नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण
Necklace Point and Bhatghar Dam
पुण्यावरून साताऱ्याला जातांना रोड वर असलेल्या कापूरहोळवरून भोर कडे जाण्यासाठी उजवी कडे वळले की सुरुवात होते ती निसर्गराजाच्या साम्राज्याची. पावसाळा असेल तर मग निसर्गाच्या सौदर्याची उधळणच……आजूबाजूला शिवारातील पिके, दुथडी भरून वाहणारे ओढेनाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द झाडी हे जणू आपल्या स्वागतासाठीच नटलेली असतात.
भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉइंट. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते. नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात. डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरणा जवळील परिसराकडे.
भारतात ब्रिटिश काळात बांधलेले भाटघर धरण अतिशय महत्त्वाचे धरण आहे.
भोरच्या अलीकडे २-३ किलोमीटरच्या अंतरावर येळवंडी नदीवर १५० फुट उंचीचा ‘भाटघर धरण’ येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना एक प्रसन्न अनुभूती देतो आणि त्यामुळेच तिथे फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. पावसाळ्यात हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र धुक्याची चादर, डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे, हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा वाऱ्याचा स्पर्श….हे सारं विलोभनीयच.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti