महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,54,526

निंबादैत्य मंदिर, दैत्यनांदूर

By Discover Maharashtra Views: 1367 3 Min Read

निंबादैत्य मंदिर, दैत्यनांदूर –

महाराष्ट्रात अनेक गावं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही ठिकाणच्या प्रथा, रूढी, परंपरा तर काही गावातील जत्रा-यात्राही कमालीच्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात असंच एक आगळ वेगळं गाव आहे की जिथं दैत्याची पूजा केली जाते आणि विशेष म्हणजे त्या दैत्याचे मंदिरही आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पाथर्डी पासून २३ किलोमीटर पूर्वेला श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत नांदूर गाव वसले आहे. या गावात दैत्य निंब या राक्षसाची पूजा केली जाते. संबंधित गावालाही त्या नावानेच ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो. आणि त्याचा चांगला तीन दिवस यात्रोत्सवही असतो.(निंबादैत्य मंदिर, दैत्यनांदूर)

मंदिरा विषयी माहिती देताना मंदिराचे विश्वस्त श्री. भुजंगराव काकडे अशी कथा सांगतात कि प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात पंचवटी येथून केदारेश्वराकडे वाल्मिक ऋषींच्या भेटीसाठी जात असताना गावातील जंगलात त्यांचा मुक्काम झाला. या जंगलात त्यावेळी ‘निंबादैत्य’ राक्षसाचे वास्तव्य होते. या राक्षसाने त्यावेळी प्रभू रामचंद्राची मनोभावे सेवा केली आणि त्यांचा भक्त झाला. तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याला वर दिला की, या गावात तुझे वास्तव्य राहील आणि गावकरी तुला कुलदैवत मानून तुझी पुजा करतील. तसेच गावात हनुमानाचे मंदिर नसेल. तेव्हापासून या ठिकाणी निंबादैत्याची गावकरी मनोभावे पूजा करतात. गावात हनुमानाचे एकही मंदिर नसून, हनुमानाच्या नावाचा उच्चार करणे देखील या गावात अपशकून मानला जातो.

मंदिराचे बांधकाम दगडी असून अंदाजे १५ ते १६ व्या शतकातील हे मंदिर असावे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. गावच्या नदी किनारी असलेले हे मंदिर दुमजली असून गावात मंदिरा शिवाय दुसरी कोणतीही दुमजली इमारत नाही. मंदिर परिसरात दगडी बांधनीचे छोटेसे एक महादेव मंदिर आपल्याला दिसते. मंदिरा समोर सध्या वापरात नसलेली एक छोटी विहीर आहे. या विहिरीच्या आजूबाजूला संरक्षक म्हणून लावलेल्या दगडात काही वीरगळ आपल्याला दिसून येतात. या वीरगळाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

या देवस्थानचा नुकताच तिर्थक्षेत्रात समावेश झाला आहे. मंदिराचे अध्यक्ष डॉ. सुभाष देशमुख, विश्वस्त श्री. भुजंगराव काकडे व त्यांचे सहकारी यांनी मंदिरासाठी व गावासाठी मोठे काम केले आहे. मंदिराचे विश्वस्त श्री. भुजंगराव काकडे यांनी आम्हाला दिलेली माहिती व केलेले सहकार्य यासाठी त्यांचा मनापासून आभारी आहे. आजच्या विज्ञान युगात या भाकडकथा वाटत असल्या तरी ही वस्तुस्थिती आहे. भले ही अंधश्रद्धा वाटत असली तरी निंबादैत्य नांदूरच्या गावकऱ्यांसाठी श्रद्धा आहे. ती त्यांनी मनोभावे जपली आहे.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment