महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,738

उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारी पुरातत्विय स्थळे

By Discover Maharashtra Views: 1432 15 Min Read

उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारी पुरातत्विय स्थळे –

बौध्द साहित्यातील बुध्दकाळातील बावरीच्या आणि पुर्णावदानातील पूर्णाच्या कथेवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे उत्तरपथ आणि दक्षिणपथ यांच्यात व्यापार आणि दळणवळण सुरू होते.  बुध्दपुर्व काळात काय स्थिती होती? याचा लेखाजोखा घेण्यासाठी मात्र  या प्रदेशात झालेल्या पुरातत्विय स्थळांच्या उत्खननावरून मिळालेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारेच अनुमान लावता येते. महाराष्ट्रातील सोपारा यासारखे अजून त्याकाळात कुठली बंदरे होती का? याचा अभ्यास करून पडताळून बघावे लागेल. शिवाय सिंधु संस्कृतीच्या काळातील लोथल हे गुजरातमधील अहमदाबाद जवळ असणारे प्राचीन नगर आणि बंदर होते हे  पुरातत्विय तज्ञांनी सिध्द केले आहे. तसेच महाराष्ट्रात कुठले बंदर होते का ?  या स्थळावरील  उत्खननावरून जवळपास गुजरात किनाऱ्यावर वाहतूक आणि तिथल्या गोदामांवरून व्यापार होत होता याची प्रचिती येते. याचा खानदेशाशी संबंध काय ? हा व्यापार तर सिंधू लोकांशी म्हणजे उत्तरेकडील राज्यांतील लोकांशी चालत होता का असा प्रश्न पडू शकतो.

उत्तर महाराष्ट्रातील पुरातत्विय स्थळांचा आढावा घेतला तर तापी, गोदावरी आणि भीमा नदीच्या काठावर वसलेल्या स्थळांमध्ये ताम्रपाषाणयुगीन काळातील जवळजवळ १५० स्थळे सापडली आहे. यासाठी खानदेशातील जी पुरातत्विय स्थळे आहेत त्यांचा आढावा घेतला तर काय लक्षात येते. खानदेशातील महत्वाची उत्खनने प्रकाशे, बहाळ, टेकवडा, मानेगाव, पाटणे येथे झाले आहे. इंडियन आर्किअ‍ॅलॉजी – ए रिव्ह्यू या यादीवरून खानदेशातील अनेक गावे साक्री तालुक्यातील प्राचीन गावे : १.अश्मयुगीन स्थळे (इ.स. पूर्व १ लाख ते ३० हजार वर्षे) किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, धवळविहीर इ.२. मध्ययुगीन अश्मयुगीन स्थळे : कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल, टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे. ३. उत्तर अश्मयुगीन स्थळे – आष्टाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी.४. ताम्रपाषाणयुगीन स्थळे – (इ.स.पूर्वी ४ हजार २७०० वर्षे) उभंड, चिंचखेडे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, धाडणे, रूणबळी, साक्री. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील जास्त प्रमाणात आहेत कारण  त्या परिसरात अभ्यास झाला आहे तर जळगाव जिल्ह्यात मात्र चारच ठिकाणी उत्खनन झाले आहे. पण ती महत्त्वाचे स्थळे आहेत

तापी खोर्‍यात त्या काळात ज्या वसाहती झाल्यात, त्याची कारणे खालीलप्रमाणे –१. खानदेशात तापी खोर्‍याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना.२. उत्तर व दक्षिण भारताच्या मधोमध असल्याने प्रारंभीपासून मानवी स्थलांतर.३. व्यापारास उपयुक्त. ४. योग्य पाऊस, तापी व उपनद्या (पांझरा, कान, बुराई, गिरणा) या बारमाही वाहणार्‍या नद्या इत्यादींमुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोर्‍यात उदयास आले. साक्री तालुक्यात पांझरा कान खोर्‍यात मोठ्या प्रमाणात वरील गावांना वसाहती निर्माण झाल्या आहेत.

ताम्रपाषाण युगी समाज रचनेची व संस्कृतीची साक्री जवळील कावठे गावी डेक्कन कॉलेजने केलेल्या सन १९८४ आयत उत्खनाने येथील आद्य शेतकर्‍यांच्या जीवन संस्कृतीवर प्रकाश पडला. कावठे येथील वसाहत तीस हेक्टर भूभागात पसरली होती. साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे (इ.स.पूर्व १४०० ते १०००) या कालखंडातील जोर्वे संस्कृती उत्खननात मातीची भांडी व तांब्याचा भाला सापडला.

त्यातील प्रमुख नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा येथे १९६४-६५ मध्ये बी. के. थापर यांनी केले आहे. त्यांच्या अनुमानानुसार प्रकाशा हे इतिहासपूर्व काळात एक नगर होते. काळी आणि लाल रंगाची मातीची भांडी तसेच लोखंडी वस्तू मिळाल्या आहेत. तापीच्या दोन्ही किनाऱ्यावर वसती होती, शिवाय आज जिथे प्रकाशा वसलेले आहे, तिथेही काही उंचवटे पांढरीची टेकाडे आहे म्हणजे आजच्या शहर हे जुन्या शहरावर वसलेले आहे. ढवळीकर यांनी चर्चा केली आहे आणि चार कालखंड निश्चीत केले आहे. पहिला माळवा संस्कृती इ.स.पुर्व १६००-१३०० २. इ.स.पुर्व १३००-१००० जोर्वे संस्कृती २. इ.स.पुर्व १०००- ४०० उत्तर जोर्वै संस्कृती ३.इ.स.पुर्व २००-इ.स. ४०० सातवाहन काळ व पश्र्चिम क्षत्रप काळ ४ इ.स.४००-१००० ५. इ.स.१३००-१६०० मुगल मराठा प्राचीन इतिहास काळ या काळातील वस्तू सापडल्या आहेत.

बहाळ येथे १९५६-५७ मध्ये उत्खनन झाले तिथे पाच कालखंड निश्चीत केले आहे. पहिला काळ हा ताम्रपाषाणयुगीन काळ आहे. पहिल्या टप्प्याचे दोन अ आणि ब असे भाग केले आहेत. पहिला माळवा संस्कृती तर दूसरा उत्तर जोर्वै संस्कृती अर्थातच हा अभ्यास तिथे सापडलेल्या मृद्भांड्यांच्या सखोल अभ्यासावरून करण्यात आला आहे. बहाळची विशेषतः ही आहे की तिथे दफन नदीच्या दुसऱ्या काठावर टेकवडा येथे सापडलेल्या आहे. ढवळीकरांनी १९६८-६९ मध्ये येथील सापडलेल्या वस्तूंचा नीट पट मांडला. माळवा प्रदेशातील लोक हे महाराष्ट्रात दुसऱ्या सहस्रकाच्या पुर्वीपासून स्थलांतरीत होऊन वसतीला होते हे लक्षात आणून दिले. विशेषतः दायमाबाद आणि बहाळ येथील अवशेषांवरून होय.

एस.ए. साळी यांनी १९६८ मध्ये धुळे जिल्ह्यातील जे उत्खननात सापडलेल्या वस्तू वरून ताम्रपाषाणयुगीन काळातील नविन मृद्भांडी सापडल्याचा उल्लेख केला आहे.

खानदेश गॅझेटियर मध्ये प्राचीन काळ या लेखात डॉ. गो.बा. देगलूरकर यांनी  लिहिलेल्या लेखाचा थोडक्यात आढावा घेतला तर पुर्व पुराश्म युगातील स्थळांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठावर चिरकी नाला गोदावरी नदीला येऊन मिळतो तिथे एक स्थळ आले. मोठमोठ्या शिलांच्या निवाऱ्याला या युगातील माणूस रहात असे अशी काही स्थळे धुळे जिल्ह्यात आहे अशी जळगाव आणि नंदुरबार मध्ये असण्याची शक्यता आहे. दुसरा काळ म्हणजे मध्य पुराश्म युग या काळात माणूस मोठ्या आकाराच्या हातकुऱ्हाडी, टोकाची बाणं, गिरमीट,चाकू, अशी दगडी हत्यारे बनवून वापरायला मानव शिकला. या काळातील स्थळांमध्ये नेवासा आणि पाटणे चाळीसगाव तालुक्यातील ही स्थळे महाराष्ट्रात आहेत. अशीच हत्यारे  तापी आणि तिची उपनदी पूर्णा यांचा संगम जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे आहे. मानेगाव येथे होतो जवळच पूर्णा नदीच्या मिळणारा गंगनाला असून त्या साठी केलेल्या उत्खननावरून नाल्या काठावर पूर्व पुराश्म युगातील  आदि मानवाची  मानवाचे वस्ती स्थळ होते असे लक्षात येते. गंग नाल्याच्या काठावर  आज आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पात्र रूंद असावे. मात्र नंतरच्या काळात झालेल्या हालचालींमुळे ते अरूंद झाले असावे.

महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्याबाबत नेमके   बोलायचे झाले तर उत्तर पुराश्म युगाचे

निक्षेपण असलेली पायाची हाडे, शिंगे, हस्तिदंत यांचा हत्यारा साठी व अलंकार यासाठी उपयोग केलेला आढळतो. महाराष्ट्रात उत्तर पुराश्म  युगाचा पुरावा ढवळापुरी आणि चिटके जिल्हाअहमदनगर तसेच पितळखोरा म्हणजे पाटणा आणि औरंगाबाद जिल्हा येथे सापडले आहेत तर कांदिवली मुंबई नेवासा, बेलपांढरी, इनामगाव, झरपटनाला चंद्रपूर आणि पाटण येथे सापडलेल्या आहे.

मध्यपुराश्मयुगात जास्पर ह्या कठीण जातीच्या दगडापासून हत्यारे बनवलेले दिसतात. जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे उत्तर पुराश्मयुग वस्तीस्थळाच्या उत्खननात अनेक हत्यारे सापडली आहेत. यावरून तसेच कवड्या, शिंपले शहामृगाच्या अंड्यांच्या कवचावर केलेल्या कलाकृती वरून त्यांच्या संस्कृती जीवनाची कल्पना येते.  दगडी पात्याच्या खोबणी साठी हाडांचा उपयोग केलेला जात असे. शहामृगाच्या अंड्याच्या कवचाच्या तुकड्यांना आकार देऊन शिंपल्याच्या छिद्र पाडून मण्यासारखा उपयोग केला जात असे.

पाटणे उत्खननात पडलेल्या शहामृगाच्या अंड्यांच्या उपलब्धतेमुळे तत्कालीन हवामानाबद्दल अंदाज करता येतो. पाटणे येथील उत्खननातील तिस-या कालखंडात जळगाव जिल्ह्यात जवळजवळ आजच्यासारखे हवामान होते,  झोपडी बांधताना लावलेल्या लाकडी टेकूसाठी खणलेले खड्डे व अन्न्न शिजवण्यासाठी तयार केलेली ओबडधोबड चूल होय. पुढचा काळ ताम्रपाषाण युग महाराष्ट्रातील या युगाचा पहिला पुरावा अहमदनगर येथील संशोधनानंतर नाशिक, नेवासा, बहाळ, टेकवडे, चांडोली, सोनेगाव, आपेगाव, कवठे, इनामगाव या मुख्यत्वे गोदावरी आणि भीमा खोऱ्यातील प्रागैतिहासिक वसती स्थळांच्या उत्खननानंतर महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड व आलेख विभागणी त्या काळातील उपजीविका सामाजिक व धार्मिक उतार-चढाव हे स्पष्ट झाले.

बहाळ येथील ताम्र पाषाण युगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी उत्खननात आढळून आलेल्या दफन यांचा अभाव होय. ताम्रपाषाण युगात मृतांच्या घरात अथवा घरालगतच एखाद्या खड्ड्यात भांड्यांची तोंडे एकमेकास जोडून त्यात पुरण्याची पद्धती होती. तसेच नुसत्या खड्ड्यात ही पुरण्याची पद्धती होती. येथे अशी दफने सापडत नाही, मात्र पलिकडच्या तिरावर  असलेल्या टेकावडे येथील उत्खननात असे दफने मिळाले आहेत. येथील पहिल्या कालखंडात उत्खननाचे दोन भाग कल्पिलेले आहेत. पहिल्या उपखंडात जाड तोंडाचे लोटे पुढचे वाडगे आहेत. काही भांडी रंगपुर येथील गुजरातमधीलउत्खननातलापडलेल्सा लाल चकचकीत भांड्यांसारखी आहे. वरच्या थरात नाशिक सारखी रंगाची नक्षी असलेली लाल भांडी मिळतात. येथे ताम्रपाषाण युगाचा काळ हा इसवी सन पूर्व अठराशे ते इसवी सन पूर्व सातशे इतका असावा, असे दिसते टेकवडे येथील दफनाची पद्धती बृहदश्मयुगीन भांड्यांचा आकार लक्षात घेता येथील दुसरा कालखंड येथील दुसरा कालखंड इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन पूर्व तीनशे आहे. पहिला ताम्रपाषाण युगाचा काळ इसवी सन पूर्व अठराशे ते इसवीसन पूर्व  सातशे असावा.

तिसऱ्या कालखंडात उत्तरेतल्या सारखी चकचकीत काळी भांडी निरनिराळ्या इतर रत्नांचे मणी, काशाचा आरसा, लोखंडी खिळे इत्यादी चित्रे असलेली कवचे, उत्तर सातवाहन काळातील वस्तू मिळाल्या आहेत. या पुराव्यांवरुन असे अनुमान काढता येते की या लोकांना लघु अश्म हत्यारे व तांब्याची माहिती होती. तसेच जळगाव जिल्हा पहूर अजिंठा मार्गावर अठरा किलोमीटर वाकड येथे अशीच ताम्रपाषाणयुगीन वस्ती सापडली आहे तर आहात नाणी येथे उत्तरेच्या मौर्य सम्राटाच्या काळी जळगाव जिल्हा सांस्कृतिकदृष्ट्या एकाकी नव्हता, मौर्यांच्या सत्तेनंतर सातवाहनांनी साम्राज्य स्थापन केले. पैठण व बहाळ यांच्यात सरळ एका रेषेत पितळखोरे आहे. जळगाव दक्षिण सीमेवर सातपुड्याच्या डोंगर रांगात हे आहे. बौद्ध गुफा अजंठा दहा ते बारा या पहिल्या टप्प्यातील याच काळात कोरल्या गेल्या. खानदेशात गुजरात मध्यप्रदेशात उपलब्ध होणाऱ्या अभिलेखावरून तसेच शिवदत्तचा मुलगा ईश्वरात हा पहिला अभिलेख राजा ठरतो आणि ईश्वरात्याने तापी तीरावर प्रकाश येथून दानपत्र दिले होते.

लोथल हे गुजरातमधील सिंधू संस्कृतीचे प्राचीन नगर आहे. इ.स.पूर्व ३७०० वर्षांपुर्वीचे जगातील पहिले बंदर आहे. लोथलला सर्वात आधी उत्खनन १९५५ मध्ये ए. एस. आय.ने केले शोध १९५४ मध्येच लागला होता. साबरमतीच्या मुखाशी अरबी समुद्रात व्यापार होत असे. तसेच सिंधप्रांतातील हडप्पा संस्कृतीच्या शहरांशी जोडलेले होते आणि जो कच्छच्या खाडीचाही भाग होता. लोथल हे बंदर आहे की फक्त इरिगेशनसाठी तयार केलेला भाग आहे, यावर बरीच तज्ञांमध्ये घमासान चर्चेनंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रोफी या संस्थेच्या तज्ञांच्या अभ्यासाअंती ते बंदर होते हे सिद्ध झाले.

येथून कसला व्यापार होत होता तर मणी, मौल्यवान खडे, आणि मौल्यवान दागिने हे आफ्रिका आणि पश्चिम आशियातील कानाकोपऱ्यात हा माल पोचत होता. हे बनवण्यासाठी लागणारी खनिजशास्राचे ज्ञान आणि तंत्रज्ञान हे चार हजार वर्षांपूर्वी प्रगत होते. कच्छच्या रणात सापडलेली दुसरे महत्त्वाचे स्थान ढोलावीरा, कालीबंगन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मणी तयार करण्यात येत होते हे दिसते.

लोथल हे अहमदाबाद जिल्ह्यातील सारगवाला गावाजवळ अहमदाबाद भावनगर रेल्वे लाईनवर अहमदाबादपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. लोथल म्हणजे मृतांची टेकडी. थल म्हणजे स्थळ  असाच अर्थ मोहेंजोदडो या शब्दाचा आहे. लोथलच्या पुरातत्विय खोलात न जाता तिथल्या काय विशेषतः आहेत तर वैशिष्ट्य पूर्ण नगररचना, डाकयार्ड, गोदाम, जहाज येण्याजाण्यासाठी जागा, विहीर, कॅनाल, बाथरूम, टायलेट, मृतांच्या दफनाची जागा, लोथलला सापडलेले सील किंवा मुद्रा यांचे साम्म हे सिंधू संस्कृतीच्या मुद्रांशी आहे. मुख्य नगर, उपनगर अशी विभागणी केली आहे.

याचा आणि खानदेशचा काय संबंध हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, पण रंगपूर येथील उत्खननात सापडलेल्या मृद्भांडी आणि प्रकाशे येथे सापडणारी भांडी यात साम्य आहे आणि डॉ.वसंत शिंदे यांच्या लेखात त्यांनी या लोकांचा एकमेकांशी संपर्क येत होता हे लक्षात आणुन दिले आहे तर रंगपूर हे लोथल जवळच लहान बंदर आहे. शिंदेच्या मते प्रकाशे आणि कुकुरमुंडा या भागात सापडलेल्या पुरातत्विय स्थळांवरून येथे नदीजवळ पण एकदम काठावर नाही घनदाट वस्ती होती आणि नदीच्या बाजूला हे लोक शेती करत आणि सतत जागा बदलत असत जमीन व पाण्याच्या सुविधेनुसार होय. सावळदा जे तापीच्या काठावर प्रकाशेच्या विरूध्द काठावर वसलेले हो. ते तिथल्या संस्कृतीशी मिळत्याजुळत्या एकोणतीस स्थळे सापडली आहे. जिला त्यांनी सावळदा संस्कृती असे नाव दिले आहे ती तापीच्या उपनद्या विशेषतः पांजरा, बुराई, अमरावती या धुळे जिल्ह्यातील आहे. प्रकाशे ते कुकुरमुंडा भागात वढोदे, बहुपुरा, कोरीट, उभाड ही काही स्थळे आहेत.

साक्री तालुक्यातील कायथा येथे  चार किलोमीटर अंतरावर पांजरा नदीच्या पासून तर कान नदीच्या काठावरून अर्धधा किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी एस. ए.साळी यांनी केलेल्या १९८६ उत्खननावरून तिथे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या अवशेष दिसतात असा निष्कर्ष काढला आहे. आणि खालील कालखंड निश्चीत केले आहेत.

सावळदा संस्कृती इ.स.पुर्व २२००-२०००, उत्तर हडप्पा संस्कृती इ.स.पुर्व २०००-१८००, दायमाबाद इ.स.पुर्व १८००-१६००, माळवा संस्कृती इ.स.पुर्व १६००-१४००, जोर्वे संस्कृती इ.स.पुर्व १४००-१००० होय.  पहिले शेतकरी या भागात म्हणजे महाराष्ट्रात सौराष्ट्र मधून आले ज्यांचा संबंध हा हडप्पा संस्कृतीच्या शहरांशी होता. आणि मग त्यांनी शेतीबरोबरच आधीचे पशुपालन व शिकार ही सुरू ठेवली आणि एक मिश्रण असलेली आयुष्य जगत राहिला. म्हणून या भागात भटकी शेती, जी नदीच्या बाजूला असलेल्या वस्तीत दिसते बहुपुरा, कोपर्ली, कोरीत तर हिंगोणी, चिंचाडा या भागात दिसते तर पिकांमध्ये गहु, बार्ली, उडिद, मुग, मसूर ही पिके घेतली जात होती.

रंगपुर विषयी हे वनाळा जवळ सौराष्ट्रात खंबात आणि कच्छच्या खाडीच्या मध्यभागी आहे. लोथलच्या उत्तरेला आहे येथील उत्खननात सिंधू संस्कृतीचे अवशेष दिसतात. सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळातील गुजरात येथील संस्कृती म्हणता येईल. येथील पहिल्या टप्प्यात १९३१ मध्ये एम.एस.वॅट्स, १९३९ मध्ये घुरे, १९४७ दिक्षित, १९५३-५६ एस.आर. राव यांनी उत्खनन केले आहे. राव यांनी चार कालखंड निश्चीत केले आहे तर क्षूद्रास्रे हा इ.स.पुर्व ३०००, हडप्पा, उत्तर हडप्पा, आणि संक्रमण काळ होय. बाभुळच्या लाकडाचा वापर शस्रे, घरगुती वापर, आणि बांधकामासाठी केलेला दिसतो. बाजरी आणि मिलेटचे अवशेष तर मणी काळीतांबडी हॅडलची भांडी मिळतात.

बऱ्हाणपूर ते चांगदेव या परिसरात म्हणजे जळगाव जिल्ह्यात तशी स्थळे असावीत पण संशोधन झालेले नाही. कानळदा येथेही गिरणा नदीच्या काठी असाच पांढरीचे टेकाडे दिसतात.

महाराष्ट्रातील नेवासे आणि मध्यप्रदेशातील महेश्वर  येथील उत्खननात असे  दिसून आले आहे की दोघांमध्ये चार हजार वर्षांपूर्वी देवाणघेवाण होती. तर नावडाटोली येथील उत्खननात इराण आणि मध्यभारतात देवाणघेवाण सुरू होती असे दिसते. तर नविन झालेल्या उत्खननात व संशोधनात  पश्र्चिम आशिया व  मध्यभारतातील संबंध हे  मध्यभारतातील उदयपूर जवळचे आहार येथील उत्खननाातील झालेल्या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.

लोथलची काही फोटो,आंतरजारावरून साभार.

संदर्भ:

JOURNAL ARTICLE

K. Dhavalikar, Archaeological Excavations, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute , Vol. 33, No. 1/4 (1973), pp. 41-76 (38 pages) Vice Chancellor, Deccan College Post-Graduate and Research Institute (Deemed University), Pune

JOURNAL ARTICLE

Vasant S. Shinde, SETTLEMENT PATTERN OF THE SAVALDA CULTURE: THE FIRST FARMING COMMUNITY OF MAHARASHTRA, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute Vol. 49 (1990), pp. 417-426 (10 pages), Published by: Vice Chancellor, Deccan College Post-Graduate and Research Institute (Deemed University), Pune

S. R. Rao, 1974, Ancient India no.18, Excavation at Rangpur and other exploration at Gujrat.

(उत्तरपथ आणि दक्षिणपथ,उत्तरपथ आणि दक्षिणपथ,उत्तरपथ आणि दक्षिणपथ,उत्तरपथ आणि दक्षिणपथ,उत्तरपथ आणि दक्षिणपथ,उत्तरपथ आणि दक्षिणपथ.)

Leave a Comment