट्या दुकट्याचे काम नव्हे म्हणून त्यांनी सोबतीला सरदार विठोजी कारके यांना दिले. नावजींनी पंतसचिवांना सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले त्याबदल्यात सचिवांनी त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम देण्याचे ठरवले.

त्यानंतर नावजी आणि विठोजी यांनी सिंहगडाच्या घेऱ्याची तपासणी आणि अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की सिंहगडावरील गस्त आणि चौक्या पहारे गाफील नाहीत. चोख बंदोबस्त तैनात आहे. त्यामुळे दगाफटका करून गड काबीज करता येणार नाही आणि सुभेदार तानाजी मालूसरेंना गड घेतांना जेवढया अडचणी आल्या तेवढ्याच आता ही येणार हे त्यांच्या लक्षात आले.

२५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके निवडक चारशे मावळ्यांनीशी किल्ले राजमाची वरुन सिंहगडाच्या दिशेने रवाना झाले. सिंहगड घेऱ्यात योग्य संधीची वाट बघत ते जंगलात ५ दिवस लपून बसले होते.

३० जुनच्या मध्यरात्री ते सिंहगड किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करीत निघाले, अवघड खाचा खळग्यांनी भरलेल्या मार्गावरून ते तटबंदीच्या खाली आले. पण वरती मुघलांची गस्त चालू होती व ते सगळे सावध असल्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाही. पण सूर्योदय झाल्यावर गस्त पहारेकऱ्यांची वेळ बदलून नवे पहारेकरी येतात आणि सकाळी धुक्यामुळे लांबच दिसत नाही याच संधीचा फायदा घेऊन नावजींनी तटाला शिड्या लावल्या आणि निवडक मावळ्यांसह गड चढून ते गेले. तटावरील काही सैनिकांना त्यांनी कसलाही आवाज न होऊ देता गुपचूप कापून काढले कारण मराठे किल्ल्यावर आले आहेत हे जर किल्लेदाराला कळलं असतं तर त्याने पूर्ण शक्ती एकवटून नावजींचा पराभव केला असता कारण गडावर शिबंदी मावळ्यांच्या तुलनेने अधिक होती. पण नावजींनी मोठा पराक्रम करून गनिम कापले खाली विठोजींना इशारा मिळताच तेही शिड्यावरून गडावर चढून आले आणि दोघांनीही मोठा पराक्रम करून मुघल सैन्याची दाणादाण उडवून दिली. रणशिंग आणि तुताऱ्यांच्या आवाजाने गड दणाणून गेला.

हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला. सिंहगडावर मराठ्यांचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला.

या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीहून ३ एप्रिल १६९४ला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहिले, “तुम्ही सिंहगडचे कार्यसिद्धीसमयी  तलवारीची शर्थ केली. पूर्वी सुभेदार तानाजी मालुसर्‍यांनी बलिदान देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून किल्ला सर केलात.

याचबरोबर नावजींना ‘पदाती सप्तसहस्री’ हा किताब देऊन सात हजार पायदळांचे सेनापती पद बहाल करण्यात आले. अशा प्रकारे नावजी बलकवडे यांच्या बाबतीत गड घेऊनी सिंह आला. असे म्हटले गेले.

सिंहगडावरील सरदार नावजींच्या नावाची पाटी

यानंतर तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६९६ मध्ये मोगल सरदार मन्सूरखान बेग जुन्‍नरकर याने फितुरीने जिंकून घेतलेला कोरीगड हा घाट माथ्यावरील किल्ला नावजींनी मोठ्या पराक्रमाने जिंकला. अशा निधड्या छातीचे वीर सरदार नावजी बलकवडे यांना मानाचा मुजरा.

Leave a Comment