निरा नदी उगमस्थान, शिरगांव –
“ऋषीचे कूळ व नदीचे मूळ” शोधू नये असच काहीतरी पूर्वी माझे वाचनात आले होते. अर्थात मी नदीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार नव्हतो आणि नाही देखील, पण सुमारे शंभर वर्षापूर्वी भोर संस्थानकाळात हे झाले आहे. भोर तालुका म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील गर्भभूमी. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या या तालुक्यातून निरा नदी उगम पावते.भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिरडस मावळ नावाचे बावन्न गावांचे मावळी खोरे आहे. या हिरडस मावळातील शिरगांव हद्दीतील डोंगरात निरा नदीचा उगमस्थान आहे. संपूर्ण हिरडस मावळ म्हणजे डोंगराळ प्रदेश, कर्तृत्ववान मावळ्यांचा प्रदेश, अति पर्जन्यमान व तितकेच मायाळू लोक. जैवविविधतेने बहरलेला प्रदेश व अनेकविध वनचरांचे अस्तित्व अबाधित असलेला मुलूख म्हणजे हिरडस मावळ.(निरा नदी उगमस्थान)
शिरगांव येथील निरा नदी उगमस्थानी भोर संस्थानकाळात एक दक्षिणोत्तर बारव बांधलेली आहे. दक्षिणेस बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत तर पश्चिमेस बारवेतील पाणी गोमुखातून सतत प्रवाहीत होत असते आणि हेच निरा नदीचे उगमस्थान होय.
संस्थान कालखंडात जी काही वास्तूशिल्प, दगडी पूल, अगदी भाटघर धरण यामधे उत्रोली येथील तत्कालीन बांधकाम ठेकेदार रा.राघोबा तुकाराम शेटे यांचा महत्त्वाचे योगदान होते. म्हणूनच शिरगांवच्या डोंगरात उगम पावणा-या निरा नदीच्या उगमस्थानी संस्थानकाळात जी बारव बांधली आहे ती राघोबा शेटे यांनी नक्कीच बांधली असावी अशी शक्यता आहे.
ऐतिहासिक ठेवा असलेली ही बारव आजमात्र उपेक्षितच आहे. शिरगांव ता.भोर जि.पुणे येथील स्थानिक निवासी व माजी सरपंच शिरगाव श्री.शंकर पोळ यांनी आपले विचार व्यक्त केले. बारवेची डागडूजी गेली पन्नास वर्षात केली नसल्यामुळे बांधकामातील दगड ढासळू लागले आहेत,गाळ काढला नाही व आजूबाजूची व्यवस्था नसल्यामुळे गोमुख चिखलात गेले आहे ही खंत त्यांनी व्यक्त केली. या बारवेचे संवर्धन व्हावे ही माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिरगांव मधील स्थानिकांना या ऐतिहासिक बारवेचा सार्थ अभिमान असल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून आले. बारवेच्या समोरील खडकावर नंदी, पिंडी व इतरहि मूर्ती दिसून येतात. भोर तालुक्यातील अशा अपरिचित वारसास्थळाला जाणेसाठीचा मार्ग पुढील प्रमाणे आहे. भोर पासून महाड रस्त्याने सुमारे ४१ कि.मी. अंतरावर हे शिरगांव आहे. भोर- आंबेघर – नांदगांव – आपटी – निगुडघर -देवघर – वेणुपूरी – कोंढरी – हिर्डोशी – वारवंड – शिरगांव.
सुरेश नारायण शिंदे