महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,848

कोकणातील अमरप्रेम !! जाकाय अन् राघोचं निवसर

Views: 1413
4 Min Read

कोकणातील अमरप्रेम !!

जाकाय अन् राघोचं – निवसर

रत्नागिरी पालीपासून जेमतेम ६ कि.मी. वर असणारं एक लहानसं गाव निवसर. तिथल्या दोन जीवांची प्रेमकहाणी अमर झालीये. रोमियो-ज्युलीएट किंवा आग्र्याच्या कपोलकल्पित कहाण्यांपेक्षा ही कोकणातली प्रेमकहाणी जास्त उदात्त आणि हृदयाला भिडणारी. कथा जवळपास दोन-अडीचशे वर्षांपूर्वीची.

आगरी कुळातला कुणी एक सका. तिथल्या खोतांचं एक कूळ. त्याची मनस्वी आणि लाघवी पोर, जाकाय. तिचं लगीन ठरलं ते त्याच वाडीत राहणाऱ्या राघो गोनबरेशी. भटाला बोलावलं, मुहूर्त ठरवला. आपल्या होणाऱ्या नवरीसाठी, जाकायसाठी पाटल्या-बांगड्या, बुगडी-साखळी असं जे काही झेपणारं होतं ते सारं काही राघोनं केलं. लग्नाचा दिवस उजाडला. राघोच्या मनात काय आलं कोण जाणे. जाकायचं सोन्यापेक्षा निसर्गावर असलेलं प्रेम त्याला ठावं होतं. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पानफुलांनी सजलेली जाकाय कशी परीवाणी दिसते  हे त्यानं एकदा अनुभवलंही होतं. तेव्हाच तर दोघं मनानंही एकरूप होऊन गेली होती. म्हणूनच स्वतःच्या हातानं फुलं काढून लग्नाच्या वेळी आपल्या प्रिय जाकायला द्यायची म्हणून तो झाडावर चढला.

आणि आक्रीतच घडलं. फांदी काडकन मोडली. हळद लावलेला राघो सरळ खाली कोसळला तो थेट दगडावर. त्याचं डोकं दगडावर आपटलं. रक्ताचं थारोळं झालं. अन् राघोचा प्राणपक्षी पिंजऱ्यातून उडून गेला. हळद लावलेली, शृंगार करून नटलेली जाकाय, प्राणाच्या आकांतानं किंचाळली. तशीच धावत पऱ्हापाशी गेली. तिथं तिचा राघो निपचित पडला होता. तिच्यासाठी तोडलेली फुलं हातात तशीच होती. जाकायच्या डोळ्यात वेगळीच झाक दिसू लागली. तिनं मनोमन ठरवलं… सती जायचं. अक्षता डोईवर पडल्या नव्हत्या इतकंच.. पण मनानं ती आणि राघो केव्हाच एकमेकांचे झालेले होते. साऱ्या गावानी परोपरीनं समजावलं, पण जाकाय काही मागे हटली नाही. तिचा बाप सका आता भडकलाच. तिला म्हणाला, “एवढं प्रेम प्रेम म्हणून सती जायचं म्हणतेस तर तुझं सतीत्व दाखव. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या निवसरात लाथ मारून पाणी काढून दाखव.”

बापाचे हे शब्द ऐकताच जाकायनं सगळं तेज आणि सत्व डोळ्यांत गोळा केलं. जाकायनं हे आव्हान स्वीकारलं. पण ती म्हणाली की मी लाथ मारून पाणी काढीन तिथं लोकांच्या उपयोगासाठी तळं बांधा आणि मी जिथे प्राण सोडीन तिथं  माझ्या प्रेमाचं मंदिर बांधा !!

राघोचं कलेवर पडलं होतं, तिथेच एक खडक होता. तिनं डोळे मिटले, प्रार्थना केली. अन् त्या शिळेवर जोरानं लाथ मारली. त्या खडकाचा एक कळपा निघाला अन् तिथून पाण्याचा ओघळ बाहेर पडला. सारे आश्चर्याने थक्क झाले. आता जाकायला उसंत नव्हती. तिला आपल्या राघोला भेटायची घाई झाली होती. ती तिथेच राघोच्या कलेवरावर कोसळली अन् पंचत्वात विलीन झाली.

हे सगळं घडलं या निवसर गावी. हे जगावेगळं प्रेम पाहून, गावकऱ्यांनी ती स्मृती जागविण्याचं ठरवलं. त्या गरीब गावकऱ्यांनी  जाकाय-राघोचं स्मृतिमंदिर बांधलं. रत्नागिरीला गेलात तर या गावाला अवश्य भेट द्या. आजही इथे जाकायचं तळं अन् साधंसुधं देऊळ पाहायला मिळतं. लोक जाकायला जाकादेवी मानतात. तरूतळी विसावलेले राघो अन् जाकाय खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगतील. अजून एक चमत्कार तिथे घडला. तिथे जवळच असलेल्या कोंडवी गावच्या ग्रामस्थांनी एक विठ्ठलमूर्ती घडवून घेतली होती. गावात तिची स्थापना करायचं त्यांच्या मनी होतं.  पण गावच्या प्रमुखाच्या स्वप्नात देव आले. आणि त्यांनी निवसरच्या नव्या स्मृतिमंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. साऱ्या गावकऱ्यांनी ते मानलं. आज निवसरच्या त्या स्मृतिमंदिरात उत्कट प्रेमाला मान्यता देणारं पंढरीरायाचं गोजिरं रूप पाहायला मिळतं.

कधी इकडे आलात, तर मुद्दाम वाकडी वाट करून इथं या. प्रेमाचं सोज्वळ रूप पाहायला तुम्हांलाही आवडेल. बाजबहाद्दर अन् रूपमतीचं स्मारक पाहायला मध्यप्रदेशातील मांडूला आवर्जून जातात. शहाजहान अन् मुमताजच्या कपोलकल्पित प्रेमाचं प्रतीक बनलेल्या ताजमहालसारखं इथं काही नसेल, पण जाकाय-राघोच्या उत्कट प्रेमाचं स्मारक इथं आहे. कोकणच्या पवित्र मातीत फुललेलं हे प्रेमपुष्प आपल्याला नक्की आवडेल.

Ashutosh Bapat

Leave a Comment