नीलकंठेश्वर मंदिर, निलंगा –
लातूर जिल्ह्यात निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी पूर्वाभिमुख निलकंठेश्वर हे मंदिर आहे. सभामंडप,अंतराळ आणि तीन गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.नंदिमंडप, मुखमंडप सध्या अस्तित्वात नाही मात्र सभामंडप भव्य ,कलात्मक आहे मध्यभागी रंगशिळा आणि चार कोपऱ्यावर चार रेखीव स्तंभ आहेत मंदिरात एकून 16स्तंभ आहेत ,आणि चार देवकोष्टक आहेत, सप्तमातृका ,गणेश महिषासुर मर्दिनी यांच्या प्रतिमा ही सभामंडपात आहेत.
सभामंडपाचे वितान नवरंग प्रकारचे आहे, अंतराळ हे लहान असून ,सभामंडपात प्रवेश केल्यास तिन्ही बाजूस गर्भगृह आहेत , मुख्य गर्भगृह पश्चिम बाजूस असून चौरसाकृती गर्भगृहात शिवलिंग आहे. उत्तरेकडील गर्भगृहात विष्णूतर दक्षिण गर्भगृहात हरगौरी ची गणेश कार्तिकेयसह सुंदर प्रतिमा आहे.तिन्ही गर्भगृहास नंदिनी प्रकारच्या सुंदर द्वारशाखा आहेत द्वारशाखेच्या खाली शैव द्वारपाल, निधी, चामरधारीणी, गंगा ,यमुना आहेत, ललाट बिंबावर गणेश आहे तर उंबऱ्यासमोर चंद्रशिळा आहे.
मंदिरांच्या बाहेरील भागाची रचना ही नक्षत्राकृती आहे, तिन्ही गर्भगृहाच्या बाहेरुन तीन तीन असे 9 देवकोष्टक आहेत देवकोष्टकासह 103 मूर्ति बाह्यभागावर कोरल्या असून त्यात महिषासुरमर्दिनी, शिव, उमा, भैरव, चामुंडा, वराह, नरसिंह ,विष्णू ,हरिहर, इत्यादी देव मूर्ति दर्पना, तोरणा, शुकसारिका, विषकन्या, मर्दला, इत्यादी विलोभणीय सुरसुंदरी कोरल्या आहेत. मराठवाड्यातील सुस्थितीत असलेले आणि शिल्पसमृद्ध असलेले 12व्या शतकातील कल्याणी चालुक्य शैली मधील हे अत्यंत सुंदर वारसा वैभव आहे.
कृष्णा गुडदे व प्रा डॉ माधवी महाके