निंबाळकर गढी, खर्डा –
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा या गावी सुलतानराजे उर्फ आप्पासाहेब निंबाळकर यांनी बांधलेली भव्य गढी आहे. खर्डावासी याला राजवाडा म्हणतात. ही निंबाळकर गढी खर्डा म्हणजे एक मजबूत भुईकोट आहे. खर्डा म्हणले की आठवते ती मराठा – निझामाची लढाई ही लढाई अखेरची लढाई होती. जामखेड या तालुक्याच्या गावापासून खर्डा २५ कि.मी अंतरावर आहे आणि नगरपासून साधारण १०० कि.मी अंतरावर आहे व पुणे – सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून करमाळामार्गे ११० कि.मी अंतरावर आहे.
गढीचे भव्य प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी आजही मजबूत स्थितीत आहे. प्रवेशद्वाराजवळ शरभशिल्प आहे. गढीमध्ये पूर्वी रयत शिक्षण संस्थेची शाळा भरत असे पण आतील भाग मोडकळीस आल्यामुळे शाळा पण भरत नाही त्यामुळे गढीत प्रवेशसुद्धा नाही. त्यामुळे बाहेरूनच गढी पहावी लागते. बाहेर मैदानात वीरगळ आहे. गावाबाहेर आप्पासाहेब निंबाळकर यांची समाधी आहे.
सरलष्कर हैबतराव निंबाळकरांचे पुत्र सुलतानराजे उर्फ आप्पासाहेब निंबाळकर यांना हैद्राबादच्या निझामाकडे सरदारकी मिळाली आणि पन्नास लाखाची देशमुखी मिळाली. त्यांनी खर्ड्याचा भुईकोट आणि ही गढी बांधली. जवळच बारा ज्योतिर्लिंग मंदिरे बांधली.
टीम – पुढची मोहीम